तिच्या प्रेमापायी गँगस्टर बनला, पण अश्विन नाईकच्या लव्हस्टोरीचा शेवट फार फार दुर्दैवी होता…

‘असे सगळे नवे-जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब,’  मुळशी पॅटर्नमधला हा डायलॉग कित्येक जण आजही विसरलेले नाहीत. पण गुन्हेगारीत विश्वात डोकावून पाहिलं.. तर नव्या जुन्यांच्या फक्त आठवणी राहिल्यात आणि कुठल्याच चौकात कुणीच नाय टिकलंय.

गुन्हेगारी विश्व म्हणल्यावर सगळ्यात आधी मुंबई आठवते. दाऊद, छोटा राजन, मन्या सुर्वे अशा न संपणाऱ्या यादीत एक मराठमोळं नावही होतं… अश्विन नाईक.

अश्विनचे मोठे भाऊ अजित आणि अमर दादरमध्ये भाजी विकायचे. हप्ता घेणाऱ्या गुंडांना धडा शिकवायचा म्हणून अमरनं बंड केलं आणि त्याचा प्रवेश गुन्हेगारी विश्वात झाला. अश्विन तसा पेशानं इंजिनिअर, पण अमरचा सख्खा लहान भाऊ असल्यानं तो कधी पोलिसांच्या, तर कधी दुसऱ्या टोळीतल्या गुंडांच्या रडारवर असायचाच.

अश्विनच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट होती, त्याची आधी प्रेयसी आणि नंतर बायको असलेल्या नीतासोबतचं नातं. गुजराथी कुटुंबातून आलेल्या नीताचा आणि अश्विनचा प्रेमविवाह झालेला. अश्विनला सुरुवातीपासूनच गुन्हेगारीत पडण्यात रस नव्हता. नीता आणि त्याचा चेन्नईत जाऊन स्थायिक होण्याचा विचार होता. पण एकदा चेन्नईवरुन परत येताना त्याच्यावर गोळीबार झाला. नीताला भीती वाटू लागली की, या गुन्हेगारीच्या खेळात अश्विनच्या जीवाचं बरंवाईट होणार.

तिनं त्याला आग्रह केला, ‘तुला सहीसलामत राहायचं असेल, तर अमरच्या टोळीत सामील हो.’ इंजिनीअर असलेला अश्विन टोळीत शिरला, त्याच्यात आत्मविश्वास तर होताच, पण गुन्हेगारीत त्याला बळ दिलं, त्याच्या चलाख बुद्धीनं.

पुढं पोलिसांनी अमरचं एन्काऊंटर केलं आणि टोळीची सूत्र आली अश्विनच्या हातात. अमरचा मृत्यू ही अश्विनच्या जिव्हारी लागलेली दुसरी जखम, पण त्याआधी त्याच्यावर खटल्या दरम्यान गोळीबार झाला आणि त्याला अपंगत्व आलं. तरीही अश्विननं अमरची जागा घेतली आणि सगळी टोळी त्याच्या अधिपत्याखाली आली.

अमरचं एन्काऊंटर झालं, तेव्हा अश्विन अमेरिकेमध्ये होता. टोळी चालवायची असेल, तर भारतात येणं भाग होतं, मात्र भारतातली परिस्थिती आधीसारखी नव्हती. प्रतिस्पर्धी टोळ्या आणि पोलिसांचा धोका तर होताच. 

पण आणखी एक गोष्ट अश्विनच्या साम्राज्याला धक्का पोहोचवत होती… त्याची बायको नीता.

फक्त अश्विनची बायको, अमरची वैनी आणि नाईक टोळी चालवणारी महिला अशी नीताची ओळख राहिली नव्हती. सारंकाही आलबेल असताना अश्विनच्याच सल्ल्यानं तिनं राजकारणात प्रवेश केला होता, ती शिवसेनेची नगरसेवकही बनली होती. 

नगरसेवक झाल्यावर पोलिसांचा आणि गुंडाचा त्रास थांबवता येईल असा त्यांचा अंदाज होता. पण आता तिला महत्वाकांक्षा खुणावू लागल्या होत्या, ती स्वतःची स्वतंत्र ओळख बनवण्यात गुंतली. साहजिकच अश्विन आणि तिच्यात अंतर पडलं.

नीता नगरसेवक असताना, तिचं सेनेत चांगलंच वजन असतानाही अमरचं एन्काऊंटर झालं होतं, त्यामुळं अश्विन मुंबईत येण्याचा धोका पत्करत नव्हता. तो दिल्लीत सेटल झाला आणि तिथून सूत्रं हलवू लागला. मात्र दिल्लीत त्याला अटक झाली आणि त्याची रवानगी झाली तिहार तुरुंगात.

दिल्लीत अध्येमध्ये भेटणारी नीता आता जेलमध्ये जायला टाळाटाळ करु लागली. इतकंच नाही, तर सगळी टोळी हातात आल्यावर तिनं तिथंही आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पैशाचे व्यवहार नीताच्या ताब्यात होते, ती टोळीतल्या माणसांना पैसे द्यायला नकार देऊ लागली. अश्विनचे विश्वासू साथीदार सुनील जाधव उर्फ एक्का, हेमंत धुरी, लाली हे नीताच्या मग्रुरीला आणि सततच्या अपमानाला वैतागले होते. त्यांनी अनेकदा अश्विनकडं याबद्दल तक्रार केली.

चिडलेल्या अश्विननं नीताला पत्रं लिहिली. तिचं आणि मुलांचं बरंवाईट करण्याची धमकीही दिली, मात्र नीतावर कसलाच फरक पडला नाही. 

अश्विननं नीताला तिहारमध्ये भेटायला बोलावण्याचे प्रयत्नही करुन पाहिले, मात्र त्याचाही फरक पडला नाही. गुन्हेगारी साम्राज्यात ती अश्विनला जखडून ठेवत होतीच, पण वैयक्तिक जीवनातही असा एक ट्विस्ट आला.. ज्यामुळं अश्विनचं खच्चीकरण झालं.

तो ट्विस्ट म्हणजे निताचं प्रेमप्रकरण.

जीवाला धोका असल्यानं नीताला पोलिस संरक्षण पुरवण्यात आलेलं. तिच्या सुरक्षेसाठी लक्ष्मण झिमण नावाचा एक हवालदार होता. राजकीय जीवनात नीतानं भरारी घेतलेली असली, तरी वैयक्तिक जीवनात मात्र ती एकटी होती. अशावेळी झिमण आणि ती एकत्र आले, सुरुवातीला छुपे असणारे त्यांचे प्रेमसंबंध नंतर उघडउघड सुरू झाले. अश्विनपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत होत्या.

कधीकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्या प्रेमाखातर आपण गुन्हेगारी विश्वात आलो, धोक्याचं आयुष्य जगू लागलो. तीच नीता दुसऱ्याच माणसासाठी अश्विनपायी दूर गेली होती, साहजिकच हि गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्यानं तिला समजवून, धमकी देऊन सगळे मार्ग वापरुन पाहिले, पण नीता बधत नव्हती. अश्विनची टोळीचा प्रमुख म्हणून आणि नीताचा नवरा म्हणून दोन्ही बाजूनं कोंडी झालेली.

तेवढ्यात दिवस उजाडला १४ नोव्हेंबरचा.

शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर, नीता आपल्या मुंबईतल्या घरी आली. ती दरवाजा उघडणार तेवढ्यात तीन चेहरा झाकलेली माणसं तिच्याजवळ आली, त्यातल्या एकानं बंदूक काढली तरीही नीताला भीती वाटली नाही. 

ती बिनधास्त त्याच्याकडे बघत होती आणि तेवढ्यात त्या माणसानं बंदूक तिच्या डोक्याला लावली आणि मुंबईच्या गोंधळाला शांत करणारा गोळ्यांचा आवाज घुमला. नीताचा तिच्या घराच्या दारात खून झाला.

मुंबई हादरली आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली. सगळ्यात आधी त्यांनी तिहारमध्ये अश्विनला गाठलं, मात्र त्यानं हात वर केले. त्यानं एक्का आणि धुरी या आपल्याच माणसांवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी सर्च ऑपरेशन करुन या दोघांना पकडलं, चौकशीही झाली. अखेर कट रचणारा मुख्य आरोपी म्हणून नाव पुढं आलं… 

अश्विन नाईक.

कधीकाळी एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या, एकमेकांना जीवापाड जपणाऱ्या अश्विन आणि नीताच्या लव्हस्टोरीचा अंत असा झाला… जिथं नायिका आपल्याच घराच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि नायक तिहारच्या तुरुंगात.

संदर्भ: भायखळा ते बँकॉक, एस. हुसेन झैदी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.