कोयनेच्या भूकंपात मदतीसाठी मागितल्या १००० घोंगड्या, प्रशासनाने पाठवल्या १००० कोंबड्या. 

इतिहासाची पाने चाळताना कधी कुठे आणि काय हाती लागेल ते सांगता येत नाही. तर विषय होता कोयना भूकंपाचा. पर्यायाने यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल देखील लिखाणाचा शोध घेत असताना अस्सा एक किस्सा बोलभिडूच्या हाती लागला की तो तुम्हाला सांगितल्याशिवाय रहावलां नाही. 

तर या घडामोडींची सुरवात होते बाळासाहेब देसाई यांच्यापासून. 

तेव्हा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक तर गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई. बाळासाहेब देसाई हे कॉंग्रेसचे मोठ्ठे नेते पण राजकारणातले छक्के पंजे माहित नसणारे नेते. निर्णय घेत असताना तो लोकांच्या भल्याचाच असेल हा विचार ते करायचे. 

अशाच एका घटनेमुळे त्यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं. मुंबईमध्ये गिरणी कामगारांनी आंदोलन केले होते. गिरणी कामगारांच्या या मोर्चाने हिंसक वळण घेतले. तेव्हा मोर्चाचा बंदोबस्त करण्यासाठी गृहमंत्र्यांनी गोळीबाराचे आदेश द्यावेत असा दबाव आला होता. पण गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी हि सुचना पाळली नाही. 

तत्कालिन मुंबई कॉंग्रेसने त्यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेण्याची मागणी केली. त्यांच्या विरोधात दोन नेत्यांनी आपला राजीनामा देखील सुपूर्त केला. तेव्हा स.का.पाटील यांच्या मध्यस्तीने हे प्रकरण मिटवण्यात आले आणि बाळासाहेब देसाईंकडे महसुल खाते देण्यात आले. 

११ डिसेंबर १९६७.

कोयनानगर भूकंपाने हादरले. दख्खनच्या पठारावर कधीच भूकंप होवू शकत नाही असे म्हणणारे भुगर्भशास्त्रज्ञ देखील कोड्यात पडले. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. 

शासनदरबारच्या आकडेवारीनुसार या भूकंपात १८५ जणांचा मृत्यू होऊन परिसरातील ६० गावांतील ४० हजार ४९९ घरे आणि पायाभूत सुविधा पूर्णतः उद्‌ध्वस्त झाल्या होत्या. ९३६ पशुधन प्राणाला मुकले होते. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती.

पण त्यावेळी नेमकी किती जीवित हानी झाली आहे हे समजणं देखील अवघड होतं. दुर्गम आणि दऱ्या खोऱ्यांच्या या भागात मदतीसाठी त्या वेळीचे राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब देसाई धावून आले. त्यांनी कोयनेच्या परिसरात मुक्काम ठोकला. वाड्या वस्त्यातून पायी हिंडले आणि त्या कोसळलेल्या आपत्तीत फक्त दिलासा दिला नाही तर लवकरात लवकर तेथील लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. 

याच काळात बाळासाहेब देसाई यांनी मुंबईला तार पाठवली.

यामध्ये त्यांनी लिहलं आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने लवकरात लवकर १००० घोंगड्या पाठवून द्याव्यात.

साहजिक डिसेंबरचा महिना असल्याने घोंगड्यांची गरज जास्त होती. 

मात्र मुंबईत ती तार पोहचताना, घोंगड्यांच्या ऐवजी कोंबड्या अशी पोहचली. प्रशासनाने देखील या गोष्टीची खातरजमा केली नाही. कोंबड्या तर कोंबड्या म्हणून चक्क एक हजार कोंबड्या कोयनेच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.

पुढे हे प्रकरण वसंतराव नाईकांना समजलं. अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याशिवाय दूसरा पर्याय देखील नव्हता पण अशा या संकटाच्या समयी देखील प्रशासनाचा गलथानपणा पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आलच असणार. 

Leave A Reply

Your email address will not be published.