‘प्लॅन ए’ ला चिटकून राहिलं की आयुष्य बदलू शकतंय, रिंकू सिंगचंच बघा…

आपण माणूस म्हणून जगतो, आपल्या आजूबाजूला लोकं असतात, घरचे, बाहेरचे, ऑफिसचे, सेलिब्रेटी असे लय जण. आपल्याला या सगळ्यांशी कुठली गोष्ट कनेक्ट करत असेल, तर ते म्हणजे गोष्टी. घरी आल्यावर आईला शाळेत काय झालं हे सांगण्यापासून, लॉन्ग डिस्टन्समधल्या गर्लफ्रेंडला दिवस कसा गेला हे सांगण्यापर्यंत आपण गोष्टीच सांगत असतो.

त्यामुळं आपल्याला गोष्ट हा प्रकार लय भारी वाटतो, मग ती कुणाचीही असो, कशीही असो. आम्हाला पण एक गोष्ट दिसली, आम्हाला भारी वाटली. भारीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली वाटली. मग म्हणलं, गोष्ट तुमच्याशी शेअर करावी, कदाचित तुम्हाला भारी वाटेल…

ही गोष्ट रिंकू खानचंद सिंगची.

सुरुवात होते, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमपासून. गुजरात टायटन्स व्हर्सेस कोलकाता नाईट रायडर्स मॅच सुरु होती. मॅच कोलकात्याच्या टप्प्यात असताना, गुजरातच्या राशिद खाननं हॅटट्रिक मारली आणि मॅच गुजरातच्या बाजूनं फिरवली. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या मॅचमध्ये जिंकायला ६ बॉल २९ रन्स हवे होते, स्ट्राईकवर होता रिंकू सिंग. ज्यानं केलेले १६ बॉल १८ रन्स. तिथनं मॅच निघणं अवघड होतं, पण रिंकूनं सलग ५ सिक्स मारले आणि अशक्य वाटणारी मॅच कोलकात्यानं जिंकली.

कट टू फ्लॅशबॅक

आपण जातो उत्तरप्रदेश मधल्या अलिगढमध्ये. खानचंद सिंग, घरोघरी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करणारा माणूस. आता कष्टकरी माणसांच्या अपेक्षा मोठ्या नसल्या, तरी स्वप्नं मात्र मोठी असतात. खानचंद यांचंही स्वप्न असणार… आपल्या पोरांनी मोठं व्हावं, यशस्वी व्हावं.

पाच मुला-मुलींपैकी सगळ्यात एक जण रिक्षा चालवायचा, दुसरा कोचिंग सेंटरमध्ये काम करायचा. पण मेन विषय होता तिसऱ्याचा. कारण हा गडी वांड होता, त्यानं नववीत नापास झाल्यावर शिक्षण सोडून दिलं. नाद एकच होता, क्रिकेट.

हा गडी म्हणजे गोष्टीचा हिरो रिंकू सिंग.

क्रिकेटमधला नाद वाया गेला नव्हता. मैदानांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून त्यानं उत्तर प्रदेशच्या अंडर-१९ टीमपर्यंत धडक मारली. आता बीसीसीआय अंडर-१९ च्या पोरांना इतके पैसे तर देतेच की, त्यांना शानमध्ये राहता येईल. बेसिक गरजा पूर्ण होऊन पैसे हाताशी उरतील.

रिंकूलाही डेली अलाउन्स मिळायचा, वय १९ पूर्ण नसतानाही हातात पैसा आला आणि डोक्यावर जबाबदारीही. त्याच्या कुटुंबावर पाच लाखाचं कर्ज होतं, रिंकूनं शान नाही केली, तर तो कर्ज फेडायला झगडला. पण ऑफ सिझनमध्ये काय करायचं? पैसे कुठून आणायचे? या प्रश्नाचं उत्तर होतं जॉब करायचा…

रिंकू नववी नापास, त्यामुळं जॉब कसा मिळणार हा पुढचा प्रश्न. त्याचा भाऊ त्याला एका ठिकाणी घेऊन गेला… तिथं काम होतं स्वच्छता कर्मचाऱ्याचं. झाडून, पुसून घेणं, साफ-सफाई करणं. हे काय छोटं काम नाही, उलट त्याला लागणारे श्रम प्रचंड आहेत.

धोनी पिक्चरमध्ये त्या रेल्वे स्टेशनवर बसलेला आठवतो? ट्रेनमध्ये बसायचं की नाही..? या प्रश्नाचा सिन.

रिंकूलाही पडला आणि तो ट्रेनमध्ये बसला. की ट्रेन होती क्रिकेटची… जी त्याला स्वप्नपूर्तीकडं घेऊन गेली.

त्यानं जॉब करण्याऐवजी क्रिकेटवर भर द्यायचं ठरवलं. इथं मेहनतीला नशिबाची साथ लागते, रिंकूला ती मिळाली. त्यानं २०१६-१७ मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दुसऱ्याच वर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यानं ६९२ रन्स मारले. पण रणजीत ६०० रन्स करणारे पाच-सहा जण तरी असतात, त्यामुळं मोठा धमाका पाहिजे.

पुढच्या वर्षी भावानं सुट्टी दिली नाही आणि एकाच सिझनमध्ये ९५३ रन्स मारले. सौराष्ट्र विरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये त्यानं जबरदस्त बॅटिंग केली, त्याच्या १५० रन्समुळं उत्तर प्रदेशला लढता आलं. मॅच हारली पण रिंकू हिरो ठरला… फुल पिक्चरसारखा सिन!

हे सगळं सुरू असतानाच, स्टोरीची दुसरी फ्रेम होती आयपीएलमध्ये. २०१७ च्या लिलावात रिंकूला पंजाबनं १० लाख देऊन टीममध्ये घेतलं. पण खेळायचा चान्स काही मिळाला नाही. २०१८ मध्ये कोलकात्यानं ८० लाख मोजले, संधीही दिली, खिशात पैसे आले, पण रिंकूची बॅट काय बोलली नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमधल्या कामगिरीच्या जोरावर त्यानं इंडिया ए टीममध्ये धडक मारली. तिथं संधी मिळाली नाही आणि कदाचित रिंकूला ते सहन झालं नाही. अशावेळी त्यानं निर्णय घेतला, अबुधाबीमध्ये टी२० लीग खेळण्याचा. त्या लीगमध्ये त्यानं टीमला जिंकून दिलं, नाव काढलं.

पण बीसीसीआयची परवानगी न घेता दुसऱ्या देशातली लीग खेळल्यामुळं बीसीसीआयनं त्याला तीन महिन्यांसाठी बॅन केलं. इंडिया ए टीममधली जागाही गेली.

इथं आपल्याला गल्ली क्रिकेटमध्ये बॅटिंग मिळाली नाही, की खेळायला जाणं जीवावर येतं, तिथं रिंकूनी आपलं करिअर पणाला लावलेलं. २०२२ मध्ये कोलकात्यानं त्याला ५५ लाख देत पुन्हा चान्स दिला. यावेळी चान्स मिळणं अवघड होतं आणि जर मिळाला तर त्याचं सोनं करणं मस्ट होतं…

त्यानं ते केलं आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध फिफ्टी मारुन मॅन ऑफ द मॅचही मिळवलं.

ते पिक्चर संपल्यावर पोस्ट क्रेडिट सिन असतात, तसा रिंकूचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. त्यात त्यानं मॅचच्या आधीच हातावर ५० नॉटआऊट असं पेननं लिहिल्याचं दिसतं, वर तो सांगतो आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच मिळेल असं मला मॅचच्या आधीच वाटत होतं.

त्याला वाटलं तसं झालंही…

गॅस सिलिंडरची डिलेव्हरी करणाऱ्याचा मुलगा आयपीएलमध्ये स्टार झाला हे तुम्ही लई ठिकाणी वाचलं असेल. पण त्याच्याही पलीकडं ही गोष्ट रिंकूच्या संयमाची आणि प्रयत्नाची आहे. आपण मध्यमवर्गीय घरात वाढलो असलो, तरी मोठं कायतरी करु शकतो असं वाटणाऱ्या प्रत्येकाची आहे.

मोठं व्हायला काय लागतं हे सांगण्याची आहे, या गोष्टीत माज नाही, तुटलेली स्वप्न आहेत, चुकीचे-बरोबर निर्णय आहेत, पाठीवर पडलेली थाप आहे आणि एक हिरो आहे, जो आपल्यासारखेच कष्ट करतो आणि जिंकतो… म्हणून रिंकू सिंगची गोष्ट वाचली की भारी वाटतं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.