तपासणी घेणाऱ्या डॉक्टरला गंडवून नोकरी मिळवायचं टॅलेंट फक्त जॉनी वॉकरमध्येच होतं
सिनेमात येण्यापूर्वी कॉमेडियन जॉनी वॉकर अतिशय गरीब अवस्थेत होता. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने काय काय नाही केलं ? दारोदार जाऊन त्यांनी आईस फ्रूट विकल्या, मजुरी केली, फुटपाथवर खेळणी विकली, गवंडी काम केले.
जॉनी वॉकरचं खरं नाव बद्रुद्दीन काझी. १५ मे १९२४ हा त्याचा जन्म दिवस. अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत बालपण गेलं. लहानपणी नाशिकमध्ये भंगार, भजी, पेपर, बाटल्या विकल्या. सगळे उद्योग करून झाले. काही काळ तर इगतपुरीला रेल्वेमध्ये देखील कंत्राटी कामगार म्हणून कामाला होते. त्यानंतर ते मुंबईत शिफ्ट झाले.
लहानपणापासूनच संघर्षाला तोंड देत जगण्याचे बाळ कडू मिळाल्याने संघर्षाकडे पाहण्याचा जॉनी चा दृष्टीकोन सकारात्मक होता. संकटाला तो संधी समाजात असे आणि आलेल्या प्रसंगाला शिताफीने तो सामोरा जात असे. त्याचाच हा मनोरंजक किस्सा!
मुंबईत माहीमला असताना जॉनीला असे कळाले की मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या ‘बेस्ट’ मध्ये काही कंडक्टरच्या जागा भरायच्या आहेत. जॉनी वॉकरने ताबडतोब तिथे आपला अर्ज दिला. मुलाखतीसाठी बोलावणं आलं पण तिथे गेल्यावर त्याला कळालं की आधी मेडिकल टेस्ट होणार आहे. जॉनीचा डाव्या डोळ्याला आधीपासूनच कमी दिसत होतं. लहानपणी त्याच्या डोळ्यात चुकून एक औषध घातले गेले त्यामुळे त्याची दृष्टी कमजोर झाली होती.
ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत होती. जॉनीने ते कधीच कोणाला सांगितले नव्हते. मेडिकल टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे हे जॉनी वॉकरला तिथे जाईपर्यंत माहीत नव्हतं.
तिथे गेल्यानंतर त्याला जेव्हा कळालं. त्यावेळेला त्यांनी विचारले, “इथे या मेडिकल टेस्ट मध्ये डोळे देखील तपासले जाणार आहेत का?” तिथल्या व्यक्तीने सांगितले, “हो डोळे देखील तपासले जाणार आहेत!”
आता मात्र जॉनी वॉकरची पाचावर धारण झाली. तो मनोमन घाबरला. आपले डोळे तपासले आणि आपल्याला कमी दिसते हे समजले तर आपले बिंग फुटले जाणार आणि आपल्या हातातून नोकरी जाणार!
नोकरीची तर फार आवश्यकता होती. काय करावे? त्याने पुन्हा तिथे जाऊन साळसूदपणे तिथल्या कंपाउंडरला विचारले, “तुम्ही डोळ्याची टेस्ट कशी करता?” त्याने सांगितले, “समोर जो बोर्ड आहे त्या बोर्डवर जे अक्षर लिहिली आहेत ती अक्षरे ठराविक अंतरावरून तुम्हाला वाचायची असतात. एकदा दोन्ही डोळ्यांनी नंतर एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने”
जॉनीला टेस्ट लक्षात आली. ताबडतोब त्याच्या तल्लख बुद्धीने निर्णय घेतला. त्याने त्या बोर्डावरील अक्षरे पाठ करून घ्यायचा सराव मनातल्या मनात सुरु केला. ए ओ एक्स व्ही टी एच… तो या अक्षरांच्या क्रमाची उजळणी करू लागला. टेस्ट सुरू होण्याची वेळ आली!
जॉनीचा नंबर सुरुवातीला होता पण त्याने इतर इतर उमेदवारांना आधी जायला पाठवले. ज्या ठिकाणी टेस्ट होणार होती त्या ठिकाणी आत बाहेर उघडणारा एक दरवाजा होता. उमेदवार आत जात असताना दरवाजा उघडायचा आणि तो आत गेला की दरवाजा आपोआप लागला जायचा. या दरम्यानच्या काळात जॉनी दारात उभे राहून पुन्हा पुन्हा त्या बोर्डवरील अक्षरे पाहून मनामध्ये पाठ करू लागला.
असे करत करत त्याला तो संपूर्ण बोर्ड पाठ झाला. शेवटी जेव्हा त्याचा नंबर आला, त्यावेळेला त्याला सुरुवातीला दोन्ही डोळ्यांनी वाचायला सांगितले. त्याने खडा खडा वाचून दाखवले. पुन्हा एका डोळ्याने वाचून दाखवले हा डोळा नेमका चांगला होता त्याने पुन्हा व्यवस्थित वाचून दाखवले.
आता डावा डोळा जो विक होता त्या डोळ्याने त्याला वाचायला सांगितले अशा वेळी त्याला समोर अंधार दिसत होता पण त्याने मनातल्या मनात संपूर्ण बोर्ड पाठ करून ठेवला असल्यामुळे आणि डॉक्टरांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा क्रम त्याला माहीत असल्यामुळे तो घडाघडा उत्तरे देऊ लागला.
अशा पद्धतीने जॉनी वॉकर हि ‘आय टेस्ट’ मोठा जुगाड करून पास झाला आणि बेस्ट वाहक म्हणून तो बेस्टच्या सेवेत रुजू झाला. त्याचा बेस्टचा बिल्ला नंबर होता B-96. हा बिल्ला पुढे त्याने अनेक वर्ष जपून ठेवला होता.
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू:
- लग्नासाठी गोवा मुक्ती संग्रामात उतरलेला जॉनी वॉकर…!
- म्हणून, शम्मी कपूरनं लिपस्टिकनं गीताबालीची मांग भरली…
- D’Cruz, D’Gama असले आडनाव असेल तर सरकारी लाभ मिळत नाही कारण अतरंगी आहे…