“ढगफुटी म्हणजे परदेशी कट आहे..” KCR म्हणालेत त्यात तथ्य आहे का..?

तेलंगणामध्ये सध्या पावसाने थैमान घातलं आहे. ठिकठिकाणी ढगफुटी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता याचा आढावा घेणं हे राज्याच्या प्रमुखाचं कर्तव्य आहे. त्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल १७ जुलैला राज्याच्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला.

मदत छावण्यांमध्ये जाऊन विस्थापितांची भेट घेतली. त्या सर्व कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी मुलुगू, भूपालपल्ली, कोठागुडम, महबूबाबाद आणि निर्मल या पूरग्रस्त जिल्हा प्रशासनाला प्रत्येकी एक कोटी रुपये तातडीने देण्याचे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान दुपारी पूरग्रस्त भद्राचलम शहराला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांने ‘काय?’ अशी अनेकांची रिऍक्शन येतीये. केसीआर म्हणाले आहेत की… 

आधी लेह-लडाख, त्यानंतर उत्तराखंड आणि आता गोदावरी भागात ढगफुटी झालीये. ही ढगफुटी म्हणजे परदेशी कट आहे, फॉरेन कंट्रीने केलंय.”

केसीआर यांचा हा दावा ‘अरे भाई, आखिर कहना क्या चाहते हो?’ याकडे घेऊन जातंय. म्हणून त्याचाच जरा उलगडा करायचा प्रयत्न करूया… 

आधी बेसिक बघूया की, ढगफुटी काय असते आणि ती आर्टिफिशियली करता येते का?

आभाळाला जणू छिद्र पडलं आहे, अशी परिस्थिती ढगफुटीच्या वेळी होत असते. एखाद्या भागात कमी वेळेत अचानक धो-धो पाऊस पडून पूर येणं. कधीकधी गारवा आणि मेघगर्जनेसह अतिवृष्टीचं अत्याधिक प्रमाण असणं, आजूबाजूचा सर्व परिसर पाण्याखाली जाणं याला ढगफुटी म्हणतात. 

भारतीय हवामान खात्यानुसार,  २० ते ३० किलोमीटर भागात एका तासात १० सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस झाल्यास ढगफुटी झाली असं म्हणतात. कधी कधी एकाच भागात एकापेक्षा जास्त ढगही फुटू शकतात. 

कृत्रिमरित्या हे घडवून आणता येतं का? याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, क्लाउड सीडिंग तंत्राचा वापर करून हे शक्य होऊ शकतं. या प्रक्रियेत सिल्वर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आईस वातावरणात सोडली जातात. ही रसायने वातावरणात पाठवण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

ढगात सोडले जाणारे हे रसायनं हवेतील बाष्पाला आकर्षित करतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. याला क्युम्युलोनिम्बस क्लाउड (cumulonimbus clouds) असं म्हणतात. ढगाच्या कोणत्या भागात रसायने टोचली जात आहेत यावर पाऊस पाडण्यासाठी लागणारा वेळ अवलंबून असतो. साधारणतः पाऊस पाडण्यासाठी अर्धा तास लागतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

केसीआर यांनी लेह-लडाख, उत्तराखंड या ठिकाणच्या ढगफुटीकडेही लक्ष वेधलंय. 

लेह-लडाख, उत्तराखंड हे डोंगराळ भाग आहेत. डोंगराळ भागात ढग फुटणं सामान्य असतं. टेकड्यांवर तयार झालेल्या ढगांमध्ये आर्द्रता जास्त असते आणि ते कमी वेळात जोरदार पाऊस पाडतात. म्हणून या भागांमध्ये ढगफुटी नेहमीच होत आली आहे, असं शास्त्रज्ञ सांगतात. 

अशात त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे, हे सांगण्यासाठी केसीआर यांनी ‘परकीय षडयंत्र’ असं म्हटलंय. पण खरं बघितलं तर केसीआर यांनी यातून भाजप सरकारला वेठीस धरलंय, असं निरीक्षकांचं म्हणणंय. 

कसं?

लेह-लडाख केंद्रशासित प्रदेश असल्याने तिथे थेट केंद्र सरकारची सत्ता आहे. केंद्रात भाजप सरकार आहे. तर उत्तराखंडमध्ये भाजप पक्ष सत्तेत आहे. या ठिकाणी भाजपने मोठा विकास केला आहे आणि अजूनही सुरु आहे, असं भाजप वारंवार सांगत असतं. त्यासाठी भाजप या राज्यांमध्ये शहरीकरण आणि औद्योगिकीकरण करण्यावर भर देत आहे. 

हिमालयीन भाग नैसर्गिक दृष्ट्या खूप संवेदनशील भाग असतो. इथे थोडा बदल झाला तर त्याचे दुष्परिणाम लगेच उमटतात. अशात वाढत्या औद्योगिकरणाचा या सर्व राज्यांच्या नद्या, हिमनद्या आणि पाणलोट क्षेत्रांवर परिणाम झाला असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. 

यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये उत्तराखंडमधील चमोली दुर्घटनेचं उदाहरण घेता येईल. 

दगड आणि बर्फाच्या हिमस्खलनामुळे धौलीगंगा आणि ऋषीगंगा नद्या ओसंडून वाहू लागल्या होत्या, आधीच्या धरणावरील एक लहान धरण नेस्तनाबूत झालं होतं, फुटलेल्या धरणाचा ढिगारा पुराच्या पाण्यात मिसळल्याने त्या भागातील पायाभूत सुविधांचं नुकसान झालं होतं, जलविद्युत ऊर्जा प्रकल्प प्रभावित झाले होते, गावच्या गावं वाहून गेली होती आणि २०० हून अधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले होते.’

या भागात राज्य सरकारने अस्थिर डोंगर उतारांवर धरणं आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्यास परवानगी दिली होती, नद्यांच्या प्रवाहात बदल केला होता. या प्रकल्पांच्या माध्यमातून जलविज्ञानाकडे अगदीच दुर्लक्ष केलं गेलं होतं.

जमिनीत बोगदे, कालवे खणले गेले होते. याचा स्थानिक लोकांना काहीच कायदा होणार नाही उलट हे प्रकल्प अपयशी ठरल्यास लोकांना सर्वकाही गमवावं लागेल, याचाही विचार केला गेला नव्हता, असं निरिक्षकांनी सांगितलं होतं. 

याच्याच आधारे ‘वेगवान ‘विकासा’च्या नादात त्याच्या परिणामांकडे भाजप दुर्लक्ष करत आहे,  निसर्गाला हानी पोहचवत आहे’ याकडे केसीआर लक्ष वेधत असल्याचं बोललं जातंय. 

पण ढगफुटी सारख्या विषयाच्या माध्यमातूनही भाजप वर टीका करण्याची संधी न सोडणारे केसीआर सुद्धा या बाबतीत गंडले असल्याचं दिसतंय. हे समजून येतं गोदावरी भागात झालेल्या ढगफुटीच्या माध्यमातून.

येत्या काळात गोदावरी पुराच्या धोक्याची तिसरी पातळी ओलांडू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचे परिणाम जाणवत आहेत, लाखो एकरांवरील पिके उध्वस्त झाली आहेत. निर्मल इथल्या कडम धरणावरील काउंटर-वेट आणि केबल्स खराब झाल्या आहेत, धरणाचे दोन दरवाजे भग्न झाले आहेत.

कालेश्वरम पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याच्या बॅकफ्लोमुळे २५ हेवी ड्युटी किंवा ‘बाहुबली’ पंप पाण्याखाली गेले होते. महसूल-आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष मुख्य सचिव जी. साई प्रसाद यांच्या मते, १९८६ पासून ही गोदावरीची सर्वात वाईट अवस्था आहे. 

गोदावरी भागात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे मुख्य राज्य आहेत. दोन्ही राज्य गोदावरीच्या वाढत्या नुकसानाला कारणीभूत आहेत. हवामानामुळे जे संकट उभं राहत आहे त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात केसीआर कमी पडले असल्याचं ही स्थिती दाखवत आहे.

ढगफुटी सारखी स्थिती झाल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय कारण गोदावरीच्या प्रवाहाला खंडित करण्याचं काम राज्य सरकारांनी केलं आहे. नदीच्या आजूबाजूला बांधकाम आणि प्रकल्प उभारणी करताना नियमांकडे दुर्लक्ष केलं गेल्याचं अभ्यासक सांगतात.

अशाप्रकारे भाजपकडे बोट दाखवणारे केसीआर स्वतः देखील व्यवस्थापन करण्यात चुकले आहेत. स्वतःचं अपयश लपवून ठेवण्यासाठी ते फॉरेन कंट्रीच्या नावावर बिल फाडत नागरिकांना भुलवत आहेत, असं बोललं जातंय. 

टीका करण्याऐवजी, केसीआर यांनी तेलंगणाचा अशाप्रकारे विकास केला पाहिजे की ज्यामुळे तिथल्या लोकांचं संरक्षण होईल, असं तज्ज्ञ सांगतायत.

दुसरी गोष्ट म्हणजे केसीआर यांचं ‘फॉरेन कंट्री’ नाव घेणं यात तथ्य नाहीच आहे. पण त्यांनी भाजपवर केलेल्या टीकेतून भाजप उत्तराखंड आणि लेह-लडाखमध्ये कसं चुकलंय आणि सोबतच टीकाकार केसीआर तेलंगणात कसे चुकलेत म्हणून अशा ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत, हे समोर येतंय. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.