सिमेंटच्या जंगलातल्या गटारगंगा बनलेल्या मुळा-मुठा पुन्हा एकदा पुण्याचा अभिमान बनतील?

शहर कोणतंही असो तिथं हमखास दिसणारी एक गोष्ट म्हणजे जगण्या-मरण्याची लढाई. आणि याचसाठी प्रत्येकाची सुरू असलेली धावपळ. शहरं सकाळी लवकर उठतात आणि रात्री उशिरापर्यंत जागी असतात. उसंत नसलेले जीव या सिमेंटच्या जंगलांमध्ये यंत्रमानवाप्रमाणं धडपडत काम करत असतात.

गावाकडं असं नसतं. तुम्हाला कामाची गडबड धावपळ असते, पण निसर्ग तुम्हाला तिथं कंटाळू देत नाही. दिवसभराचा शीण नदीच्या काठावर बसून घालवता येतो. आडव्या तिडव्या वेगाने वाढणारी शहरं हाच धागा विसरून गेली आणि त्यामुळं निसर्ग आपल्या हातून सुटून गेला.

विशेषतः पुणे.

बारा मावळाची साथ असलेलं, सह्याद्रीच्या डोंगररांगा पाठीशी घेऊन, मुळा मुठा नद्यांच्या काठावर वसलेलं हे निसर्गरम्य गाव गेल्या काही वर्षात विकासाच्या धावपळीत एक ओसाड महानगर बनण्याच्या दिशेने निघालं. या गावाच्या जीवनदायनी असलेल्या मुळा मुठा नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर गेल्या. जिथं लोक सहली साजऱ्या करण्यासाठी येत होते त्या नद्या एखाद्या छोट्या नाल्याच्या स्वरूपात उरल्या. शहरात नवीन आलेली मंडळी या नद्यांचं नाव जरी काढलं तरी नाक मुरडतात.

आज या मुळा-मुठेची अवस्था पहिली तर या नद्या आजही शापित असल्यासारखंच वाटतं. नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा, नदीत टाकला जाणारा कचरा आणि राडा-रोडा, नदीपात्रात झालेलं अतिक्रमण यामुळं नदीची एकदम बकाल अवस्था पाहायला मिळते. नदी आणि नाला यातला  फरक करणं अवघड होऊन बसलं आहे. 

एकेकाळी पुणेकरसांसाठी हक्काचा विरंगुळा असलेल्या नदीपात्रात अनेक ठिकाणी आज नाकाला रुमाल लावल्याशिवाय फिरता येत नाही.

मात्र महानगरपालिकेने नियोजन केलेला नदी सुधारणा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यावर पुण्याला त्यांच्या नद्यांचं बदललेलं रुपडं आणि हक्काच्या विरंगुळ्याची जागा पाहायला मिळू शकते.

होय… प्रदूषण रोखण्यासाठी आणि सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या वतीने जायका आणि नदी सुधार असे दोन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. 

नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत पूर नियंत्रण, जैवसंवर्धन, सुशोभीकरण ही कामं होणार आहेत. तर जायका कंपनी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी मदत करणार आहे. लोकसंख्येचा विचार केला तर पुण्याला २२ मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची गरज आहे. जपान येथील जायका कंपनी ही आर्थिक मदत करणार आहे.

त्याअंतर्गत ११ नवे Sewage Treatment Plants उभे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे नदीत सोडले जाणारे सांडपाणी हे प्रक्रिया करूनच सोडण्यात येणार आहे.

२०१६ मध्ये जेव्हा हा प्रकल्प करण्याचं ठरवलं तेव्हाच पूर्वाभ्यासासाठी ५ वर्ष लागणार असल्याचं त्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं असंही पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तपशीलवार प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर ) २०२१ मध्ये पूर्ण झाला आहे. स्थायी समितीच्या वतीनं या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

जायका प्रकल्पाचा फायदा नदी सुधार प्रकल्पाला होणार आहे. कुठलेही सांडपाणी हे प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडण्यात येणार नाही. पुढील २५ वर्षांची गरज लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अर्थात ‘जायका’ या संस्थेकडून अल्प व्याजदराने ९९० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी ८५ टक्के रक्कम महापालिकेस अनुदान म्हणून दिली आहे.

या प्रकल्पाचे काम देशाच्या नवीन संसदेचं डिझाईन करणाऱ्या पद्मश्री बिमल पटेल यांच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आलं आहे.

या प्रकल्पात नेमकं काय करण्यात येणार आहे ?

यात नदी पात्रात मागच्या १०० वर्षात आलेल्या पुराचा विचार करण्यात आला आहे. नदीची पूर क्षमता, नदीलगतचा रहिवासी भाग सुरक्षित राहणे, नदीकिनारचा पट्टा विकसित होणे, पब्लिक स्पेसेस अंतर्गत नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, बाकडी, उद्यान विकसित होणे, नदीलगत असलेली वारसा स्थळे जतन करणे याबरोबरच नदीकिनारी होणारी अतिक्रमणे, राडारोडा/कचरा टाकण्यास आळा बसणार असून, नदीतील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.

नदी सुधार प्रकल्पा अंतर्गत ४४.४ किलोमीटर नदी काठ बदलणार आहे. पहिल्या टप्प्यात संगमवाडी पूल ते बंडगार्डन, दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा आणि तिसऱ्या टप्प्यात मुंढवा ते खराडी पर्यंत काम पूर्ण होईल. तसेच शहर आणि गाव असे भाग करण्यात आले असून त्या-त्या प्रमाणे नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे .

यासाठी रोम, पॅरिस, कोपेनहेगन, बिजींग, रोम,क्योटो या शहरातील नद्यांचा अभ्यास करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात त्यानुसार, नद्यांवर १२ नवीन जागांवर पूल बांधण्यात येणार आहेत. नदीकाठी वॉकिंग ट्रॅक, छोट्या बागा, सायकल मार्ग तयार केले जातील. नद्यांमध्ये पाणी वर्षभर राहील, याचं नियोजन केलं जाणार आहे. जिथं नदीचं पात्र मोठं आहे तिथं बोटिंगची व्यवस्था असणार आहे. कल्याणी नगर सारख्या भागात अशी अशा प्रकारे बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुणे आणि गणपती हे तर वेगळंच नातं आणि याचाही विचार या प्रकल्पात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन घाट नव्याने विकसित केले जाणार आहेत. तसेच विसर्जन हौदांचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे. 

यासाठी साधारण ४ हजार ७२७ कोटी रुपये खर्च येणार आहे. यात नदीपुनरुज्जीवन आणि जैव संवर्धनावर ५७ टक्के, सुशोभीकरणावर २७ टक्के आणि ड्रेनेज लाईन, पूल आणि इतर सुविधा यावर १५ खर्च करण्यात येणार आहे असं सांगण्यात येतंय. प्रकल्पा अंतर्गत नदी जवळील सर्व ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहे.

बाकी काही का असेना, पण हा प्रकल्प यशस्वी झाला, तर मुळा मुठा नद्यांचं पुनरुज्जीवन तर होईलच पण शिवाय शहराचा निसर्गाशी तुटत चाललेला धागा पुन्हा जोडला जाईल. या नद्या परत शहराची ओळख बनतील हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.