आज काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाणार…पण त्याची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ?

काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार? काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर आज ठरणार आहे. गांधी घराण्याने या निवडणुकीत उभा नं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन नॉन गांधी उमेदवारांत आता अध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. जरी निवडणुकांमध्ये तटस्थ राहण्यार असं सोनिया गांधी म्हटल्या असल्या तरी गांधी घराण्याने मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी पुढे केली असल्याचं सर्वश्रुत आहे. तर त्यांच्या विरोधात शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढाईला उतरले आहेत.

त्यामुळे काँग्रेसचे नेतेच नाही तर इतर पक्षातील नेत्यांना देखील याची उत्सुकता लागलीये कि काँग्रेसचं नेतृत्व कुणाच्या हातात येईल.पण महत्वाचा प्रश्न म्हणजे, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला जातो आणि त्याची प्रक्रिया काय आहे, हे आपण पाहुया…

काँग्रेस पक्षाच्या संविधानात पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सांगितली आहे. पक्षाच्या संविधानानुसार, काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या समित्यांचा मिळून बनलेला आहे. त्यातील कमिट्या हा पक्ष संघटनेसाठी महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे,

  • अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC)
  • काँग्रेस कार्यकारिणी (CWC)
  • प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी)
  • जिल्हा व ब्लॉक काँग्रेस कमिटी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये सुमारे १५०० सदस्य आहेत. हेच सदस्य CWC च्या २४ सदस्यांची निवड करत असतात. संपूर्ण भारतामध्ये एकूण ३० प्रदेश काँग्रेस समित्या आहेत, ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये समित्या आहेत. या सर्व समित्यांमध्ये ९००० पेक्षा जास्त सदस्य आहेत.

यातील कोणत्या समितीकडे पक्षाचा अध्यक्ष निवडीची जबाबदारी असते ?

काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार, काँग्रेसमध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी सीडब्ल्यूसी म्हणजेच काँग्रेसची वर्किंग कमिटी ज्यात पक्षाचे वरिष्ठ नेते असतात. ही कमिटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करते. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या सदस्यांची प्रथम नियुक्ती केली जाते. काँग्रेस कार्यकारिणी या प्राधिकरणाची स्थापना करते, ज्यामध्ये ३-५ सदस्य असतात. यापैकी एका सदस्याला त्याचे अध्यक्ष केले जाते. सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री हे काँग्रेस पक्षात निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेचे अध्यक्ष आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पक्षाच्या कोणत्याही सदस्याला लढवता येते मात्र अध्यक्षपदासाठी उभा राहणाऱ्या उमेदवारासाठी अट म्हणजे, त्या सदस्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किमान १० सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक असतं. किंव्हा प्रदेश काँग्रेस कमिटीचे १० सदस्य एकत्र येऊन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नाव सुचवू शकतात.

ज्या उमेदवाराला प्रदेश काँग्रेस समितीच्या १० सदस्यांचा पाठिंबा असतो असा सदस्य उमेदवारीसाठी पात्र ठरतो.

पक्षअध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदा केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांना रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. या ऑफिसरसमोर अध्यक्षपदांसाठीच्या उमेदवारांची नावे ठेवली जातात. 

२४ ते ३० सप्टेंबर या ७ दिवसांच्या आत जर कुणी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आणि अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार बाकी उरला तर त्याच उमेदवाराला अध्यक्ष म्हणून घोषित केले जाते. त्यामुळे यावेळीही असलाच काही प्रकार घडणार का याचं उत्तर ८ ऑक्टोबरलाच मिळेल कारण या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

मात्र, जर उमेदवार एकापेक्षा अधिक असतील तर मात्र केंद्रातील काँग्रेस कार्यकारी समिती आणि राज्यातल्या प्रदेश काँग्रेस समित्या निवडणुकीत भाग घेतात.

ही प्रक्रिया जटील स्वरूपाची असते. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत २ किंव्हा ३ उमेदवार असले तर रिटर्निंग ऑफिसर ती नावे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवतात. मतदान प्रक्रियेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य भाग घेतात. ही मतदान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हेड ऑफिसमध्ये पार पडतं. मतपेटीद्वारे निवडणुका घेतल्या जातात.

मतदारांना कोणत्याही एकाच उमेदवाराचे नाव पेपरवर लिहून मतपेटीत टाकावे लागते.  जर अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोनपेक्षा जास्त उमेदवार असतील तर पसंती क्रमांक १ आणि पसंती क्रमांक २ अशा पद्धतीचे पसंती क्रमांक टाकावे लागतात. दोनपेक्षा कमी पसंतीक्रम लिहिला तर त्या मतदाराचं मत अवैध ठरवलं जातं. मतदार दोनपेक्षा जास्त पसंती देऊ शकतात.

मतदान पार पडल्यानंतर सर्व ३५ काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्यालयातल्या मतपेट्या दिल्लीतल्या एआयसीसीच्या कार्यालयात पाठवल्या जातात. इथे रिटर्निंग ऑफिसरच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होते.

पसंती क्रमांक १ चे मते मोजली जातात. ज्या उमेदवाराने पहिल्या क्रमांक १ च्या मतांचा ५० टक्के मतांचा कोटा पूर्ण केला नाही तर त्या उमेदवाराचे नाव यादीतून काढून टाकले जाते.  ज्यांना पसंती क्रमांक १ ची मतं ५० टक्क्यांहून अधिक मिळाली असतील तर त्या उमेदवाराला अध्यक्ष म्हणून घोषित केले जाते. निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

मात्र अशा प्रकारे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची वेळ इतिहासात कधी आलीय का ?

काँग्रेसमध्ये केवळ दोनदाच खर्‍या अर्थाने निवडणुका झाल्या आहेत. 

पहिल्यांदा १९९७ मध्ये, जेंव्हा शरद पवार आणि राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेंव्हा सीताराम केसरी जवळपास ७० टक्के मतांनी विजयी झाले होते. हंसराड पवारांना ८८२ आणि पायलट यांना ३५४ मतं मिळालेली तर सीताराम केसरी यांनी ६,२२४ मतं घेत आरामात निवडणूक जिंकली होती.

दुसरी २००० साली, अध्यक्षपदासाठी जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवली होती तेंव्हा त्यांना पक्षातून मोठा विरोध झालेला. प्रचारादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तरी त्यांनी निवडणूक लढवली आणि फक्त ९४ मतं घेत दारुण पराभवाला सामोरे गेले तर सोनिया गांधींना  ७,४४८ मतं मिळाली होती आणि त्या अध्यक्ष बनल्या होत्या. 

२००० नंतर, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना कधीही निवडणुकीसाठी सामोरं जावं लागलं नाही. आता मात्र थरूर विरुद्ध खर्गे निवडणूक झाल्येत काँग्रेसच्या पडझडीच्या काळात पक्षाला नव्याने उभारी देणारा नेता काँग्रेसला अध्यक्ष म्हणून मिळणार हे आता १९ तारखेला निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.