जिथं स्वतःचा साबण, टूथपेस्ट, टॉवेल घेऊन जावं लागायचं ते मालदीव एवढं लक्झरियस कसं बनलं?
उकाड्याने पार कहर केलाय. नुसत्या मार्च महिन्यात उन्हाने कहर केलाय आणि अजून एप्रिल, मे तरी बाकी आहे. आपली उन्हाळ्याची तयारी काय तर घरातला माठ सुस्थित आहे का हे बघणं, कोकम सरबताची एकाधी बॉटल आणून ठेवणं, डीमार्ट मधून डिस्काउंटमधून कोल्ड्रिंकसच्या बाटल्या भरणं हे असं सगळं. त्यात बॅचलर्स असेल तर गोव्याची एकादी वारी करण्याचा प्लॅन.
पण याचवेळी मग जर इंस्टाग्राम उघडला का तर या बॉलिवूडवाल्यांचे मालदीववरून फोटो येण्यास सुरवात देखील झाली असेल. इंस्टाग्राम नसेल तर काही मिडियावाल्यानी ‘बला की खूबसूरत इस ऍक्ट्रेसने मालदिव मे बिखरे मालदीव मे अपने जलवे’ असं म्हणत हेरॉईनचे फोटो सुद्धा टाकायला सुरवात केली आहे.
बाकी आपल्याला हे त्यांचा सगळं बघून मालदीवला जायची इच्छा आहे हा प्रश्न वेगळा. पण मालदिव आज जे फिरण्यासाठी टॉपचा डेस्टिनेशन झालंय ते असं नव्हतं.
भारताच्या पश्चिमेला हिंदी महासागरात असलेला हा बेटांचा समूह आपल्या भारतानंतर जवळपास २८ वर्षांनी म्हणजे १९६५ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीतुन स्वतंत्र झाला होता.
स्वतंत्र झाला तेव्हा जवळपास त्यावेळी केवळ मच्छीमार लोकांचे वास्तव्य असलेला हा एक दुर्गम बेटांचा समूह, कोणतीही परदेशी गुंतवणूक नसेलला,बाह्य जगासाठी पूर्णपणे अज्ञात असा होता. हुलहुले बेटावर (सध्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ) फक्त एक छोटीशी हवाई पट्टी होती, जी स्वयंसेवकांनी बांधली होती, त्यावर पण नियमित उड्डाणे नव्हती.
“तेव्हा मालदीवमध्ये आमच्याकडे , काहीही नव्हते. ना बँक, ना विमानतळ, ना टेलिफोन फक्त हॅम रेडिओ किंवा मोर्स कोड कोलंबोशी संपर्क. अगदी UNDP तज्ञांनीही सांगितले की पर्यटन इथं कधीही यशस्वी होणार नाही कारण इथं सुविधा नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही ”
असं मोहम्मद उमर माणिकू सांगतात.
मोहम्मद उमर मणिकू आणि त्यांच्या तीन मित्रांनी १९७२ मध्ये कुरुंबा हे देशातील पहिले पर्यटन रिसॉर्ट उघडले होते. तेथं तेव्हा नीट धक्का पण नव्हता. बोटीतून समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना कंबरभर पाण्यात उतरावं लागायचं.
मोहम्मद उमर मणिकू यांना आज मालदीवला स्वर्ग बनवण्यामागचा माणूस म्ह्णून ओळखला जातं.
त्यांचं कुरुंबा हॉटेल आज एक वर्ल्ड फेमस टॉप क्लास रिझॉर्ट आहे. कुरुंबा, ज्याचा मालदीवच्या स्थानिक धिहेवी भाषेत अर्थ “नारळ” आहे, हे मूळतः एक निर्जन नारळाचे शेत होते.
पहिल्या पाहुण्यांची राहण्याची सोय कोरल आणि चुनखडीपासून बनवण्यात आली होती. जे काही स्थानिक पातळीवर मिळत नव्हते ते जहाजाने आणायला लागायचं आणि ते येण्यास तीन महिन्यांपर्यंत उशीर व्हायचा.
बेटावर दुकान नसल्याने टूथपेस्ट, साबण, टॉवेल असल्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतः सोबत आणायला लागायच्या.
मात्र या सोयीसुविधांची कमतरता असतानाही पर्यटकांचा ओढा वाढतच होता. प्रत्येक बेट उथळ पाण्याच्या सरोवराने वेढलेले आहे (जरी हिंद महासागर, त्याच्या खोल निळ्या पाण्याने, पलीकडे आहे). हे तुम्हाला दिसणारे सर्वात स्वच्छ पाणी आहे. आपण खाली पाहू शकता आणि समुद्राच्या तळाशी प्रत्येक गारगोटी पाहू शकता.
निळ्याशार पाण्याने वेढलेली लहान लहान बेटं, शांत किनारा, समुद्राचं पाणी इतकं स्वच्छ की खाली बघितल्यानंतर समुद्राच्या तळातली गारगोटी बघता येइल. त्यात गर्दीपासून पूर्णपणे दूर. त्यामुळे ज्यांना काहीतरी वेगळं अनुभव करण्याची इच्छा होती त्यांचा मालदिवाकडे ओढा असायचा. आणि त्यातूनच पर्यटन विकासाला सुरवात झाली.
मालदिवमध्ये पर्यटन उद्योगाच्या विकासा कसा झाला याचे सुरेशकुमार कुंदूर यांनी त्यांच्या DEVELOPMENT OF TOURISM IN MALDIVES या रिसर्च पेपरमध्ये ५ टप्पे केले आहेत.
पहिला टप्पा १९७२ ते १९७८ पर्यंतचा मानला जातो, तेव्हा पर्यटन मुख्यत्वे अनियोजित होते आणि वैयक्तिक पुढाकार थोडयाफार प्रमाणात सुविधा निर्माण केल्या जात होत्या. या काळात १७ रिसॉर्ट्स होते. संसाधने आणि प्रशिक्षित कर्मचारी यांची कमतरता असल्याने अगदीच ठीकठाक सर्विस दिली जायची.
दुसऱ्या टप्प्यात १९७९ ते १९८८ या काळात आणखी ४१ रिसॉर्ट्सचे निर्माण झाले.
आता मोठ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने रिसॉर्ट्सची स्थापना होत गेली. पर्यटनाच्या दुस-या टप्प्यातील एक महत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे मालदीव सरकारने पहिला मास्टर पर्यटन प्लॅन (FTMP) आणला होता. आणि इथूनच मालदीवच्या पर्यटन उद्योगाचा पाय रचला गेला.
त्यानंतरच्या तीन फेजमध्ये मालदिव सरकारने आणखी दोन मास्टर प्लॅन आणत परदेशी गुंतवणुकीची दारं मोठ्या प्रमाणात उघडण्यास सुरवात केली.
परदेशी गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, एक्सपर्ट्स मालदीवमध्ये येऊ लागले. त्याचबरोबर निसर्गाची कृपा असलेल्या मालदीवमध्ये आता लक्झरियस रिसॉर्ट पण उभा राहिले. एका छोट्या बेटावर एक रिसॉर्ट ही कॉन्सेप्ट चांगली चालली. त्यामुळे गर्दी नं करता पर्यटकांना निवांत टाइम घालवणे शक्य झाले. स्कुबा डायविंग सारखे आधुनिक वॉटर स्पोर्ट्स आणणं परदेशी गुंतवणुकीमुळेच शक्य झालं.
त्याचबरोबर जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था चीन आणि भारत जश्या जश्या फॉर्मात येऊ लागल्या त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात मालदीवला झाला.
पहिला फायदा झाला तिथल्या टुरिस्टचा आणि दुसरा झाला तिथून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा.
२०१८ मध्ये, मालदीवमध्ये १३० बेट-रिसॉर्ट्स होते. आणि आणखी २३ मालमत्ता बांधून पर्यटन कक्षाच्या क्षमतेला चालना देण्यासाठी सध्याचे काम हाती घेतले जात होते. ज्यामध्ये वॉल्डॉर्फ अस्टोरिया, मोवेनपिक, पुलमन आणि हार्ड रॉक कॅफे हॉटेल सारख्या परदेशी विकासकांचा समावेश होता. भारतातल्या ताज ग्रुप सारख्या मोठ्या कंपन्यांची रिसॉर्ट ही तिथं आहेत. मालदीवच्या सगळ्यात जास्त महसूल हा पर्यटन व्यवसायातून येतो.
मात्र पृथ्वीवरच्या या स्वर्गाला आता अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
२००८च्या त्सुनामीनंतर या देशाने पुन्हा उभारी घेतली होती. मात्र आता क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढणाऱ्या समुद्राच्या पातळीमुळे मालदीवच्या अनेक बेटांना धोका निर्माण झाला आहे. त्यात तिथल्या राजकीय अस्थिरतेचा फटका ही देशाला बसत आहे. तसेच भारत आणि चीन या दोन देशांच्या दबावाचा ही सामना देशाला वारंवार सहन करावा लागतो. बरं मालदीव तसं बघितला तर आशियातल्या श्रीमंत देशांपैकी एक येइल मात्र ही श्रीमंती राजधानी मालेच्या आसपासच्या काही बेटांपुरतीच मर्यादित आहे.
बाकी देश मस्तंय …
हे ही वाच भिडू :
- खरंच वानखेडे फॅमिली वसुलीसाठी दुबई मालदीवला गेले होते का ?
- पुण्यात तुम्हाला प्रसाद नायक ओळख देत नसले तर समजून घ्या अजून काम करायची गरज आहे
- गडकरींची ‘उडणारी बस’ यापैकीच एक असेल