शोलेच्या प्रोड्युसरला घाम फोडणारी “संतोषी माता”
साल होत १९७५.
रमेश सिप्पीचा अमिताभ, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमामालिनी, जया भादुरी असा मल्टीस्टारर “शोले” रिलीज झाला होता. सिप्पींचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट. सलीम-जावेदचे स्क्रिन प्ले डायलॉग होते. जंजीर,दिवारच्या यशामुळं बच्चनआधीच सुपरस्टार बनला होता. सगळ्यांच्याच या पिक्चरकडून खूप अपेक्षा होत्या. पिक्चर पण तसा भारीच होता. पण सुरवातीला या पिक्चरला म्हणावं तसं यश मिळेना झालं होत. याला कारण होती संतोषी मां !
शोले रिलीज झाला तेव्हा “जय संतोषी मां” हा पिक्चर आधीच थिएटर गाजवत होता. या पिक्चरची स्टारकास्ट अनोळखी होती, डायरेक्टर नवीन होता. पण तरीही लो बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याकाळात सिनेमाघरात अक्षरशः वादळ आणलं होत. या पिक्चरची नशा उतरेपर्यंत शोलेकडे पाहायला कोणी तयार नव्हते. अखेर जेव्हा हा सिनेमा थिएटरमधून उतरला तेव्हा शोलेनं वेग पकडला आणि त्या पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.
देवीचा चमत्कार, पौराणिक पात्रे, गणपतीच्या डेकोरेशन सारखा सेट अशी रेलचेल या चित्रपटात होती. जय संतोषी मां बनवताना डायरेक्टर विजय शर्मा आणि प्रोड्युसर सतराम रोहरा यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता की पिक्चर एवढा हिट होईल.” सत्यवती नावाच्या अबलेला दुःखातून बाहेर काढण्यासाठी संतोषी माता स्वतः पृथ्वीवर येते आणि तिला सोळा शुक्रवारचं व्रत करायला सांगते” अशी बेसिक स्टोरीलाइन होती. अनिता गुहा या अशाच पौराणिक भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने संतोषी मातेचा रोल केला होता. स्वतः तिला हा पिक्चर साईन करण्या आधी संतोषी माता माहित नव्हती.
काय झालं, कसं झालं कोणालाही कळाल नाही पण अचानक या सिनेमाची चर्चा सुरु झाली. लोक थिएटरच्या बाहेर पिक्चर पाहण्यासाठी रांगा लावू लागले. यातले अनेक जन मंदिरात प्रवेश करतो तसे बाहेर चपला काढून थिएटरमध्ये येऊ लागले. मोठ्या स्क्रिनकडे पाहून देवीची आरती ओवाळली जाऊ लागली. लोक थिएटर मालकांनी ठेवलेल्या दानपेटीत देवीला दक्षिणा वाहू लागले. खेडोपाड्याहून बैलगाड्या भरून बायामाणसे शहरात देवीचा पिक्चर बघायला येत होते.
अनिता गुहाला खरोखरची देवी माता समजून लोक तिला लोटांगण घातलं जायचं. मुंबईच्या बांद्रासारख्या हायफाय वस्ती मध्ये कधी असला पौराणिक चित्रपट चालला नव्हता पण तिथं सुद्धा थिएटरमध्ये ५० आठवडे जय संतोषी मां हाउसफुल चालला. असं म्हणतात की डायरेक्टर विजय शर्माची बायको संतोषी मातेची भक्त होती. तिची इच्छा म्हणून हा चित्रपट बनवण्यात आला.
या पिक्चरबद्दल जेवढ्या कथा आणि दंतकथा पसरल्या असतील तेवढ्या दुसऱ्या कुठल्याच पिक्चर बद्दल पसरल्या नाहीत. अनेक समाजमानसशास्त्रज्ञ , चित्रपटांचे अभ्यासक यांनी या पिक्चरच्या भारतीय मानसिकतेच्या प्रभावाबद्दल संशोधन केले. यातून बर्याच गोष्टी पुढे आल्या. भारतात पूर्वी संतोषी मातेची मंदीर खूप कमी होती.
अमेरिकेच्या बर्नार्ड कॉलेजचे प्रोफेसर जॉन हाॅली यांच्या मते अख्ख्या भारतात या पिक्चरच्या पूर्वी संतोषी मातेचं एकच मन्दिर होत. जोधपुर मध्ये असलेल्या या मंदिरातली देवी संतोषी माताच आहे यावर सुद्धा वाद होते. पण हा पिक्चर रिलीज झाला आणि संपूर्ण भारतभर संतोषी मातेच्या भक्तीची लाट पसरली. ठीकठिकाणी मंदिर स्थापन करण्यात आली.
उत्तर भारतात पूर्वी सोळा शुक्रवारच व्रत केलं जायचं पण जय संतोषी मां पिक्चरच्या यशानंतर सगळीकडे महिला हे व्रत करू लागल्या. घरात सुखशांती लाभू दे म्हणून सोळा शुक्रवार कडक उपवास केला जाऊ लागला. या चित्रपटात उषा मंगेशकर यांनी गायलेलं “मै तो आरती उतारू रे संतोषी माता की” हे गाणंं एवढ पॉप्युलर झालं की संतोषी मातेची आरती म्हणून हेच गाण म्हटल जातंं.
पाच लाख बजेटच्या या पिक्चरनं ५ कोटी रुपये कमवले होते. अनिता गुहाला फक्त २० मिनिटाच्या रोलसाठी अख्ख्या देशभर प्रसिद्धी मिळाली.
या सिनेमाच सक्सेस ना विजय शर्माला रिपीट करता आलं ना अनिता गुहाला. ‘जय संतोषी माता’च्या फॉर्म्युलावर अनेकांनी जय आंबे मां, जय करोली माता, महालक्ष्मी असे अनेक चित्रपट काढले. २००६ साली संतोषी मां पिक्चरचा रिमेक ही येऊन गेला. पण ते यश परत कोणालाच मिळालं नाही.
हे ही वाच भिडू
- या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !
- बिच्छु, बादल आणि जीवन मामा..
- शितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं नाव पडलं.
- स्वत:ची राजकीय पार्टी काढून बॉलीवूडला जागं करणारा देवआनंद !