छोटंसं जालना शहर ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ म्हणून उदयास येण्याच्या मागचा इतिहास असाय…

तुम्ही कधी जालन्याला गेलाय का? मराठवाड्यातलं जालना..

जालना हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. पण जालन्याची तुलना कोल्हापूर-औरंगाबाद-नाशिक अशा इतर शहरांसोबत केली तर तुम्हाला हे तालुक्याचं गाव वाटेल. बरं महाराष्ट्रातले काही तालुके देखील सांगू बारामती, इचलकरंची असे तालुके. या तालुक्यांच्या गावापेक्षा जालना छोटंय.

पण..पण..पण..

जालना तरिही राज्यात सर्वात बाप आहे. कारण इथं भरपूर पैसा आहे. काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्सच्या छाप्यात याच जालन्यात ५८ कोटींची कॅश, ३९ किलो सोनं सापडलं होतं. ३९० कोटींची संपत्ती जप्त केल्याची बातमी देखील होती. बरं हे फक्त आत्तापुरतं आहे का तर नाही..

जेव्हा राममंदीरासाठी देशभरातून वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम चालू होता तेव्हा एकट्या जालन्यातून १३ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी गोळा झाली होती..

थोडक्यात जालना शहर म्हणून बारकं वाटतं असेल, विकास झाला नसेल तर जालना हे महाराष्ट्रातलं गब्बर पैसेवालं शहर आहे..

पण हे का? कसं? तर त्याचं कारण आहे…

 स्टील उद्योग. जालना शहरात असणारे स्टीलचे कारखाने… 

साहजिक प्रश्न पडतो. जालना पार तिकडं औरंगाबादच्या पण पलीकडं. गोल्डन ट्रॅन्गलमध्ये येणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक सोडून पश्चिम महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा सोडून आणि नागपूर सारख्या देशाची कनेक्टिव्हिटी असणाऱ्या शहराला सोडून पोलाद उद्योग जालन्याला कसा गेला आणि इतका कसाकाय वाढला..

तर याची सुरवात होते एका माणसापासून..

जालन्यामध्ये स्टील इंडस्ट्रीची सुरुवात झाली ७० च्या दशकात. १९७० च्या काळात त्यांना स्टील उद्योगात व्हिजन दिसलं अन् त्यामुळेच जालना शहर स्टील उद्योगात उभा राहू शकलं. 

१९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या रोटी, कपडा और मकान या त्रिसूत्रीला लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात दौरा केला होता. या दौऱ्याच्या दरम्यान एका महिन्यात दोन लाख रुपये गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारता येईल का? यावर चर्चा करण्यात आली. तेव्हा शांतीलाल पित्ती यांनी हे शिवधनुष्य उचललं होतं. 

शांतीलाल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. शांतीलाल पित्ती यांचे वडील भोलाराम पित्ती हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात राहत होते. या परिवाराचा ‘जालना ट्रान्सपोर्ट’ नावाने वाहतुकीचा व्यवसाय होता. जवळपास १६ ट्रक त्यांच्याकडे होते. म्हणून त्यांना २ लाख रुपये उभारायला जास्त अडचण आली नाही आणि त्यांना स्टील उद्योग उभारण्याचं लायसन्स मिळालं. 

१९८५ पासून इंडस्ट्रिअल कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या कुमार देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार…

स्टील उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल त्यावेळी दोन मार्गांनी येत होता. पहिला म्हणजे रेल्वे. रेल्वेच्या टाकाऊ रुळांचा लिलाव केला जायचा. मनमाड, भुसावळ अशा ठिकाणी रेल्वे रुळांचे लिलाव व्हायचे तेव्हा लोक ते विकत घ्यायचे आणि पित्ती यांच्या स्टील प्लांटला विकायचे. त्यानंतर पित्ती त्यांना छोट्या आकारात कापून त्यावर प्रक्रिया करायचे.

दुसरा मार्ग म्हणजे शिप ब्रेकिंग.. मुंबई, भावनगर, जामनगरला होणाऱ्या शिप ब्रेकिंगच्या ठिकाणाहून प्लेट्स आणले जायचे आणि मग त्यावर प्रक्रिया करून स्टीलचे रोल तयार केले जायचे. 

त्यावेळी दिवसाचं जास्तीत जास्त उत्पादन हे ४ टन होतं. 

गेल्या ४० वर्षांपासून जालन्याच्या पत्रकारितेचा अनुभव असलेले आणि गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्या माहितीनुसार…

पित्ती या क्षेत्रात उतरले तेव्हा कोळशाच्या छोट्या भट्टीवर लोखंड वितळवलं जात होतं. त्यापासून मग नांगराचा फाळ वगैरे तयार केला जायचा. शांतीलाल पित्ती यांनी लोखंड गाळणारे, त्याचा रस करून मोल्डिंग करणारे कारागीर पंजाबमधून आणले होते. व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारं सर्व भांडवल पंजाबमधून त्यांनी आयात केलं. 

१९८० च्या दशकात इलेक्ट्रिक भट्ट्या या क्षेत्रात आल्या, ज्याला फर्नेस असं म्हटलं जातं. मग विजेच्या आधारे लोखंड वितळवण्याची प्रक्रिया सुरु झाली. याने उत्पादनक्षमता अचानक वाढली. 

परिणामी १९८० ते ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणात या इंडस्ट्रीने जालन्यात मूळ धरायला सुरुवात केली.  हळूहळू एकाला बघून दुसऱ्याने या क्षेत्रात उतरायला सुरुवात केली आणि स्टील उद्योगाचे ग्रुप उभे राहिले. माहेश्वरी, अग्रवाल, गोयल अशी कुटुंबं या क्षेत्रात उतरली. १९८४ मध्ये पित्ती यांनी एसआरजे या नावाने औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक वसाहतीत उद्योग उभा केला. 

मग राजुरी स्टील, मेटारोल, कालिका असे स्टील कारखाने जालन्यात उभे राहिले. 

हे सर्व स्टील उद्योगात उतरलेले लोक मारवाडी समाजाचे व्यापारी आहेत. २००-३०० वर्षांपूर्वी ते हरियाणा, राजस्थान या भागातून स्थलांतरित झालेले होते. त्या भागांमध्ये पाणी नसणं, दुष्काळासारख्या समस्या आल्या तेव्हा हे मारवाडी समाजाचे लोक महाराष्ट्रात मायग्रेट झाले होते. आजही या समाजाचे कुलदैवत हरियाणा, राजस्थान इथे आहेत. वर्षातून एकदा मारवाडी समाजाचे लोक त्या ठिकाणाला भेट देतात. 

व्यवसायासाठी या समूहाने महाराष्ट्राला निवडलं होतं. उदाहरणार्थ, हरियाणातून आलेले अग्रवाल तूप, कापूस याचा व्यवसाय करायचे. पिढीजात धंद्यात असलेले, धंद्याचा अनुभव असलेले लोक जालन्याच्या स्टील व्यवसायात उतरले होते.

सुरुवातीला लोखंड वितळवून लांब पाईपसारखा चौकोनी ठोकळा तयार केला जायचा. त्याला ‘अँगट’ असं म्हटलं जायचं. अँगट तयार करून त्याला पुन्हा तापवून मग त्याच्यापासून बांधकामाच्या सळया तयार केल्या जायच्या. 

जेव्हा या व्यवसायात मारवाडी समाजाची दुसरी पिढी उतरली तेव्हा शिक्षित असल्यामुळे या व्यवसायाला त्यांनी अजून प्रगत केलं. १९९० च्या दशकात जालन्यात पहिल्यांदा TMT ही जर्मन टेक्नॉलॉजि आली. याने काय झालं? यामुळे सळया तयार करताना लोखंड कमी प्रमाणात वापरलं जाऊ लागलं शिवाय गुणवत्ता देखील वाढली. म्हणून त्याची मागणी वाढली. 

तंत्रज्ञान आणि नाविण्यपूर्ण संशोधनाचा अविष्कार करत मारवाडी समाजाच्या पुढील पिढीने हा उद्योग संपूर्ण देशभरात अव्वल स्थानावर नेला आहे. आज विदेशातून ऑर्डर येऊ लागल्या आहेत. 

गेल्या १२ वर्षांपासून जालन्यात कार्यरत असलेले एबीपी माझाचे पत्रकार रवी मुंडे यांच्या माहितीनुसार… 

राजस्थानवरून आलेला मारवाडी समाज जालन्याच्या स्टील उद्योगात उतारला तेव्हा डायरेक्ट स्टील उत्पादित नव्हतं होत. लोखंडी रॉड तयार होण्याच्या आधीची एक प्रोसेस असते ज्यात ब्लेड्स तयार केल्या जातात. या ब्लेड्स सुरुवातीला उत्पादित केल्या जात होत्या. त्यांची निर्मिती करून या ब्लेड्स इतर स्टील इंडस्ट्रीत विकल्या जायच्या.

१९८५ च्या दरम्यान केवळ ३-४ व्यापारी या क्षेत्रात उतरले होते. खूप वेगळ्या सुविधांची गरज असलेला हा बिजनेस नाही. या उद्योगासाठी लागणारं रॉ मटेरियल जसं की, पाणी, वीज आणि भंगार हे सहज जालन्यात उपलब्ध होत होतं. कच्च्या मालासाठी जास्त खर्च करावा लागला नाही. 

रेल्वे सुविधा असल्यामुळे कच्चा माल मिळणं सोपं होतं. मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक होते. आधी उत्पादन घेण्यासाठी कोळसा लागायचा तो देखील रेल्वेने मिळायचा. तर निर्यातीसाठी मुख्यतः ट्रक वापरल्या जातात त्या ट्रक देखील उपलब्ध होत्या. म्हणून या उद्योगाला जालन्यात एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागला नाही.

जालन्यातील विनोदराय इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील रायठठ्ठा यांच्या माहितीनुसार… 

फक्त मेहनत आणि प्रॉपर मॅनेजमेंटच्या जोरावर ही इंडस्ट्री उभी करणं मारवाडी समाजाला जमलं आहे.

सगळ्या महाराष्ट्राच्या घरातून जे भंगार निघतं आणि आपण ते विकतो तिथून जालन्याच्या स्टील इंडस्ट्रीचा प्रवास सुरु होतो. हातगाडीवर जे भंगार आपण विकतो ते भंगार स्थानिक ठिकाणावरील होलसेलरला विकलं जातं. अशा वेगवेगळ्या भंगार वाल्यांकडून खरेदी झाल्यानंतर आठवडाभरात ट्रक भरून भंगार जालन्याला पाठवलं जातं. 

तिथे त्या भंगाराला वितळवून कामात येईल, असं लोखंड तयार केलं जातं. फक्त महाराष्ट्राच्या नाही तर देशभरातील इतर राज्यांमधील स्क्रॅप देखील जालन्याच्या कारखान्यांत आणलं जातं आणि म्हणून जालना ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास आलं आहे. 

स्टील इंडस्ट्रीमुळे ट्रान्सपोर्ट बिजनेस देखील इथे उदयास आला आहे, असं रायठठ्ठा म्हणालेत. 

आज जालना हे असं शहर बनलं आहे की, इथे स्टीलचा जो भाव ठरतो तो देशभरात लागू केला जातो. जवळपास १४ मोठे प्लांट इथे आहेत आणि २२ छोटे प्लांट आहेत. जवळपास १० ते १२ हजार मेट्रिक टन एका दिवसाचं उत्पादन आहे. रोज ५ हजार ट्रक जालन्यातून बाहेर जातात आणि आत येतात. 

जालन्यात प्रत्यक्ष पंधरा हजार आणि अप्रत्यक्ष पन्नास हजार व्यक्तींना रोजगार या उद्योगाने दिला आहे. 

यातील बहुतांशी कारागीर हे ओडिसा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढचे आहेत. फक्त १०% महाराष्ट्राचे कारागीर आहेत आणि ते देखील मारवाडी समाजाचे असल्याचं संगितलं जातं.

दर महिन्याला दिडशे कोटी रुपयांची वीज, शंभर कोटी रुपयांच्या पेक्षा अधिक जीएसटी कर आणि खाजगी कंपनीच्या वतीने कोट्यावधी रुपयांच्या आयकराचं उत्पन्न जालन्यातून सरकारच्या तिजोरीत जमा होतं.

जागतिक बाजारात चीनपेक्षा जालन्याचं लोखंड स्वस्त असल्याने आंतरराष्ट्रीय मागणी देखील आहे.

अन् हे एका माणसाच्या व्हिजनमुळे झालंय. एक साधं आणि छोटं गाव आज रग्गड पैसेवालं झालं आहे त्यामागे इतका मोठ्ठा इतिहास होता..

  • भिडू वैष्णवी राऊत

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.