6 पैकी फक्त 2 वेळाच मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे हजर होते, प्रोटोकॉल काय सांगतो..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी देहूला भेट दिली आणि संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचं लोकार्पण केलं. यावेळी पुणे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

मात्र लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थित होते. 

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागताला उपस्थित होते.

इतिहास पाहीला तर “कधी हा कधी ना” असाच आहे. कारण प्रोटोकॉल नुसार पंतप्रधानांच्या स्वागताला मुख्यमंत्र्याची उपस्थिती आवश्यक असते. पैकी कितीवेळा मुख्यमंत्री उपस्थित होते व कितीवेळा नव्हते यावर एक नजर टाकू..

1) पहिला दौरा म्हणजे, डिसेंबर २०१९ 

पुण्यातील आयआयएसइआर येथील डीजीएसपी आणि आईजीएसपी कॉन्फरन्सला दिलेल्या भेटीचा. 

ही तीन दिवसीय कॉन्फरन्स ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१९ दरम्यान पार पडली. या वेळी नुकतेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. मोदींच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रोटोकॉलनुसार स्वतः उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले होते. 

2) दुसरा दौरा म्हणजे, २८ नोव्हेंबर २०२०

करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात, २८ नोव्हेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसनिर्मिती करणाऱ्या संस्थांना भेटी दिल्या. यात त्यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया या संस्थेला भेट दिली.

यात अनेक देशांच्या राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचाही समावेश होता. हा दौरा धावत्या स्वरूपाचा असल्याने राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. 

यामुळे या दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानाच्या स्वागताला उपस्थित नव्हते.

3) तिसरा दौरा म्हणजे… ६ फेब्रुवारी २०२२.

२०२१ च्या सालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याचा एकही दौरा केला नाही. यानंतर  भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनांनंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ०६ फेब्रुवारी २०२२ पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले होते,

तेंव्हा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित नव्हते. 

त्यादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वागताला उपस्थित राहिलेले. 

4) त्याच्या एकाच महिन्यानंतर मोदींनी महाराष्ट्राचा ४ था दौरा केलेला…

६ मार्च २०२२.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील बहुप्रतीक्षित मेट्रोचं उदघाटन करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केलेला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पुण्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. 

तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सुवर्णमहोत्सवी या सोहळ्याचे उदघाटन केले होते.

यावेळी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागताला उपस्थित नव्हते.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

प्रकृत्ती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे हजार होते.

5) पाचवा दौरा म्हणजे, २४ एप्रिल २०२२

मास्टर दीनानाथ मंगेशकर संस्थेतर्फे दिला जाणारा पहिलाच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार असं जाहीर केलेलं, त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे मुंबईला आले. या वेळी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागताला उपस्थित नव्हते.

त्याचं कारण म्हणजे, या कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचं नाव नसल्याने त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहत नसल्याचे सांगितले.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले होते.

6) सहावा दौरा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे आणि मुंबईचा दौरा.. 

यापैकी पुण्याच्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार मोदींच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. मात्र मुंबई येथे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. 

मात्र याबाबत प्रोटोकॉल काय सांगतो

राजशिष्टाचारानुसार, पंतप्रधानांना व्ही.व्ही.आय.पी चा दर्जा असतो. दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासोबत विशेष विमानाने ४० ते ६० जणांचा स्वतंत्र स्टाफ येत असतो. व्हीव्हीआयपींचे  स्वागत अग्रक्रमाने करण्याची नियमावली आहे. 

यात यादीत अनुक्रमे राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, (संबंधित शहराचा प्रथम नागरिक) महापौर, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असते. 

यापैकी कुणीही स्वागतासाठी अनुपस्थित राहिल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते. तसेच स्वागत करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या फॉर्मल पोशाखात येणं आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या युनिफॉर्ममधे येणं अपेक्षित असतं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.