मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..

साल होत १७३९. बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा हे शिंदे, होळकर, त्र्यंबक घोरपडे, बाजी भिवराव, खंडोजी मानकर अशा सरदारांना घेऊन कोकणात उतरले होते. गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला होता. मराठ्यांनी वसई, ठाणे, केळवे माहीम, डहाणू असे अनेक किल्ले आपल्या शोर्याने जिंकले .

अशातच प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही तारापूरचा किल्ला काही हाती लागत नव्हता.

तारापूर म्हणजे पोर्तुगीजांच्या दमण जिल्ह्यामधील प्रमुख आणि श्रीमंत गाव होतं. सुरतशी पोर्तुगिजांचा व्यापार या गावामार्फत व्हायचा. तारापूरचा किल्ला हा खूप मजबूत होता.

या किल्ल्यावर हबशापासून मुघलापर्यंत अनेकांनी हल्ले केले होते पण पोर्तुगीजानी हे सगळे हल्ले सहज परतवून लावले होते. पण चिमाजी अप्पाने हा किल्ला मिळवायचाच चंग बांधला होता. पण पेशव्यांच्या एकापेक्षा एक नामांकित सरदारांना यश मिळत नव्हते.

चिंतातूर आणि तणावाच्या परिस्थितीत एक दिवस सगळी खाशी सरदार मंडळी श्रीमंत अप्पासाहेबांच्या पंक्तीस बसली. वाढप्यांनी पाने वाढल्यावर त्यांच्यापैकी एक जण भातावर तूप वाढायला घेऊन आला. वाढता वाढता तो एका सरदारापाशी आला. त्याच्या ताटात तूप वाढले.

पण ते तूप पाहताच सरदाराचा पारा चढला. तूप शिळे होते. आपण कोठे आहोत याचे भान विसरून सरदाराने वाढप्याला वाटी फेकून मारली.

त्याचे नाव होते बाजी भिवराव रेठरेकर कुलकर्णी.

बाजी भिवरावचे खुद्द चिमाजी अप्पा पेशव्यांच्या समोर केलेले हे कृत्य बघून अख्खी पंगत स्तब्ध झाली. पण तरी पंगतीतला एक जण कुत्सितपणे म्हणालाच,

“आमच्या सरदार मंडळींना या युद्धाच्या धामधुमीतही तुप साजूक नसल्याचा राग येतो. पण तारापूरचा किल्ला आज कित्येक दिवस झाले हस्तगत होत नाही याचा राग येत नाही.”

हे वाक्य ऐकताच बाजी भिवरावाने आपले वाढलेले ताट बाजूला सारले. शेजारी बसलेल्या आपल्या अठरा वर्षाच्या पोरालाही उठवले.

“आता किल्ला हस्तगत केल्यावरच अन्नग्रहन करू”

अशी प्रतिज्ञा करूनच तो उठला. बापलेक आपल्या पथकाचे सैन्य घेऊन किल्ल्याच्या तटबंदीला जाऊन भिडले. जोराचा हल्ला केला. 

पेटून उठलेल्या त्या पितापुत्राला बघून बाकीच्या सरदार मंडळीमध्येही चेव चढला. आवेशामध्ये सगळे आपापली पथके घेऊन बाजी भिवरावच्या मदतीला आले. किल्ला मिळाल्याशिवाय कोणीच तोंडात अन्न घेणार नाही असा संकल्प केला. पोर्तुगीजांच्याही लक्षात आले आज झालेल्या हल्ल्याचा नूरच काही वेगळा आहे.

खंडोजी मानकर या योध्याने गुराख्याच्या वेशात किल्ल्यात घुसून बरीच माहिती मिळवली होती ती उपयोगी पडली.

राणोजी भोसलेनी तटबंदीला चार सुरुंगे लावली त्यातली दोन उडाली. ताटाला मोठे भगदाड पडले. मराठे प्राण पणाला लावून लढू लागले. काही मावळे खिंडारातून आत घुसत होते तर काहीजण तटावरून चढून जायचा प्रयत्न करत होते. अशातच एका फिरंगी सैनिकाने तटावरून मारलेली गोळी बाजी भिवरावाला येऊन लागली.

ते पाहताच त्याचा मुलगा बापूजी बेभान झाला. त्याने आपल्या तलवारीने दिसेल त्याला कापून काढले. अखेर मराठ्यांनी भगवा तारापूरच्या किल्ल्यावर फडकवला. बाजी भिवराव रेठरेकराने सुखाने प्राण सोडले.

बाजी भिवराव याचं मुळगाव कऱ्हाड तालुक्यातलं कृष्णाकाठच रेठरे बुद्रुक. त्याचे वडील तिथले कुलकर्णी. तळेगावच्या दाभाड्यांच्या इथे कारकुनी करताना त्यांची ओळख बाळाजी विश्वनाथशी झाली. दोघेही जीवाभावाचे मित्र बनले.

त्यांची दोस्ती इतकी घट्ट होती की बाळाजी विश्वनाथने भिवराव रेठरेकराच्या मुलांच्या नावावरून आपल्या मुलांची नावे बाजी आणि चिमणाजी अशी ठेवली होती. 

हा मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत आला होता. बाजी भिवराव हा बाजीराव पेशव्याच्या प्रत्येक मुलुखगिरीत सावलीप्रमाणे असायचा. त्याच्या बलिदानाची बातमी ऐकताच बाजीराव तडक त्याच्या घरी सांत्वनास गेला. बाजी भिवरावच्या आईस तो म्हणाला,

” ईश्वरी मोठे अनुचित केले.आमचा तर भाऊ गेला. बाजू गेली. त्यावर उपाय नाही. सारांश मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.