अशी काय स्ट्रॅटजी आहे की, पार्ले-जी पुडा ५ रुपयालाच मिळतो तरी कंपनीला नुकसान होत नाही

प्रत्येकाच्या लहानपणीची एक कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंव्हा मग  पाण्यात बुडवून खा. कुणी आजारी पडलं तरी पार्लेजी पुडा. वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी पुडा.. तसा पार्लेजी बिस्किटांचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त जवळचा आहे. आता बरीच बिस्किटं बाजारात आली पण पार्लेजी बिस्किटांना तोड नाही. अजूनही कंपनी टॉपला आहे. पण एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे…

वरचेवर महागाई वाढतेय पण पार्ले-जी पूडा आजही ५ रुपयालाच का मिळतो ? आणि तरी कंपनी फायद्यात कशी काय आहे? नेमका पार्लेजीचा मार्केटिंग फंडा काय आहे? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आधी पार्लेचा इतिहास पाहायला लागेल.

 पार्लेजी अस्सल भारतीय कंपनी आहे. दूसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीला म्हणजेच १९३९ च्या दरम्यान मुंबईच्या पार्ल्यात ही कंपनी सुरू झाली. महात्मा गांधीजींचं स्वदेशी आंदोलन हे पार्ले जी कंपनीचं मूळ असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळेस भारतात आणि भारतीय व्यापरपेठेवर ब्रिटिशांचं राज्य होतं. विदेशी महाग वस्तू भारतात विकल्या जात असत. अशा महाग वस्तू श्रीमंत लोकंच विकत घेत असत…भारतीय जनतेला त्या महाग वस्तू उपभोगता येत नसायच्या. 

त्याकाळात ब्रिटिश लोकं कँडी खात असायचे. कँडीचा व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असायचा. आणि ही कँडी भारताबाहेर बनत असायची. स्वदेशी आंदोलनातून प्रेरणा घेत मोहनलाल दयाळ यांनी भारतीयांसाठी भारतीय गोष्टी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जर्मनीत जाऊन कॅण्डी बनवायला शिकून घेतलं. भारतात परतले आणि कारखाना टाकला. पार्ले कंपनीत तयार झालेला पहिला पदार्थ होता ऑरेंज कँडी. त्यावेळी बिस्किटाचा विचारही नव्हता केला. कँडीची किंमत कमी होती त्यामुळे सामान्य भारतीय नागरिक कॅंडी खरेदी करत होते, कंपनी चांगला नफा कमवत होती.

व्यापार मोठा झाला अन मोहनलाल देखील मोठे व्यापारी झाले. मोहन लाल यांची इंग्रज व्यापारांबरोबर उठबैस असायची. त्यांना एक गोष्ट लक्षात आली कि, ब्रिटिश लोकं चहाबरोबर बिस्कीट खातात. आपणही अशीच बिस्किटे बनवायची आणि सर्वांना परवडेल अशा एकदम स्वस्त किमतीत विकायची. आणि पार्ले ग्लुकोज बिस्किटांचा जन्म झाला.

पार्ले बिस्किटांची किंमत अगदी मजुरी करणाऱ्यांना सुद्धा परवडेल इतकी कमी होती आणि बिस्किटांची क्वालिटी पण उत्तम होती. 

हळूहळू पार्ले बिस्कीट अगदी खेड्यापाड्यात पोहचलं. त्याआधी भारतीयांना बिस्कीट नावाचा प्रकारच माहिती नव्हता. या बिस्किटांनी ब्रिटिशांना सुद्धा वेड लावलं होतं. दुसरं महायुद्ध संपलं अन भारतात गव्हाची कमतरता भासू लागली. बिस्किटे बनवण्यासाठीच्या रॉ मटेरियल मध्ये गहू महत्वाचा घटक होता. पण परिस्थितीसमोर नाईलाजाने पार्लेला प्रोडक्शन बंद करावं लागलं. अगदी फॅक्टरीला कुलूप लागलं. 

१९७५ मध्ये कंपनी पुन्हा सुरु झाली पण दरम्यान मोहनलाल यांचं निधन झालं. १९८२ मध्ये पार्ले ग्लुकोजचं नाव बदलून पार्ले जी करण्यात आलं. आणि पाकिटावरचं चित्रही बदलत गेलं. पुड्यावर आधी गायीचं अन गवळणीचं चित्र होतं त्याची जागा एका लहान मुलीनं घेतली होती. तुम्ही ऐकलं असेल तर मध्यंतरी पार्लेजी बाबत एक अफवा कानावर यायची. पार्ले जी बिस्कीट पुड्यावर जी लहान मुलगी आहे ना ती मुलगी म्हणजे जेष्ठ लेखिका सुधा मुर्ती आहेत. इन्फोसिसचे मालक नारायण मुर्ती यांच्या पत्नी. त्यांचाच लहानपणीचा फोटो पार्लेजी पुड्यावर आहे. 

हे काय खरं नव्हतं तर निव्वळ थापच होती….कारण पार्ले कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजर मयंक जैन यांनी स्वतः सांगितलेलं कि, ह्या चित्रातली मुलगी अस्तित्वातच नाहीये तर ते जस्ट एक इल्युस्ट्रेशन आहे.

पार्ले-जी पुड्यावरचा फोटो सुधा मूर्तींचा आहे ही गोष्ट शुद्ध थाप आहे. खरं काय ते वाचा.

८० च्या दशकात अर्थव्यवस्थेत बदल होत गेले आणि कंपनीने बिस्किटाची थोडीशी भाववाढ केली. आणि आश्चर्य म्हणजे, पार्लेजीची किंमत वाढवल्यामुळे लोकांनी पेट्रोल – डिझेलची भाववाढ झाल्यावर जशी आंदोलन होतात तशी आंदोलन  केली. शिवाय विक्रीही कमी झाली. शेवटी नाईलाजाने कंपनीला माघार घ्यावी लागली आणि पुन्हा आधी होते तेच भाव लागू करण्यात आले. 

पण या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे कंपनीला कळलं की आपलं प्रोडक्ट ‘ प्राइज सेन्सिटिव्ह’ आहे.

“५ रुपयांचा पार्ले जी” ही गोष्ट ग्राहकांच्या मनात अगदी पक्की बसली आहे….

भारतीय ग्राहक हा किमतीला प्रायोरिटी देतो. आणि हेच पार्ले कंपनीला बरोब्बर समजलं. आणि ठरलं त्यानंतर आजतागायत कंपनीने कधीच किंमत वाढवली नाही. तरी कंपनी फायद्यात कशी ?

शिवाय कंपनी ट्रान्सपोर्टेशनचा आणि पॅकेजिंगचा खर्च वाचवते. कंपनीच्या एकूण १० फॅक्टरीज आहेत….शहराच्या ६० किलोमीटरच्या आतच कंपनी फॅक्टरीज असतात जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. ज्या फॅक्टरीज शहरापासून लांब आहेत तिथे कंपनी थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग यूनिटही ऑपरेट करते. पॅकेजिंगच्या खर्चाबद्दल बोलायचं तर, पार्लेचं आवरण आधी कागदापासून बनवलं जायचं.  महागाई वाढत गेली तसा कागदाला भाव आला आणि कंपनीने कागदाऐवजी प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. 

तसेच पार्लेजी कंपनी हि मार्केटिंग च उत्तम उदाहरण म्हणायला लागेल. खेडं असो शहर असो  आजही पार्ले पुडा ५ रुपयालाही मिळतो आणि २ रुपयालाही मिळतो. कंपनीने ब्रँड व्हॅल्यू म्हणून प्रसंगी तोटा सहन केला. मग पार्लेजी ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करते का ? यासाठी कंपनीने एक स्ट्रॅटेजी वापरली. 

जरी कंपनीचं सिग्नेचर प्रोडक्ट पार्ले जी बिस्कीट असेल तरी होणारा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी इतर प्रीमियम प्रॉडक्ट विकते. जसे चीजलिंगस, hide and seek, मिलानो, Monaco, 20-20, बर्बन हि बिस्किटे त्यांना प्रॉफिट मिळवून देतात. आजही पार्ले कंपनीचा जागतिक बिस्कीट मार्केट मधला हिस्सा ६०% पेक्षाहि जास्त आहे.

१९९४ साली पार्लेजी बिस्कीट पुडा ४ रुपयाला मिळत होता आणि वजन होतं १०० ग्राम…. त्या आधी १०० ग्रामचाच पुडा ३.७५ पैशाला होता.

म्हणजे थोडक्यात मार्केटिंग फंडा असा वापरला कि, कंपनीने  बिस्किटांची किंमत वाढवली नाही तर बिस्किटाचे वजन आणि क्वांटिटी कमी केली. 

आजही पार्ले पुडा ५ रुपयालाच  मिळतो पण बिस्किटाचे वजन आता ५५ ग्राम मिळते.या ५ रुपयातील ३ रुपये कच्च्या मालासाठी वापरले जातात.  २० ते २५ % पैसे हे पॅकेजिंगसाठी वापरले जातात. या बिस्किटामधून प्रॉफिट मर्जिन खूप कमी ठेवलंय. ज्यामुळे भाव वाढवण्याचा प्रश्न कधी येत नाही आणि ग्राहक सुद्धा प्रॉडक्टशी जोडून राहिलेत.  २००३ साली पार्ले जी जगातलं सगळ्यात जास्त विकलं जाणारं बिस्कीट बनलं. तर २०१२ साली कंपनीने  फक्त पार्ले जी बिस्कीट मधूनच ५००० कोटींची विक्री केली.

आता तुम्हाला समजलं असेल कि, पार्ले बिस्कीट काय साधं सुध बिस्कीट नाहीये तर बिस्किटांचं एक मोठं साम्राज्यच आहे. मग पार्ले बिस्किटांची तुमच्या काय आठवणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायला विसरू नका. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

आता हे सगळं माहिती करूंन झालं तर मग आता इथून पुढे पार्ले जी वर काहीहि अफवा येऊ देत आपल्याला काय त्याचं आपल्याला बिस्किट खाण्याशी मतलब.

 

 

 

1 Comment
  1. प्रशांत भालेकर says

    पार्ले कंपनी बिस्कीटांची किंमत तीच ठेवताना पाकीटाचे वजन कमी करते, त्यामुळेच त्यांना परवडते.तसेच पार्ले जी बिस्कीटांची क्वालिटी ही काॅप्रोमाईज केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.