जॅक स्पॅरोला जिवंत करणारा जॉनी डेप जॅकच्या भूमिकेत परतणार ?

जॉनी डेप आणि अम्बर हर्ड हे प्रकरण अक्ख्या जगाला माहित आहे. यात जॉनी जिंकला. मात्र या विजयाची लढाई जॉनीसाठी लई बेकार राहिली. जेव्हा त्याच्यावर आरोप करण्यात आले होते तेव्हा वॉर्नर ब्रदर्स आणि डिजनी सारख्या कंपन्यांनी जॉनी डेपशी सगळे कॉन्ट्रॅक्ट तोडले. 

त्याची फँटॅस्टिक बिस्ट आणि पायरेट्स ऑफ द कॅरेबियनमधून हकालपट्टी केली होती. 

आता जेव्हा तो निर्दोष सिद्ध झालाय तेव्हा डिजनीने जॉनीची माफी मागितल्याची बातमी आहे. शिवाय जॉनीने जॅक स्पॅरो कॅरेक्टर परत साकारावं म्हणून त्याला मनवण्यासाठी  डिजनीने ३०१ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २,३५५ कोटी ऑफर केल्याचंही बोललं जातंय. पण डिजनी किंवा जॉनीकडून अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये, म्हणून हे खरंय, खोटंय… पुढे कळेलच. 

पण एक गोष्ट लै लोक मानतील तो म्हणजे, जॉनीने कॅप्टन जॅक स्पॅरो हे कॅरेक्टर खरंच बाप केलंय. इतकं की अनेकजण जॉनीला जॅक स्पॅरो नावानेच ओळखतात. बहुतेक लोकांनी तर पायरेट्स ऑफ द कॅरेबियनच्या सगळ्या सिरीज बघितल्याचं जॅक स्पॅरोसाठी आणि अजूनही त्याचसाठी बघतात. 

म्हणूनच…

जॅक स्पॅरोला जिवंत करण्यापासुन ते त्याला अजरामर जॉनीने कसं केलं? हे बघूया…

पायरेट्स ऑफ द कॅरेबियनमध्ये जॅक स्पॅरो जसा दाखवण्यात आलाय ना तसा तो कधी नव्हताच. ज्यावेळी चित्रपट बनवण्याचं ठरलं आणि जॅक स्पॅरोची भूमिका ठरली तेव्हा ती साकारण्यासाठी जॉनी डेपशिवाय दुसरं कुणी डिजनीच्या डोक्यात आलंच नाही. कारण अशा चित्र विचित्र भूमिका साकारणं ही जॉनीची ओळखंच. 

पण जेव्हा जॉनी शूटिंगसाठी सेटवर आला आणि त्याने स्क्रिप्ट पाहिली तेव्हा काहीतरी गंडल्यासारखं वाटलं आणि त्याने जॅकचा सगळा चेहरामोहराच बदलला. 

जॉनीने स्वतः याबाबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय… 

मूळ स्टोरीत जॅक स्पॅरोला असा समुद्री डाकू म्हणून लिहिलं होतं, ज्याची स्टोरीत एंट्री होते, तो थोडा भांडण करतो, स्टंट करतो, मुलीला पकडतो आणि परत तेच ते. पण जॉनीने स्क्रिप्ट बघितल्यावर त्याच्या डोक्यात वेगळा जॅक तयार होऊ लागला. जॅक हा असा व्यक्ती होता ज्याने त्याच्या आयुष्यातील बहुतेक काळ समुद्रामध्ये घालवलेला असतो. त्यामुळे दोन गोष्टी झालेल्या असतात. 

एक म्हणजे त्याला भयंकर उष्णतेचा सामना करावा लागलेला असतो. ही परिस्थिती नक्की अशी असेल हे अनुभवण्यासाठी जॉनी १००० अंशांपर्यंतच्या स्टीम बाथमध्ये तोपर्यंत बसला जोवर त्याला शक्य होतंय. जेव्हा जॉनी बाहेर आला तेव्हा त्याला जाणवलं की, त्या उष्णतेमुळे त्याच्या मेंदूवर प्रभाव व्हायला सुरुवात झाली होती. 

तर दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी जहाजावर राहिल्याने जेव्हा जॅक जमिनीवर उतरतो तेव्हा त्याला जमिनीवर स्थिर उभा देखील राहता येत नाही. कारण त्याचे पाय लाटांप्रमाणे हलत असतात. 

क्षणात विचार करण्याची क्षमता जाणं आणि नीट चालत न येणं या दोन्ही गोष्टी त्याने जॅकच्या बॉडी लँग्वेजमधून दाखवण्याचा आग्रह केला. 

मात्र डिजनीने याला नकार दिला. काहींनी त्याच्या व्यक्तिरेखेचा अर्थ वेडसर असा लावला, काहींनी कट्टर बेवडा, तर काहींना स्पॅरोला समलिंगी व्यक्तिरेखा असल्याचं देखील म्हटलं. पण डेपने सांगितलं की तो करणार तर हाच जॅक नाही तर त्याला चित्रपटातून काढून टाका. साहजिकच डेपला बाहेर काढणं शक्य नव्हतं म्हणून डिजनीने होकार दिला आणि….

जन्म झाला कॅप्टन जॅक स्पॅरोचा.  

पायरेट्सच्या चित्रपटांना फ्लॉप म्हणलं जात होतं तेव्हा जॉनीने जॅक आणला आणि प्रेक्षकांना परत समुद्री डाकूंच्या प्रेमात पाडलं. लोकांनी  जॅक स्पॅरोमुळे चित्रपटाला डोक्यावर घेतलं. इतकं की याचे ५ भाग निघाले. The Curse of the Black Pearl मध्ये कॅप्टन म्हणून ज्याची खिल्ली उडवली जात असते तोच जॅक खरी कॅप्टनशिप करत शाप घालवतो.

चित्रपटामध्ये जिवंत माणसांपासून ते डेड मॅन्स चेस्टमधले मृत व्यक्ती सुद्धा एकाच व्यक्तीला शोधत असतात तो म्हणजे जॅक स्पॅरो. चित्रपटातील हा शोध प्रेकक्षकांच्या डोळ्यांत आणला तो जॉनीने. जेव्हा जॉनी या चित्रपटांचं चित्रीकरण करायचा तेव्हा पूर्णतः जॅक असायचा. त्याची बॉडी लँग्वेज, डोळ्यांचे भाव, संवादाची शैली एका क्षणासाठीही त्याने सोडली नाही. 

जेव्हा Dead Men Tell No Tales या भागात त्याला २० वर्ष तरुण दाखवायचं होतं आणि त्यावेळी दुसऱ्या एका तरुण अभिनेत्याला हे करण्यासाठी दिलं होतं तेव्हा जॉनीला धडधड व्हायला लागलं होतं आणि सगळं व्यवस्थित झाल्यावर अक्षरशः त्याच्या डोळ्यात तो आनंद दिसत असल्याचं जॉनीसोबतच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं. 

शिवाय तो त्याच्या जॅक या भूमिकेतून प्रेक्षकांशी असा जोडला गेला होता की जेव्हा चित्रपटात जॅक मारतो तेव्हा प्रेक्षक नाराज होतात आणि जेव्हा तो जिवंत असल्याचं कळत तेव्हा नाचायला लागतात.

चित्रपटाच्या पाचही भागात जॅक लोकांना असा आवडला की सहावा भाग यावा म्हणून मागणी केली जाऊ लागली. त्यामुळे तशी तयारी देखील सुरु झाली. मात्र मध्येच जॉनीवर अम्बरने आरोप लावले आणि तो केसमध्ये अडकला.

दरम्यान जेव्हा डिजनीने त्याला पायरेट्स ऑफ कॅरेबियनमधून दूर केलं तेव्हा जॉनी भावुक होऊन म्हणाला होता “जॅकला त्याला खूप चांगला निरोप द्यायचा होता”. 

त्यावेळी तो हे देखील म्हणाला होता की, जर आता डिजनीने येऊन ३०० मिलियन डॉलर दिले तरी तो कधी पायरेट्सच्या सिरीजमध्ये काम करणार नाही. मात्र जॅकला तो कधी सोडणार नाही. जॅक हा जॉनीच अंश आहे, त्याला जन्म मी दिलाय म्ह्णून मी लहान मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात का असेना जॅक साकारेल, त्याला जिवंत ठेवेल. आणि तो हक्क त्याच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही.

अभिनयाच्या दुनियेत असे अनेक पात्र असतात जे अभिनेत्याला अजरामर करतात. जॅक स्पॅरोने जॉनीला तशीच ओळख दिली आहे. मात्र इथे बदल असा आहे की जॉनीने जॅकला अजरामर केलंय.

जॉनीला जॅक म्हणा नाहीतर जॅकला जॉनी दोन्ही एकच झालंय, अशी जॉनीच्या अभिनयाची कमाल आहे…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.