महाराष्ट्राच्या चित्ररथाला एकदा दिल्लीतल्या राजकारणानं हरवलं होतं…
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची शान म्हणजे राजपथावर होणारं संचलन आणि वेगवेगळ्या राज्यांचे आणि विभागांचे चित्ररथ. हे चित्ररथ जेव्हा डौलात जात असतात, तेव्हा आपसूकच आपली मान अभिमानानं उंचावते. त्यातही महाराष्ट्राचे चित्ररथ म्हणजे विषयच नाही. दैदिप्यमान रथांची महाराष्ट्राची परंपरा अगदी जुनी आहे. यंदा राज्यातल्या साडेतीन शक्तीपिठांची प्रतिमा चित्ररथावर दिसणार आहे.
पण याआधी एकदा असा प्रसंग आला होता, जेव्हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तर पार पडला पण त्यात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता.
गोष्ट आहे १९९६ ची. त्या आधी महाराष्ट्रानं १९९३ मध्ये गणेश पालखी, १९९४ मध्ये आंबा आणि १९९५ मध्ये गांधी शताब्दी या विषयांवर भव्य चित्ररथ केले आणि सलग तीन वर्ष पहिला क्रमांक पटकावला. आता सलग चौथ्या वर्षी पारितोषिक जिंकण्याची महाराष्ट्राला संधी होती. नुकतंच राज्यातलं सरकार बदललं होतं, नव्या सरकारनं विषय निवडला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य.
तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांनी चार विषय सुचवले होते, ‘स्वराज्याची शपथ, शिवराय आणि रामदास स्वामी भेट, कल्याणच्या सुभेदाराची सून आणि मराठा आरमार.’ प्रसिद्ध चित्रकार पांडुरंग कोठारे यांनी काढलेली स्वराज्याची शपथ आणि मराठा आरमार या विषयांवरची चित्र दिल्लीच्या निवड समितीनं निवडली.
पुढच्या चर्चेसाठी कोठारे दिल्लीला पोहोचले, तेव्हा समितीनं त्यांना सांगितलं की, ‘मराठा आरमाराचा विषय आम्ही नक्की करत आहोत. पण स्वराज्याची शपथ, कल्याणच्या सुभेदाराची सून आणि शिवराय व रामदास स्वामी भेट हे विषय दिल्लीतल्या जनेतला कळणार नाहीत आणि आवडणारही नाहीत.’ मराठा आरमाराचा विषय नक्की झाला असला, तरी त्यातही समितीनं एक शंका काढली.
त्यांची शंका अशी होती की, ‘मराठा आरमाराच्या जहाजावरचा ध्वज भगवा कसा काय? या ध्वजाचा रंग भगवा कसा काय असू शकतो, याचे पुरावे सादर करा.’
समितीच्या या शंकेवर चित्रकार कोठारे चांगलेच खवळले, ते थेट मुंबईला आले आणि प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या तत्कालीन संचालकांना भेटले. त्यांनी सुचवलेली पुस्तकं इंडियन नेव्हीकडून मिळवत कोठारे यांनी सगळे पुरावे दिल्लीतल्या समिती समोर सादर केले.
आता ज्या गोष्टीवर शंका घेतली जात होती, त्याचेच पुरावे सादर केल्यानं कोठारेंची चिंता मिटली होती. मात्र समितीच्या मनात नेमकं काय होतं, हे तेच जाणे. कारण त्यांनी ‘जहाजाला व्हले का दाखवले नाहीत?’ असा भलताच आक्षेप घेतला.
आता मात्र कोठारे चिडले, ते म्हणाले,’ मराठा आरमाराची जहाजं मोठ्या समुद्रातच नांगर टाकून असतात, त्यामुळे व्हल्यांची गरजच काय? जर नेव्हीच्या पुस्तकातच जहाजाला व्हले दाखवले नसतील, तर मी कसे काय दाखवणार? काल्पनिक चित्र कशाला काढू?’ विशेष म्हणजे निवृत्त मेजर आणि संरक्षण सचिव यांचा समावेश असलेली निवड समितीच नेव्हीच्या पुस्तकातल्या चित्रांवर शंका घेत होती.
सगळ्या पातळ्यांवर लढून कोठारे यांनी समितीची मान्यता मिळवलीच. नृत्य आणि संगीत दिग्दर्शन कोण करणार या सगळ्या गोष्टी नक्की झाल्या. पण जेव्हा मंजूर झालेल्या चित्ररथाचं मॉडेल घ्यायला कोठारे गेले तेव्हा त्यांना समजलं की, ‘मराठ्यांचं आरमार या विषयावरचा महाराष्ट्राचा चित्ररथ समितीनं नामंजूर केला आहे.’
कोणतंही कारण न देता, महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला गेला आणि सलग तीन वर्ष पुरस्कार जिंकलेल्या महाराष्ट्राला संधीच मिळाली नाही. दिल्लीतल्या राजकारणाचा महाराष्ट्राला असा फटका बसला.
हे ही वाच भिडू:
- प्रजासत्ताक दिनाची शान असलेल्या चित्ररथांची निवड नक्की कशी केली जाते
- ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ सिनेमा आणि ‘मराठा आरमार’ यामध्ये “हे” कनेक्शन आहे..
- थोरल्या शाहू छत्रपतींच्या भीतीने मुंबईभोवती बांधण्यात आलं होतं ‘मराठा डीच’