बाप गेला, पक्ष गेला, चिन्हही गेलं पण तरीही हा नेता लढला…

निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मोठा धक्का देणारा निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाचंच असल्याचा अंतिम निर्णय दिला. थोडक्यात उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता तर गेलीच शिवाय, पक्ष गेला आणि चिन्हही गेलं. 

आपल्या वडिलांनी स्थापन केलेली शिवसेना अखेर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना सुटली….!

उद्धव ठाकरेंपुढे आणखी काय वाढून ठेवलेलं असणार ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कळेलच मात्र पण यातून उद्धव ठाकरे कसे सामोरं जाणार ? 

उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष पाहता आणखी एका नेत्याची आठवण येते ते म्हणजे आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी.

त्यांच्या वडिलांचं मुख्यमंत्री पदावर असतांना अपघाती निधन झालं. त्यानंतर जगनमोहन रेड्डी पक्षात एकटे पडले, स्वतःच्याच पक्षाने जगनमोहन रेड्डी यांना साथ दिली नाही. शेवटी ते पक्षातून बाहेर पडले. पुन्हा उभे राहिले, लढले आणि यशस्वी झाले. आज त्यांच्याकडे आंध्र प्रदेशातले १७५ पैकी १५१ आमदार आहेत.

जगनमोहन रेड्डी यांचे वडील म्हणजे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी. त्यांची सामान्य जनतेमध्ये ‘लोकनेता’ अशी ओळख होती. राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नसताना  वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांनी आपली पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. पुढच्या दोनच वर्षात ते ग्रामविकास मंत्री झाले. त्यानंतर ते आयुष्यात एकही निवडणूक हरली नाही.

आंध्रप्रदेशमध्ये ज्यावेळी फिल्म स्टार एन.टी.रामाराव यांच्या तेलगु देसम पक्षाने काँग्रेसचा दारूण पराभव केला होता अशा काळात वाय.एस.आर यांनी आपल्या पुलीवेन्डला या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. स्वतः इंदिरा गांधींनी या तरुण नेत्याच्या खांद्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती. पुढे १९९२ साली मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचा विश्वास संपादन करू न शकल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकले होते.

१९९५ साली एन टी रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. चंद्राबाबुंनी हैद्राबादला आयटी सिटी बनवायचा चंग बांधला खरा पण या नादात त्यांचे ग्रामीण भागाकडे पुरते दुर्लक्ष झाले. याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

वाय.एस. रेड्डी यांनी ही परिस्थिती अचूक हेरत चंद्राबाबुंच्या विरोधात रान उठवले आणि २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देत वाय.एस.आर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

शेतकऱ्यांना मोफत वीज देणे, गरिबांना पेन्शन, दोन रुपयात तांदूळ, ग्रामीण भागात कमी खर्चात घरे, नक्षलवादी चळवळीला पायबंद घालणे, केंद्र शासनाची ‘रोजगार हमी योजना अशा लोकप्रिय योजना आणत त्यांनी जनतेची नस अचूक पकडली होती. राज्यातच काय तर केंद्रातल्या पक्षश्रेष्टींना देखील वाय.एस.आर यांचे आंध्र प्रदेशमधले वर्चस्व मान्य करावे लागले होते.

२००९ साली त्यांनी सलग दुसऱ्या वेळी आंध्र प्रदेशची विधानसभा खेचून आणली. आणि राज्यात काँग्रेस पक्ष अजूनचच स्ट्रॉंग झाला. पण…२००९ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत वाय. एस. आर रेड्डी यांचं निधन झालं…२ सप्टेंबर २००९ रोजी मुख्यमंत्री रेड्डी राज्याच्या दौऱ्यावर निघाले होते. सोबत राज्याचे मुख्य सचिव सुद्धा होते. ‘बेगमपेट’ विमानतळावरून त्यांच्या हेलीकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र थोड्याच वेळात खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलीकॉप्टरचा कंट्रोल रूमशी असलेला संपर्क तुटला. ‘नाल्लामला’ डोंगर रांगांमधील दुर्गम जंगलात त्यांचे हेलीकॉप्टर गायब झाले.

हा परिसर नक्षलवाद्यांचा कोअर भाग असल्यामुळे शोध मोहिमेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. वायुदलाच्या सुखोई विमानाची मदत घेण्यात आली. शेवटी २४ तासांच्या शोधानंतर वाय.एस.आर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह सापडले….

वाय.एस.आर रेड्डी यांचं निधन झालं, त्यांच्या निधनाने काँग्रेसला आंध्र प्रदेशात घरघर लागली. इथूनच पुढे जगन मोहन रेड्डी यांचा राजकीय संघर्ष सुरु झाला.. वाय.एस.आर यांच्या जाण्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते प्रयत्न करत होते त्यात जगनमोहन रेड्डी देखील होते.

वडीलांच्या नंतर आपल्यालाच मुख्यमंत्री करावं यासाठी ते दिल्लीला हायकमांडकडे चकरा मारत होते. खरं तर त्यांचे वडील वाय.एस.आर रेड्डी हयात असतानाच जगनमोहन मुख्यमंत्री बनावेत यासाठी फिल्डींग लावत होते.

जगन मोहन यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट घेतली, पण त्यांचं काही जमलं नाही. १७७ पैकी १७० आमदारांनी जगन मोहन रेड्डी यांना पाठिंबा दिला. तरी काँग्रेसने बंडखोरीकडे दुर्लक्ष करून ‘रोसय्या’ यांना राज्याचे नवीन मुख्यमंत्री केलं.

याही आधी म्हणजेच २००४ मध्येच जगनमोहन यांना कडप्पामधून खासदार व्हायचं होतं, पण काँग्रेस हायकमांडने त्यांच्या मुद्द्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी २००९ पर्यंत वाट पाहिली. थोडक्यात आपल्याच पक्षात जगनमोहन यांना अपमानित व्हावं लागलं. 

यात भर पडली जेव्हा जगनमोन रेड्डी यांनी आपल्या वडिलांच्या अपघातात जे इतर सहकारी मृत्यू पावले होते त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी यात्रा काढायचं ठरवलं मात्र या यात्रेला केंद्र सरकारने परवानगी नाकारली. आणि केंद्रात सत्ता होती होती काँग्रेसची.

मात्र तरीही रेड्डी यांनी यात्रा काढलीच आणि दुसऱ्याच दिवशी एक भावनिक पत्र लिहिलं, काँग्रेसमध्ये आपला सातत्याने अपमान होतो त्यामुळे मी काँग्रेस सोडतोय…आपल्या राज्यात वडिलांनी मोठा केलेला काँग्रेस पक्ष जगनमोहन रेड्डी यांना सोडावा लागला..पक्ष गेला..पक्षासोबत पक्षाचं चिन्हही गेलं.. पण जगनमोहन रेड्डी यांनी आपलं साम्राज्य पुन्हा एकदा उभारायला सुरुवात केली.

आणि २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या नावाने वायएसआर काँग्रेस हा नवीन पक्ष स्थापन केला.

२०१२ मध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि १८ पैकी १५ जागा जिंकल्या. त्यांचा नवीन पक्ष हातपाय पसरत होता, त्यांची राजकीय सत्ता वाढतच होता कि याच दरम्यान कायदेशीर पेचप्रसंगाने त्यांना सगळ्या बाजूनी घेरलं होतं.

२०१२ साली त्यांना सीबीआयने बेनामी संपत्तीप्रकरणी अटक केली. भ्रष्टाचाराच्या अटकेमुळे जगन मोहन रेड्डी यांच्या प्रतिमेचं मोठं नुकसान झालं. १६ महिने ते तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जगन मोहन यांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी दिवसरात्र एक केले आणि सत्ताधारी पक्ष टीडीपीच्या उणिवा जनतेसमोर आणल्या.

यातच २०१४ च्या निवडणूक आल्या. आंध्र प्रदेशच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकदाच पार पडत असतात. याच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने राज्यातील ९ जागा जिंकल्या तर विधानसभा निवडणुकीत ७० जागा जिंकल्या होत्या. आणि मूळ काँग्रेसऐवजी ‘वायएसआर काँग्रेस’ हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता…

सत्ताधारी पक्षावर एकच घाव टाकायचा होता अन तो घाव म्हणजे पदयात्रा. बस्स… जगनमोहन रेड्डी यांनी देखील पदयात्रेची घोषणा केली.

आंध्रप्रदेशमध्ये पदयात्रांना किती महत्व आहे, हे वायएसआर रेड्डी यांनी दाखवून दिलं होतं. जगनमोहन रेड्डी यांनी ‘प्रजा संकल्प यात्रा’ या नावाने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पदयात्रा सुरू केली. कडप्पा ते श्रीकाकुलम अशी पदयात्रा काढली. संपूर्ण आंध्र प्रदेशभर त्यांनी प्रवास सुरू केला. हा प्रवास १४ महिने चालला. एकूण ३,६४८ किलोमीटरची ही पदयात्रा होती….आपल्या दिवंगत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पदयात्रेत आंध्र प्रदेशातील १३ जिल्ह्यांचा दौरा केला आणि १७५ पैकी १३६ विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचून लोकांशी संपर्क साधला..

यादरम्यान १२४ जाहीर सभा आणि ५५ सामुदायिक सभा घेतल्या. जनतेशी थेट संपर्क साधला. ज्यामुळे त्यांच्या बाजूने वातावरण तयार झालं. मतदारांसमोर जाऊन ‘घर तक सरकार’ आणि सत्तेचं विकेंद्रीकरण अशी आश्वासनं दिली. या यात्रेचा परिणाम हवा तसाच झाला..

२०१९ च्या निवडणुकांचे निकाल लागले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने राज्यातल्या लोकसभेच्या एकूण २५ जागांपैकी २२ जागा मिळवल्या. तर विधानसभा निवडणुकीत एकूण १७५ जागांपैकी १५१ जागा जिंकल्या.. आणि अशाप्रकारे काँग्रेस पक्षाच्या नाकावर टिच्चून १० वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करत जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले….

आज मात्र वायएसआर कॉंग्रेस हा आंध्र प्रदेशमधला सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. आज जनमोहन रेड्डी आपल्या वडिलांप्रमाणेच लोकप्रिय नेते आहेत. हे असतं लढणं, हे असतं जिंकणं.. वडिल गेले, चिन्ह गेलं, पक्ष गेला तरी हा माणूस जिंकला.. म्हणूनच इतिहासात कायमच त्यांची दखल घेतली जाईल हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.