सगळं जग कपिलच्या नावाचा जप करत होतं, तेव्हा गड्यानं एका बारक्या पोराची इच्छा पूर्ण केली होती…
गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे, आमचा एक भिडू ८३ पिक्चरला गेला होता. आल्यावर रिव्ह्यू सांगताना गडी एकदम भावूक झाला. साहजिकच आहे, कारण दोन पिढ्यांसाठी १९८३ चा वर्ल्डकप म्हणजे लई भारी मेमरी. क्रिकेट सगळ्यांचा फेव्हरेट गेम होण्यामागचं कारण. पण या पिक्चरमुळं आत्ताच्या बारक्या पोरांनाही येड लावलंय. सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे कपिल देव.
सहा फूट उंची, कुरळे केस, काहीसे पुढे आलेले दात आणि डोळ्यात एक वेगळीच चमक. जेव्हा भारतात फास्ट बॉलर्स तयार होणार नाही असं सगळ्या जगाला वाटत होतं, भारत वर्ल्डकपमध्ये एकही मॅच जिंकू शकणार नाही असं सगळ्या जगाला वाटत होतं, तेव्हा कपिल आला आणि भारतीय क्रिकेटला वेगळी ओळख मिळाली.
आपला कपिल चंदीगडचा, त्या जमान्यात भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचं राज्य होतं. उरलेले सुभे दिल्ली आणि चेन्नईनं वाटून घेतलेले, पण छोट्या शहरातून आलेल्या कपिलनं डायरेक्ट कॅप्टन पदापर्यंत मजल मारली. इतकं करुन तो थांबला नाही, तर देशाला वर्ल्डकपही जिंकवून दिला.
त्या जमान्याची गोष्टच न्यारी होती. तेव्हा ना क्रिकेटला ग्लॅमर होतं, ना क्रिकेटर्सना. आता आपल्याला एखादा क्रिकेटर भेटला तर आपण त्याची सही मागू, त्याच्यासोबत एखादा सेल्फी किंवा व्हिडीओ मागू, पण तेव्हा मोबाईलचा पत्ताच नव्हता तर या गोष्टी येणार कुठून. तेव्हा क्रिकेटरची सही मिळणं ही लई भारी गोष्ट आणि ती सही फोटोसकट मिळाली तर विषयच खोल.
एका ९ वर्षांच्या पोराला कपिल देव लई आवडायचा. त्याला कपिलची सही हवी होती आणि एक फोटोही. बोर्डिंग स्कुलमध्ये राहणाऱ्या या पोरानं डायरेक्ट कपिलला लेटर लिहिलं, त्यानं मागणी केली की, ‘मला तुमची सही आणि रंगीत फोटो हवा आहे.’ कपिल तेव्हा खतरनाक फॉर्ममध्ये होता, सलग दोन सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. एवढा मोठा क्रिकेटर या बारक्या पोराला कधी रिप्लाय द्यायचा असं समजून बोर्डिंग स्कुलमधले सगळे हसायला लागले.
दिवस वाढत गेले तसं पोरांचं खिदळणंही वाढलं होतं. पण या भावानं आशा सोडली नाही. शेवटी एक दिवस आला…जेव्हा हसण्याची वेळ या ९ वर्षांच्या पोराची होती.
कपिलनं पत्राला उत्तर दिलं, तेही हातानं लिहिलेल्या पत्रानं. कपिल त्या पत्रात म्हणाला, ‘तुमचं पत्र वाचून फार आनंद झाला. तुम्ही जे कौतुक केलंत त्यासाठी धन्यवाद. सध्या माझ्याकडे माझा एकच फोटो आहे, कुठला रंगीत फोटो नाही. मला आशा आहे तुम्ही फार वाईट वाटून घेणार नाही. मी प्रार्थना करतो की माझ्या खेळामधून तुम्हाला असंच खुश करत राहीन आणि तुमचं प्रेम कायम राहील.’
कपिलनं या पत्राच्या खाली आपली पल्लेदार सही तर केलीच, पण सोबतच एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोही दिला. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या कपिलनं छोट्याश्या फॅनची इच्छा पूर्ण केली. पुढं जाऊन कपिलनं देशाला वर्ल्डकप जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
आणि तो लहानगा फॅनही आता चांगल्या मोठ्या पदावर पोहोचलाय. कपिलला ते पत्र पाठवलं होतं, प्रियरंजन झा यांनी. जे सध्या पेप्सिको डिलेव्हरी हबचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी लिंक्डइन वर एक पोस्ट लिहीत हा किस्सा सांगितला आहे. कपिलच्या या पत्रामुळं आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्याचा फायदा आपल्याला कॉर्पोरेट वर्ल्डमध्येही होतोय, असंही ते म्हणाले.
आजच्या घडीला कपिलमुळं क्रिकेट खेळायला लागलेले अनेक जण आपल्याला दिसतील. कपिलनं सगळ्या देशाच्या डोक्यात क्रिकेटचं खूळ भरलं हेही तितकंच खरं. कपिल आता भले क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही, पण टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला, की एक वाक्य आपसूक तोंडातून बाहेर पडतं…
कपिलदा जवाब नहीं.
हे ही वाच भिडू:
- इंडिया फायनल मारायच्या तयारीत होती मात्र कपिल देवची बायको ग्राउंडच सोडून गेली
- १७ वर ५ आउट असताना कपिल देव मैदानात आला आणि वर्ल्डकपचं स्वप्न पूर्ण झालं.
- फॅन्स तुफान दगडफेक करत होते पण कप्तान कपिल देव आपल्या जागेवर ठामपणे बसून राहिले…