मंगळसुत्र नको म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करणारे ‘करुणानिधी’.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘कलैग्णार करुणानिधी’ काल गेले.

आयुष्यभर ब्राह्मणविरोधाचं राजकारण करणारा हा माणूस आपल्या आयुष्यात देखील आपल्या तत्वांशी तितकाच प्रामाणिक राहिला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्स्यामधून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते.

तत्वांसाठी केला प्रेमाचा त्याग !

करुणानिधी यांनी आपल्या जीवनात ३ लग्न केली. पण या तिन्ही लग्नापूर्वी तारुण्यात असताना करुणानिधी एका युवतीच्या प्रेमात पडले होते. ते प्रेम देखील ‘सिद्धतवाला लव्ह’ अशा टाईप होतं. केवळ तिच्यासोबत लग्न करता यावं म्हणून आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी अतिशय साधारण घरातून येणाऱ्या करुणानिधींनी व्यावसायिक पातळीवर स्क्रिप्ट रायटिंग करायला सुरुवात केली होती.

करुणानिधी ठीकठाक कमवायला देखील लागले होते आणि लग्नाची गोष्ट मुलीच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली होती. मुलीच्या घरच्यांची  लग्नासाठी काही हरकत नव्हती फक्त त्यांची एकच अट होती की त्यांना लग्न हे धार्मिक रीतीरीवाजानुसार करायचं होतं. म्हणजे मंगलाष्टकं आणि मंगळसूत्र वैगेरे.

करुणानिधी हे या सर्वच गोष्टींच्या विरोधात होते. त्यांना लग्न त्यांची तत्व या गोष्टीसाठी त्यांना परवानगी देत नव्हती. त्यामुळे त्यांनी पारंपारिक रीतीरिवाजानुसार लग्न करण्यास साफ नकार दिला. मुलीच्या घरचे देखील त्यांच्या आग्रहावर कायम राहिले आणि हे लग्न होऊ शकलं नाही. २०१३ साली  करुणानिधी यांनी स्वतःच एका पत्रकार परिषदेदरम्यान हा किस्सा सांगितला होता.

विशेष म्हणजे ती तरुणी देखील पुढे आयुष्यभर अविवाहित राहिली.

पुढे त्यांनी ३ लग्न केली ज्यातील पहिल्या पत्नीचं, पद्मावती यांचं लग्नानंतर काही वर्षातच निधन झालं.  या पत्नीपासून त्यांना मुत्थू नावाचा मुलगा होता. ज्याला तमिळ चित्रपटसृष्टीत प्रस्थापित करण्यासाठी करुणानिधी यांनी बरेच प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही.

पुढे या बाप-लेकांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. मुत्थू करुणानिधी यांचे प्रतिस्पर्धी एमजीआर यांना जाऊन मिळाला. त्यानंतर त्यांच्यात जो दुरावा निर्माण झाला तो करुणानिधी यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिला.

ती माझ्या मुलीची ‘आई’ आहे !

दोन्ही पत्नींसमवेत एका सभेदरम्यान

दुसऱ्या पत्नी द्यालूअंमल यांच्यापासून करुणानिधी यांना ४ मुले झाली. त्यातील एम.के. स्टालिन हेच करुणानिधी यांचे राजकीय वारस म्हणून काम पाहताहेत. त्यानंतर करुणानिधी यांना एका प्रचारसभेदरम्यान रजतिअंमल नावाची एक मुलगी आवडली. जिच्याशी त्यांनी आपल्या पक्षाने सुरु केलेल्या ‘स्वयं मर्यादा कल्याणं’ या अभियानांतर्गत लग्न केलं.

कुठल्याही कायदेशीर अडचणींचा सामना करता येऊ नये यासाठी त्यांनी द्यालूअंमल यांना पत्नीचा तर रजतिअंमल यांना मैत्रिणीचा दर्जा दिला. अर्थात त्यांच्या राजकीय विरोधकांकडून या गोष्टीबाबतीत त्यांच्यावर अनेकदा टिका करण्यात आली.

करुणानिधी यांचा दिवस एका घरात तर रात्र दुसऱ्या घरात जाते, अशा प्रकारची टिका राजकीय विरोधक त्यांच्यावर सर्रासपणे करत असत. त्यामुळे एकदा पत्रकारांनी करुणानिधी यांना या विषयावर छेडलच आणि रजतिअंमल यांच्याविषयी विचारलंच. ही महिला नेमकी कोण आहे आणि तिची तुमच्या आयुष्यातील भूमिका काय…?

करुणानिधींचं उत्तर होतं, “ती माझ्या मुलीची आई आहे”

यानंतर मात्र त्यांना कधीच या विषयावर छेडलं गेलं नाही. करुणानिधी यांनी उल्लेख केलेली त्यांची ‘ती’ मुलगी म्हणजे एम.के. कनीमोळी होत.