वय होऊन भली भली थकली, जेम्स अँडरसन मात्र आजही त्याच जोशात कसा खेळतोय..?
सध्या भारतात आयपीएल सुरु आहे, जगभरातले कित्येक रथी-महारथी आयपीएलमध्ये घाम गाळतायत. बरं रिटायर झालेले प्लेअर्स भले खेळत नसले तरी कोच म्हणून डगआऊटमध्ये दिसतातच, मग त्यात स्टेन आहे, मुरली आहे आणि भली मोठी यादी.
पण मागच्या १५ वर्षात आयपीएलकडे न फिरकलेला आणि सध्याही कौंटी क्रिकेटमध्ये खतरनाक बॉलिंग करणारा कार्यकर्ता म्हणजे, जेम्स अँडरसन.
सहा फूट दोन इंच उंची, करडे डोळे, पांढरी होत चाललेली दाढी आणि चेहऱ्यावर दिसणारे वाढलेल्या वयाचे पुरावे… हे झालं सध्याच्या जेम्स अँडरसनचं वर्णन. पण २००३ जेव्हा अँडरसन पहिली टेस्ट मॅच खेळला तेव्हा, अगदी हडकुळा होता, केस रंगवून त्याचा कोंबडा केलेला. या १९-२० वर्षांमध्ये एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे अँडरसनचा बॉल हातभर स्विंग होणं आणि त्याच तडफेनं क्रिकेट खेळणं.
अँडरसनचं टेस्ट करिअर संपलंय अशी चर्चा कायम होते खरी, पण हा गडी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करतोय.
अँडरसन किती जुना आहे?
हे सांगायचं झालं तर त्यानं इंग्लंडसाठी पदार्पण केल्यानंतर तब्बल ९२ क्रिकेटर्सला इंग्लंड कॅप मिळाली. अँडरसनच्या नंतर पदार्पण केलेला ब्रेंडन मॅक्युलम, रिटायरमेंट घेऊन इंग्लंडचाच कोच झाला. थोडक्यात कोचपेक्षा जास्त अनुभव अँडरसनकडे आहे.
या इतकी वर्ष खेळण्यामागं नेमकी कारणं काय आहेत..?
पहिली गोष्ट म्हणजे फिटनेस. आजच्या घडीला अँडरसन ३९ वर्षांचा आहे, पुढच्याच महिन्यात ४० चा होईल. कुठल्याही क्रिकेटरला दुखापतींच्या फेऱ्यातून जावं लागतंच, तसं अँडरसनलाही जावं लागलं होतं. त्यात तो पडला पेस बॉलर, त्यामुळं इंज्युरीजचं प्रमाणही जास्त, तरीही अँडरसन टिकला.
वयाच्या या टप्प्यात सेशनला ७-८ ओव्हर्सचा स्पेल टाकणं सोपं नसतंय. दम लागतो, एनर्जी संपते आणि या सगळ्यात लाईन अँड लेंथ हरवते. अँडरसन नुसता टप्पा मास्टर नाहीये, त्याला बॉल कधी आत न्यायचा आणि कधी बाहेर काढायचा हे परफेक्ट जमतं. स्विंगिंग कंडिशन्समध्ये त्याच्यासमोर मोठमोठे कार्यकर्ते टिकत नाहीत.
अँडरसन जोरात टाकत असला, तरी तो स्पीडवर अवलंबून नसतोय, त्यामुळं बॉलिंग टाकताना फारसा ताण येत नाही, साहजिकच फिटनेस राखायला मदत होते.
खरंतर गेली २० वर्ष आपण अँडरसनला खेळताना बघतोय, पण एकदाही त्याचं पोट सुटलेलं काही दिसलं नाही.
मागे इंग्लंड-न्यूझीलंड मॅच सुरु असताना दाखवलेल्या एका ग्राफिक्समध्ये होतं, की तेव्हा त्यांच्या ९ फास्ट बॉलर्सला दुखापत झाली होती. अँडरसन मात्र अजून भिडतोय.
दुसरं कारण म्हणजे टेस्ट क्रिकेटला दिलेलं प्राधान्य…
टेस्ट क्रिकेट आधी अँडरसननं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं, तिथंही त्याची बॉलिंग बापच होती. पुढं टी-२० क्रिकेट फॉर्मात आल्यानंतर, अँडरसनची पावलं तिकडंही वळली. पण आपलं खरं स्किल टेस्ट क्रिकेटमध्ये कामी येतं, हे त्यानं अचूक हेरलं होतं. २०१५ मध्ये तो शेवटची वनडे खेळला आणि २००९ मध्ये शेवटची टी-२०.
आपल्यावर जो काही वर्कलोड यायचा, तो एकाच फॉरमॅटमध्ये येईल आणि तोही असा फॉरमॅट ज्याला सगळ्यात बाप मानलं जातं… इतकं साधं गणित.
इंग्लंडचेच नाही, तर जगभरातले क्रिकेटर्स वेगवेगळ्या लिग्समध्ये खेळतात, हा गडी मात्र इंटरनॅशनल क्रिकेट सोडून फक्त कौंटी क्रिकेटमध्येच दिसतो.
तिसरं कारण म्हणजे इंग्लंडचं वातावरण
पावसानं जितकी साथ १९९२ च्या वर्ल्डकपला पाकिस्तानला दिली, तितकीच ढगांनी अँडरसनला. ढगाळ वातावरणात बॉल आणखी चांगला स्विंग होतो. त्यात वाऱ्याची साथ मिळाली तर संपलाच विषय. ढगांची छाया, त्यात वारं आणि फास्ट बॉलिंगला पूरक असणारी इंग्लिश पिचेस या सगळ्याचा जोरावर अँडरसन अक्षरश: सत्ता गाजवतो.
ही गोष्टही तितकीच खरी की, फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या स्विंगिंग कंडिशन्समध्ये अचूक मारा करणं अवघड असतं, हेच तर अँडरसनचं स्किल आहे. इंग्लिश वातावरणात तो हमखास चालतो आणि त्याचा फॉर्म फारसा गंडत नाही, बॅडपॅच येत नाही आणि करिअरला ब्रेक बसत नाही.
इंग्लंडचं अँडरसनवर अवलंबून असणं, हे सुद्धा एक कारण
इंग्लंडमध्ये फास्ट बॉलर्स होतात का तर खोऱ्यानं होतात. मात्र दुखापती काय त्यांची पाठ, पाय आणि बाकी बरेच अवयव सोडत नाहीत. कुणाचा डेब्यू जबरदस्त होतो आणि नंतर कार्यक्रम गंडायला सुरुवात होते. कुणाकडे स्पीड असतो, पण टप्पा शोधेपर्यंत फटके पडतात.
इथं अँडरसनचं पान म्हणजे हुकूम, हमखास रम्मी लावणार.
एवढंच नाही तर अँडरसनकडं प्रचंड मोठा अनुभव आहे, इंग्लंडकडून सगळ्यात जास्त टेस्ट मॅचेस त्यानं खेळल्यात. सध्याचा आकडाच १७९ जातोय, टेस्ट विकेट्स आहेत ६८५. त्यामुळं नवख्या बॉलर्सला संधी देण्याऐवजी इंग्लंड अँडरसनवर जोर देत राहतं आणि त्याचं फळ दोघांनाही मिळतंच.
द्रविडनं त्याचा स्विंग होणार नवा बॉल डिफेन्ड करायचा, तिथं रिषभ पंतनं त्याला रिव्हर्स स्वीप मारला. या क्रिकेटच्या स्थित्यंतरात अँडरसन टिकून राहिलाय… दिवसेंदिवस त्याची बॉलिंग आणखी बहरतीये.
एज लागून सिक्स जाण्याच्या जमान्यात, अँडरसन पांढऱ्या कपड्यांमध्ये पळतोय, स्लिप कॉर्डनमध्ये ४ गडी उभे आहेत आणि कत्ती लागून कॅच उडतोय हा नजारा बघणं… हा आजही सगळ्यात भारी विषय आहे!
हे ही वाच भिडू:
- इम्रान खाननं दिलेल्या धोक्यामुळं वसीम अक्रमनं व्हिव्ह रिचर्ड्सचा बॅटनं मार खाल्ला असता…
- चिडकेपणात स्टीव्ह वॉ पॉन्टिंगचा गुरू होता आणि हीच गोष्ट त्याला भारी ठरवते…
- क्रोनिए हिरो की व्हिलन याचं उत्तर मिळतं, पण त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नाही