महाराष्ट्रात शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी कशी ठरली?

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीमुळं अनेकदा वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात. मागच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेत आलेला. फक्त विधानसभेतच नाही, तर राज्याच्या राजकारणातही शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधक आमने सामने येत असतात.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२२ च्या मार्च महिन्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी केली होती. त्यावरुन भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला. शिवजयंतीची अधिकृत तारीख १९ फेब्रुवारी असून देखील मुख्यमंत्र्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केल्याने भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शिवला होता.

तेंव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं कि, ”उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तो भाग वेगळा आहे मात्र आघाडी सरकारच्या काळात १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित करण्यात आली आहे, तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री १९ फेब्रुवारीला शासकीय कार्यक्रमांना आणि किल्ले शिवनेरीवर उपस्थित असतात.”

शिवजयंती तारखेला की तिथीला, यावरुन राजकीय वाद कायमच होत असतात. मात्र महाराष्ट्रात शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी कशी ठरली? हे जाणून घेऊया..

त्यासाठी आधी पाहूया फाल्गुन वद्य तृतीया की १९ फेब्रुवारी, हा वाद अगदी सुरुवातीपासून काय होता ?

तर त्या आधी ६ एप्रिलला शिवजयंती साजरी व्हायची.

छत्रपती शिवरायांच्या जयंतीची तारीख निश्चित होण्यासाठी महाराष्ट्राला प्रचंड वाट पाहावी लागली. सुरुवातीला उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरुन शिवरायांचा जन्म वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ ला झाल्याचं मानलं जात होतं. यानुसार शिवरायांच्या जन्माची तारीख होती, ६ एप्रिल १६२७. मात्र बिकानेरमध्ये सापडलेली शिवरायांची जन्मपत्रिका आणि जेधे शकावलीत असलेली शिवरायांच्या जन्माची नोंद यामुळं फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या तिथीला महाराज जन्मल्याचं समोर आलं. त्यानंतर इतिहास संशोधन मंडळानं फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.

मात्र शासकीय पातळीवर हा तिढा सुटला नव्हता…

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर १९६६ मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी यावर तोडगा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी इतिहास तज्ञांची एक समिती स्थापन केली. समितीतल्या तीन सदस्यांनी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजयंतीची अधिकृत तारीख असल्याचं सांगितलं. तर एका सदस्यानं वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ म्हणजेच ६ एप्रिल १६२७ ही शिवजयंतीची तारीख असल्याचं मत व्यक्त केलं. दोन वेगळे मतप्रवाह असल्यामुळं शिवजयंतीची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही.

मनोहर जोशींचे प्रयत्न

राज्यात मनोहर जोशींच्या नेतृत्वात युतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचं ठरवलं. त्यांनीही तज्ञांची समिती नेमली, याच्या अध्यक्षपदी इतिहासतज्ञ गजानन मेहेंदळे होते.  या समितीनं दिलेल्या अहवालात तिथीप्रमाणं फाल्गुन वद्य तृतीया आणि तारखेनं १९ फेब्रुवारी या दिवसांवर शिक्कामोर्तब झालं. मात्र शासनदरबारी अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही.

विलासरावांनी उठवली मोहोर

दरम्यानच्या काळात युतीचं सरकार जाऊन राज्यात आघाडी सरकार आलं होतं. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा पुन्हा शिवजयंतीच्या तारखेचा मुद्दा चर्चेत आला. विलासरावांनी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी पुढाकार घेतला. 

मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या निष्कर्षांना विचारात घेऊन २००० साली विलासरावांनी राज्य सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करेल असा निर्णय जाहीर केला आणि शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. त्यावर्षीपासून १९ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. 

आपल्या एका भाषणात बोलताना विलासराव म्हणतात, ”तारीख जाहीर झाल्यानंतरही काही लोक १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करत नाहीत. ते पंचागाप्रमाणं शिवजयंती साजरी करतात.  मला अभिमान आहे की, माझ्या कार्यकाळात हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. शासनाच्या वतीनं एकच तारीख जाहीर झाली आहे आणि तेव्हाच शिवजयंती साजरी होईल.”

विलासराव देशमुख यांच्या सरकारनं १९ फेब्रुवारी हि अधिकृत तारीख जाहीर केली असली, तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचा आदेश शिवसैनिकांना दिला. त्यामुळं राज्यात दरवर्षी १९ फेब्रुवारी आणि फाल्गुन वद्य तृतीया या दोन्ही दिवसांना शिवजयंती साजरी होऊ लागली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवजयंतीबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 

गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्यात यावी अशी मागणी विविध पक्षांकडून आणि संघटनांकडून सातत्यानं केली जातीये. मात्र शिवसेना फाल्गुन वद्य तृतीयेलाच शिवजयंती साजरी करत आली आहे.

कोविडच्या संकटानंतर यंदा शिवजयंती उत्साहात साजरी झाली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या शासकीय सोहळ्याला उपस्थिती लावली. तर फाल्गुन वद्य तृतीयेला (यावर्षी २१ मार्च) शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावत मुंबई विमानतळाजवळच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाच्या प्रांगणातल्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मनसेनंही राज्यभरात मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी राज्य सरकारची शिवजयंती बाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरी आगामी काळात, तारीख आणि तिथीवरुन पुन्हा राजकीय वाद पेटणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.