त्या एका दिवसासाठी हा भिडू सचिन आणि धोनीपेक्षाही मोठा स्टार झाला होता…

उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये सगळा दिवस रानात, मैदानात क्रिकेट खेळण्यात घालवलेल्या पोरांनी बालपण खऱ्या अर्थानं जगलं. नंतर शहरं पसरली आणि मैदानं छोटी झाली. बालपणाची सर कुठल्या उन्हाळ्याला आलेली असेल, तर २०११ च्या.

भारतीय उपखंडात क्रिकेट वर्ल्डकप होत होता. दे घुमाके गाण्यापासून आणि पेप्सीच्या जाहिरातींपासून जो माहोल बनला होता, त्याचा नाद नव्हताच. घरातला स्वयंपाक पण संध्याकाळी लवकर आवरला जायचा, वार्षिक परीक्षेचा अभ्यास तर दुपारीच झालेला असायचा, सगळं घर टीव्हीसमोर बसायचं.

२ मार्च २०११ ची संध्याकाळ पण तशीच होती. सवयीनुसार टीव्हीवर मॅच लागलेली, इंग्लंड आणि आयर्लंड हे संघ एकमेकांना भिडत होते. पहिली बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडनं ३२७ रन्स चोपले होते. नाही म्हणलं तरी आयर्लंडचा पेपर अवघड होताच. त्यात त्यांच्या इनिंगच्या पहिल्याच बॉलवर अँडरसननं पॉटरफिल्डला बोल्ड केलं. पुढं एक एक गडी आऊट होत राहिला आणि आयर्लंडचा स्कोअर झाला ५ आऊट १११. इथून जिंकणं अवघड होतं…

क्रीझवर ॲलेक्स क्युसॅक आणि केविन ओब्रायन हे दोन गडी होते. ओब्रायन दिसायच्या बाबतीत अगदी फ्लिंटॉफसारखा होता, धिप्पाड तब्येत आणि अफाट ताकद. त्यात कॅन्सरसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला मदत म्हणून तो केसांना गुलाबी रंग लाऊन मैदानात उतरला होता. 

या जोडीनं हळूहळू स्कोअर वाढवायला घेतला. इंग्लिश बॉलर्सला विशेषतः ग्रॅमी स्वानला फटके पडत होते. ३२ व्या ओव्हरला आयर्लंडनं बॅटिंग पॉवरप्ले घेतला आणि सगळं जग हँग झालं. त्यांचा धावांचा पाठलाग एकतर गंडणार होता.. किंवा कायतर भारी होणार होतं.

आपली आणि इंग्लंडची मॅच टाय झालेली, सचिनचं शतक व्यर्थ गेलेलं. त्यामुळं आयर्लंड जिंकलं असतं तर साहजिकच लय आनंद झाला असता. बॅटिंग पॉवरप्लेमध्ये ओब्रायननं अक्षरश: तोडफोड केली. अँडरसनला खणखणीत छकडा मारत त्यानं फक्त ३० बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली. 

गोष्ट इथंच थांबली नाही, अँडरसनच्या ३५ व्या ओव्हरमध्ये त्यानं १७ रन्स चोपले. त्यातल्या शेवटच्या बॉलवर त्यानं १०२ मीटर लांब सिक्स मारला. कधी फारसं नावही चर्चेत न आलेला गडी, साक्षात जेम्स अँडरसनला असला बेक्कार मारतोय म्हणल्यावर, घरातलीच नाही तर आजूबाजूची जनताही टीव्हीसमोर येऊन बसली.

फिफ्टी झाली म्हणून धुव्वा थांबला नाही, उलट आणखी वाढला. ४१ व्या ओव्हरचा शेवटचा बॉल, मायकेल यार्डीच्या बॉलिंगवर दोन रन्स काढत केविन ओब्रायननं आपली सेंच्युरी पूर्ण केली. 

फक्त ६० बॉल्समधली त्याची ती इनिंग डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. आयर्लंडनं २७३ पर्यंत मजल मारली आणि तेवढ्यात क्युसॅक रनआऊट झाला. ओब्रायनचा बुरुज भक्कम होता, त्यानं मॅच आणखी पुढं नेली.

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये १२ रन्स हवे होते. ४९ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मॅच बघणारे सगळे हँग झाले… कारण ओब्रायन रनआऊट झाला. भारताची मॅच नसली, तरी टीव्हीसमोर सन्नाटा पसरू शकतो हे त्यादिवशी पहिल्यांदा समजलं. ट्रेंट जॉन्स्टन आणि जॉन मूनीनं आशा सोडली नाही आणि अखेरच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आयर्लंडनं इतिहास रचला.

 वर्ल्डकपमधला हायेस्ट चेस, ओब्रायन, मूनी आणि क्युसॅक या कार्यकर्त्यांनी पूर्ण केला होता.

बघायला गेलं, तर आपल्यासाठी ही फक्त एक क्रिकेट मॅच होती, पण आयर्लंडसाठी मात्र तो इतिहास होता. कधीकाळी आयर्लंड ब्रिटिश रुलमध्ये होता. कधीकाळी आयरिश लोकांनी ब्रिटिशांची चाकरी केली, आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 

कुठं ना कुठं आयरिश लोकांमध्ये, आयरिश खेळाडूंमध्ये त्या संघर्षाची ठिणगी कुठंतरी असणारच. 

केविन ओब्रायननं ती ठिणगी पेटवली आणि आयर्लंडनं पहिल्या बॉलवर विकेट गमावून, ५ आऊट १११ रन्सवरुन हिंमत न हारता बाजी मारली. त्यांनी पहिल्यांदाच इंग्लंडला हरवलं, तेही वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्टेजवर. जितका २ एप्रिल २०११ लक्षात राहतो, तितकाच २ मार्च २०११ ही.

गुलाबी केसांच्या केविन ओब्रायननं, अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जॉन मूनीनं, शेवटच्या क्षणी बाऊंड्री मारणाऱ्या ट्रेंट जॉन्स्टननं त्यादिवशी दुष्यन्त कुमारांच्या ओळी सिद्ध केल्या…

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

म्हणूनच ‘Ireland won by 3 wickets’ हा रिझल्ट लय भारी होता, कधीच न विसरण्यासारखा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.