दीड दिवसात २५० मंडळं ते सेलिब्रेटींच्या भेटी, एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव असा साजरा केला…

गणेशोत्सव संपून ५-६ दिवस झाले, पण अजूनही कुठल्याही कट्ट्यावर जा यंदाचा गणेशोत्सव हाच ट्रेंडिंगमधला मुद्दा असतो. मिरवणूक किती लांबली, कुणी काय डेकोरेशन केलं होतं या असल्या चर्चा होत नाहीत. चर्चा होते ती एकाच गोष्टीची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केलेला गणेशोत्सव.

महाराष्ट्रात यावर्षी दहीहंडीही जोरदार साजरी झाली, त्याचवेळेस एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध नसतील अशी घोषणा केली. गणेशोत्सव साजराही अगदीच जोरदार झाला, पण  विषय गाजला तो एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेश मंडळांना, नेत्यांना आणि सेलिब्रेटींना दिलेल्या भेटींचा. या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात एकनाथ शिंदे कुठे कुठे गेले, त्यांच्याकडे गणपती दर्शनाला कोण कोण आलं हेच पाहुयात.

गणेशोत्सवाचा पहिला दिवस, ३१ ऑगस्ट

मुख्यमंत्र्यांनी वर्षा या सरकारी आणि आपल्या ठाण्यातल्या खासगी निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्या ठाण्यातल्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या किसननगर भागातल्या अनेक गंपती मंडळांना भेटी देत आरती केली. किसननगर भागातूनच एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. त्यामुळं तिथल्या मंडळांना भेट देण्यावर त्यांनी भर दिला होता.

गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, १ सप्टेंबर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानी भेट देत गणपतीचं दर्शन घेतलं. पण हा दिवस गाजला त्यांनी घेतलेल्या नेत्यांच्या घरच्या गणपती दर्शनामुळं. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. या भेटीमुळं शिंदे गट मनसेत विलीन होणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं होतं. सोबतच एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. गेली काही वर्ष शिवसेनेचे जोशी सर सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्याचबरोबर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचीही चर्चा आहे.

पण या दिवशीचं सर्वात गाजलेलं गणपती दर्शन ठरलं, ते मिलिंद नार्वेकर यांच्या घरचं. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांच्या घरी एकनाथ शिंदे पोहोचले. गणपती दर्शनानंतर त्यांनी नार्वेकरांसोबत गप्पाही मारल्या. हे फोटो व्हायरल झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

गणेशोत्सवाचा तिसरा दिवस, २ सप्टेंबर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेते मोहित कंभोज यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रीय नेते असणाऱ्या नारायण राणे यांच्याही घरच्या गणपतीला दर्शनासाठी भेट दिली. रात्री उशिरा एकनाथ शिंदेंनी आपल्या ठाण्यातल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतल्याची माहितीही त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन मिळते.

गणेशोत्सवाचा चौथा दिवस, ३ सप्टेंबर

या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी केंद्रीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट दिली. सोबतच एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या टेंभीनाका इथं होणाऱ्या नवरात्रोत्ससाठी देवीच्या मूर्तीचं पाटपूजनही केलं.

गणेशोत्सवाचा पाचवा दिवस, ४ सप्टेंबर

मुख्यमंत्र्यांचं सोशल मीडिया पेज पाहिलं, तर यादिवशी मंडळांना किंवा नेत्यांच्या गणपतींना भेट दिल्याची माहिती मिळत नाही. पण रात्री उशिरा मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर उपस्थित होते.

गणेशोत्सवाचा सहावा दिवस, ५ सप्टेंबर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा मंडळाला भेट दिली. त्यानंतर वर्षा बंगल्यावर गणेश दर्शनासाठी आलेल्या अमित शहांचं स्वागतही त्यांनी केलं. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझा, झी २४ तास, टीव्ही ९, न्यूज १८ लोकमत या माध्यमांच्या कार्यालयांना भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. याचवेळी त्यांनी दीड दिवसांच्या अडीचशे-तीनशे गणपतींचं दर्शन घेतलं, असं वक्तव्य केलं.

गणेशोत्सवाचा सातवा दिवस, ६ सप्टेंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षावर सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘जलभूषण’ या निवासस्थानी भेट दिली आणि तिथल्या गणपती विसर्जनातही भाग घेतला.

गणेशोत्सवाचा आठवा दिवस, ७ सप्टेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई व जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश दर्शनासाठी भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही वर्षावर भेट दिली. त्यानंतर गाजला तो एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात एकनाथ शिंदेंनी मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ, राजाराम मंडळ अशा प्रसिद्ध मंडळांसह आपल्या कार्यकर्त्यांच्या मंडळांनाही भेटी दिल्या. त्यांच्या पुण्यातल्या गणपती दर्शनाचा आकडा जवळपास १५ होता. या पुणे दौऱ्यात कोणतीही बैठक न घेता केलेलं गणपती दर्शन चांगलंच गाजलं. सोबतच त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे इथल्या घरीही गणेश दर्शन घेतलं.

गणेशोत्सवाचा नववा दिवस, ८ सप्टेंबर

मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं आणि त्यानंतर वर्षा बंगल्यावर गणेश दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचीही भेट घेतली.

गणेशोत्सवाचा दहावा आणि विसर्जनाचा दिवस, ९ सप्टेंबर

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर टेंभीनाका इथं नवरात्रोत्सवासाठीच्या मंडपाचं भूमीपूजनही केलं. याच दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी वर्षा या निवासस्थानी भेट देत गणपतीचं दर्शन घेतलं. यात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, राजकुमार हिराणी, सारा अली खान, जॅकी श्रॉफ, श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी अशा बॉलिवूड सिताऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत गिरगाव चौपाटीला उपस्थित राहत गणपतीवर पुष्पवृष्टी केली.

सोबतच त्यांनी नवरात्रोत्सवही असाच धुमधडाक्यात साजरा होईल, अशी घोषणाही केली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.