कोहली एवढा मोठा कसा झाला ते या किस्स्यावरुन कळतं.

१७ डिसेंबर २००६ चा दिवस. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्लीची रणजी मॅच सुरू होती. समोर भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमधली जायंट अशी ओळख असणारी कर्नाटकची टीम होती. पहिल्या इनिंगमध्ये कर्नाटकनं कडक बॅटिंग करत ४४६ रन्स मारले.

दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आलेली दिल्लीची टीमही तगडीच होती. मात्र त्यांची सुरुवात फार बेकार झाली, आकाश चोप्रा ०, शिखर धवन ८, मयांक तेहलान ० आणि कॅप्टन मिथुन मन्हास ४ रन्स, सगळ्या टॉप ऑर्डरचा बाजार उठला होता. फॉर्मसाठी चाचपडणारा एक गडी मात्र त्या दिवशी फॉर्मात होता, आपली चौथी फर्स्ट क्लास मॅच खेळणारा अठरा वर्षांचा विराट कोहली.

कोहलीने पुनित बिष्टच्या साथीनं डाव सावरला आणि दिवसअखेर ४० रन्स करुन नॉटआऊट राहिला.

टीमला फॉलोऑनपासून वाचवायचं आणि काहीही झालं तरी सेंच्युरी मारायचीच हा विचार डोक्यात ठेवून कोहली घरी आला. पण त्या रात्री सगळी परिस्थितीच बदलली. त्याचे वडील पॅरालिसिसनं त्रस्त होते, अशातच रात्री तीनच्या सुमारास त्यांना हृद्यविकाराचा झटका आला. काही उपचार करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळी त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची वेळ झाली, त्यांचं पार्थिव शरीर घरात होतं आणि कोहली मैदानात निघाला. ईशांत शर्मा नेहमीप्रमाणं त्याला घ्यायला आला. त्याच्या कारमध्ये बसल्यावर कोहलीचं एकच वाक्य होतं ‘पापा नहीं रहे..’ मैदानात पोचल्यावर कोहली एका कोपऱ्यात शांत बसून होता. 

सगळी टीम त्याच्या बाजूला जमली, रडणाऱ्या कोहलीला कॅप्टन मिथून मन्हास म्हणाला घरी जा, नको उतरुस बॅटिंगला. कोहलीचं उत्तर होतं.. मै खेलुंगा.

त्याच्या मै खेलुंगामध्ये इतकी ताकद होती, की त्यानं कर्नाटकच्या बॉलिंगची पिसं काढली आणि तो पोहोचला ९० रन्सवर. सेंच्युरीपासून फक्त १० रन्स बाकी आणि तेवढ्यात २३७ बॉल्स खेळलेला कोहली आऊट झाला. त्याची सेंच्युरी थोडक्यात हुकली. 

लंचब्रेकमध्ये त्यानं आपल्या कोचला फोन लावला, तो रडत होता, त्याचं एकच म्हणणं होतं, ‘सर मुझे गलत आऊट दिया, बस दस रन कम थे.’ त्याला वडिलांच्या मृत्यूची सल बोचत होती पण तरीही दुःख सेंच्युरी न झाल्याचंच होतं.

त्याआधी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये असताना वडील प्रेम कोहली विराटच्या मोठ्या भावाला विकासला म्हणाले होते, ‘देख लेना, मेरा विराट इंडिया के लिए खेलेगा और बडा स्टार बनेगा.’ कोहलीनं वडिलांचा शब्द आणि शब्द खरा केला. तो फक्त भारतासाठी खेळलाच नाही, तर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला गेला. 

आजच्या घडीला स्वतः सर व्हिव्ह रिचर्ड्स त्याचे फॅन आहेत म्हणल्यावर विषयच संपला.

खरं सांगायचं, तर कोहलीनं जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तो बऱ्याच जणांचा नावडता होता. त्याची झकपक हेअर स्टाईल, अंगावरचे टॅटू, वागण्यातला आणि बोलण्यातला उद्धटपणा कित्येकांच्या डोक्यात जायचा. त्याचं ऑनफिल्ड वागणंही आगाऊच होतं. 

पुढं जाऊन त्यानं भावनांवर नियंत्रण मिळवलं खरं पण ॲग्रेशन अस्सलच राहिलं. त्याच्या नेतृत्वात भारत टेस्ट क्रमवारीत अग्रस्थानावर पोहोचला आणि काही वर्ष तिथं कायमही राहिलाय. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा पराक्रमही आपण त्याच्याच नेतृत्वात केला. 

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची छबी अधिक आक्रमक झाली. सुपरहिट पुष्पा सिनेमाच्या कितीतरी आधी भारतीय संघ ‘झुकेगा नही’ म्हणू लागला. भारतीय संघ विश्वविजेता झाला नसला, तरी कुणालाही धडकी बसवू शकेल या ताकदीचा झाला हे नक्की.

आजच्या घडीला भारताकडे असलेली फास्ट बॉलर्सची फौज, अगदी क्लब लेव्हलच्या पोरांना लागलेलं फिटनेसचं येड आणि जगातल्या कुठल्याही संघाला कुठल्याही भूमीवर हरवण्याची धमक. याचं बरंचसं श्रेय कोहलीला जातं. त्याच्या निडर, कणखर आणि प्रचंड एकाग्र असण्यामागं मेहनत तर आहेच, पण एक अठरा वर्षांचा मुलगाही आहे, जो वडिलांचं पार्थिव घरात असताना, टीमला फॉलोऑनमधून वाचवण्यासाठी मैदानात येतो आणि नको खेळू सांगणाऱ्या कॅप्टनला सुजलेल्या डोळ्यांनी उत्तर देतो, मै खेलुंगा.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.