पुणे आणि मुंबईच्या माघी गणेशोत्सवात काय फरक असतो?

सकाळी सकाळी चौकात लागलेल्या स्पीकरवर गाणं सुरू असतं, ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.’ रस्त्यावरुन जाताना ठिकठिकाणी मांडव, देखावे दिसतात आणि गणेशोत्सवाचा माहोल तयार होतो. पताकांनी सजलेले गल्लीबोळ, गर्दीनं फुललेले रस्ते आणि गावाकडं जत्रेला असतं त्यापेक्षा भारी वातावरण मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये गणेशोत्सवा दरम्यान असतं.

आता दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर एक हलकीफुलकी मजा सुरू असते, ती म्हणजे कुणाचा गणेशोत्सव भारी? ही मजा मजाच राहते कारण पुण्याची पोरं लालबागच्या राजाला आणि मुंबईची पोरं दगडूशेठ हलवाई गणपतीला येणं काही चुकवत नाहीत.

गणेशोत्सव म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर ऑगस्ट-सप्टेंबरचे दिवस येतात. आभाळ दाटलेलं असतं किंवा रस्त्यावर हलक्या सरींचे पडसाद उमटून गेलेले असतात आणि पाऊस पडलाच तरी उत्सव साजरा करण्याचा उत्साह काय कमी होत नाही. हे सगळं चित्र असतं मराठी महिन्यांनुसार भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाचं. पण याचबरोबर राज्याच्या काही भागांमध्ये माघी गणेशोत्सवही जोरदार साजरा केला जातो.

आता आपल्याला साहजिकच प्रश्न पडतात, की या दोन्ही गणेशोत्सवांमध्ये नेमका काय फरक आहे? गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे आणि मुंबईत माघी गणेशोत्सव कसा साजरा होतो? आणि सोबतच माघी गणेशोत्सव साजरं करण्याबाबतचं कारण नेमकं काय आहे?

माघी गणेशोत्सव साजरं करण्याबाबतचं कारण आधी जाणून घेऊ…

प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक त्यांच्या ’99 थॉट्स ऑन गणेशा’ या पुस्तकात लिहितात, ‘माघ शुद्ध चतुर्थीला गणेशजयंती साजरी केली जाते. त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असं मानलं जातं. अर्थात काही जणांचा मते भाद्रपदामध्ये गणेशजन्म मानला जातो. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमध्येही मग महिन्यात हा सण साजरा केला जातो.’

पुण्यात माघी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो?

तर पुण्यात जसा उत्साह किंवा जल्लोष भाद्रपदामधल्या गणेशोत्सवात असतो, तसं वातावरण माघ महिन्यात नसतं. पुण्यातली गणपती मंडळं वर्षभर आपल्या मुर्त्यांचं पूजन करतात, या मुर्त्या मंदिरात असतात, त्यामुळं गणेश जन्माचा उत्सव हा मंदिरांमध्येच साजरा केला जातो.

पुण्यातला पोटसुळ्या मारुती गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते कुणाल पवार सांगतात, ”माघी गणेशोत्सवात म्हणजेच गणेश जन्माच्या दिवशी पुण्यातली मंडळं गणेश याग, होमहवन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. सोबतच सामाजिक संस्थांमध्ये आणि गणपती मंदिरापाशी अन्नछत्र आयोजित केलं जातं. वेगवेगळ्या वयोगटांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाप्रमाणं यादिवशी मिरवणुका वैगरे निघत नाहीत. मंडळापाशीच आरास केली जाते. मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या असल्यानं शैक्षणिक उपक्रम घेण्याकडे मंडळांचा कल असतो.”

आता येऊयात मुंबईकडे

गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते आशिष तांबे सांगतात, ”मला आठवतंय त्याप्रमाणं १६-१७ वर्षांपूर्वी मुंबईत माघी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप आलं. मंडळांची संख्या काहीशी कमी असली, तरी ज्या उत्साहात भाद्रपदामधला गणेशोत्सव साजरा होतो, त्याच उत्साहात मुंबईत माघी गणेशोत्सव साजरा होतो. माझ्या माहितीप्रमाणं चारकोपचा राजा मंडळानं माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करायला सुरुवात केली. मुंबईमध्ये अनेक घरांमध्येही गणेश मूर्ती बसवून उत्सव साजरा केला जातो. या दिवसांमध्ये आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होते. ज्या प्रकारे भाद्रपदात आगमन सोहळे, मिरवणूका होतात, अगदी त्याचप्रमाणं माघी गणेशोत्सवातही होतं. काही मंडळं पाच दिवसांनी, तर काही मंडळं सात दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करतात.”

गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ च्या संसर्गामुळं सगळेच उत्सव साधेपणानं होत आहेत. साहजिकच उत्सवावर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यांना नुकसान सहन करावं लागतंय. पुणे आणि मुंबईसोबतच कोकणात आणि राज्याच्या इतर काही भागांमध्येही माघी गणेशोत्सव आणि गणेशजन्म साजरा होतो. उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी लोकांना एकत्र आणण्याचं काम हमखास होतं, हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.