बालभारतीच्या पुस्तकातला धडा महाराष्ट्रातल्या बोली भाषांमध्ये वाचून बघ भिडू…
लहानपणी आपण बोलायला शिकतो, म्हणजे काय शिकतो? तर भाषा. पार आई या शब्दापासून, आपलं आणि भाषेचं नातं सुरू होतं. पुढं शाळेत भाषा हा अभ्यासाचा विषय झाला. लोड घेऊ नका कुणाला किती मार्क होते, हे काय आम्ही विचारणार नाय. आम्ही जरा तुम्हाला फिरवून आणणारे, बोली भाषांमधून.
बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात एक धडा होता, एकदम साधा. त्याचं नाव आपलं ‘आमचे घर.’ आता सुरूवातीला तुम्ही तो धडा वाचा आणि मग हाच धडा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांमध्ये वाचायचा आनंद घ्या.
हे पाहा आमचे घर.
आमचे घर कौलारू आहे. हे अंगण, हा ओटा.
ही बाबांची बैठक. हे सैपाकघर.
ही झोपायची खोली. मधे हा चौक आहे.
चौकात हौद आहे. हौद खूप मोठा आहे.
पलीकडे गोठा आहे. हे आमचे बैल.
हा हैबती. हा दौलती. हैबती, दौलती औत ओढतात.
कधी गाडी ओढतात. कधी मोटही ओढतात.
हे समोर मोठे मैदान आहे. चला, मैदानावर जाऊ.
विटीदांडू खेळ. लंगडी खेळू. हसू, खेळू, मौज करू.
तुम्ही जसा चालीत आणि बालपण आठवत हा धडा वाचलात, तसा आम्हीपण वाचला आणि काही भिडूंना पाठवला. आता वाचा त्यांच्या त्यांच्या भाषेतलं व्हर्जन…
सुरुवात करु मालवणमधून, मालवणमधली एक भिडू लिहिते…
हया बगा आमचा घर
आमचा घर कौलारू आसा, हया खळा, ह्यो ओटो
ही बाबांची बैठक, ही रांधपाची खोली
ही निजाची खोली, मदी ह्यो चौक आसा
चौकात हौद आसा, हौद खूप मोठो आसा.
पलीकडे वाडो आसा, हे आमच्ये बैल.
ह्यो हैबती, ह्यो दौलती हैबती, दौलती जॉत वढतत
कधी गाडी वडतत, कधी मोट पन ओढतत.
हया समोर मोठा मैदान आसा, चला, मैदानात जावया
विटीदांडू खेळाया. लंगडी खेळाया. हसाया, खेळाया, मजा करुया.
आता जाऊयात सांगलीत, तिथल्या भिडूच्या भाषेतला धडा असाय…
ही बघा आमचं घर
आमचं घर कौलारू हाय, ही अंगणाय आणि ह्यो वटा
हीतं पप्पा बसत्यात, ही किचन
ही बेडरूम, मधी हा स्पेस हाय
इथच हौदाय, हौद मोठ्ठाय
पलीकड गोठाय, ही आमची बैलं.
ह्यो हैबती त्यो दौलती. हेबती दोलती औत वढत्यात
कवाकवा गाडीपण वढत्यात. कवाकवा मोट वढत्यात
ही समोर मैदानाय. चला मैदानात.
इटीदांडू खेळूया. लंगडी खेळूया. हसु खेळू मज्जा करू.
तिकडून आपली गाडी येती कोल्हापुरात. तिकडच्या भिडूला विचारलं, तर ती म्हणाली, ‘सांगतो’
हे बगा आमचं घर
आमचं घर खपऱ्यांच हाय, हे आंगण आन ह्यो वटा
हित आबा बसत्यात, हे सैपाकघर
ही आमची निजायची खोली, ह्यो मधला चौक
चौकात हौद हाय आणी तो लय मोठ्ठाय
त्याज्या पल्याड गोठाय, ही आमची बैलं
हैबती अन दौलती, हैबती, दौलती औतं वढत्यात.
कधी गाडी वढत्यात. तर कधी मोट पण धरत्यात.
हे समोर मैदान दिसतय का. चला, मैदानाकडं जाऊ.
इटीदांडू खिळू. लंगडी खिळू. हसू, खिळू, मौज मारू.
जवळ हाय म्हणून सातारच्या भिडूला फोन लावला, त्याला म्हनलं घर दाखव
ह्ये आमचं घर
आमचं घर कौलाचंय, ह्ये आंगणंय ह्यो वटा..
ही बापाची बैठक, हे स्वयपाक घर
हितं झोपायची खुलीय. मधीच ह्यो चौकंय
चौकात हौदंय, हौद लै मोठ्ठाय
पलीकडं गोठा हाय
ह्योव आमचा बैल, ह्यो हैबत आण् त्योव दौलत
हैबत आण् दौलत दोघंबी औताव असत्यात,
कधीमधी वढत्यात, कधीमधी औतबी वढत्यात
म्होरं मैदानंय, चला मैदानाव जावु,
ईट्टी दांडु खेळु लंगडी खेळु मस्त हसुया खेळुया आण् मजा मारु
पुढचा मेसेज टाकला, अहमदनगरच्या भिडूला (त्यानं लय वेळ लावला, पण पाठवलं)
ह्ये पाहा आमचं घर
आमचं घर कौलारूए, ह्ये आंगन, ह्यो वट्टा
ह्यी भौंची बैठक, ह्ये सैपाक घर
ह्यी निजायची खोली, मधी ह्यो चौकय
चवकात हौदय, हौद मायंदाळय.
पल्याडला सप्परय, ह्ये आमच्छे बैलं,
ह्यो हैबती, ह्यो दौलती,हैबती दौलती औत वढतात.
कधीमधी गाडी वढत्यात,कधी मोट बी वढत्यात.
हे म्होरं पटांगणय. चला पटांगणात जाऊ.
इट्टीदांडू खेळू, लंगडी खेळू, हासू, खेळू, मजा करू.
आता आहे मराठवाडा, तिथलं कार्यकर्त म्हणलं… ‘आमच्याकडं वाडाय.’ वाडा तर वाडा पण म्हणलं लिही
हा पहा आमचा वाडा.
आमचा वाडा दगडाचाय आणि वर माळवद, ही वरहंडा, ही ओटा
ह्या ढेलजा, ही सैपाकाची खोली
ही झोपायची खोली, मधी ही मोकळी जागा
हितं तुळशीचं वृंदावन आन हौद आताय.
पलीकडे जनवाराचा कोठा, ही आमची बैलं.
हा हैबती आणि हा दौलती
ही दोनी बैलं नांगर वढत्यात, गाडी वढत्यात.
ही समोर पटांगण हाय. चला पटांगणात जाऊ.
ईटी दांडू खेळू, लंगडी पाणी खेळू, हसू, खेळू, मज्जा करू.
अहिराणी भाषेत बोलणारं आमचं भिडू जितकं गोडाय, तितकीच त्याची भाषा..
हाई देखा आमन घर
आमन घर कौलारू शे, हाय आंगण, हाऊ वटा
हाई बाबास्नी बैठक, हाई रांधाणी खोली
हाई झपानी खोली, मधमा चौक शे
चौकमा हौध शे, हौध भला मोठा शे
बाजुले गोठा शे, हौऊ आमना बैल.
हाऊ हैबती. हाऊ दौलती,
हैबती, दौलती औत व्हढतंस.
कवय मवय गाडी व्हढतंस, कवय मवय मोटार भी वढी लेतस
हाऊ म्होरं भलं मोठ मैदान शे, चला मैदानमा जाऊ
विटीदांडू खिऊत, लंगडी खिऊत, हसू खेळू मजा करू
विदर्भातल्या गड्यानं पण लगोलग धडा पाठवला…
हे पाय आमचं घर
आमचं कवलाचं घर, हे आहे आंगण, हा ओटा
हे बाबांचं बसाचं ठिकाण, हे स्वयंपाकघर
ही झोपाची खोली, मधात आहे चौक
चौकात आहे हौद, हौद भला मोठा आहे.
पल्याड गोठा आहे, हे आमचे दोन बैलं आहे.
एकाचं नाव हैबती आण दुसऱ्याचं नाव दौलती
हैबती आणि दौलती नांगर ओढतात, कधी बैलगाडी ओढतात
हे समोर मोठं परांगण आहे, चला परांगणावर जाऊ.
गिल्ली दांडू खेळू, लंगडी खेळू, हसू, खेळू, मजा, मस्ती करू.
विदर्भातल्या विदर्भातला फरक बघा…
हे बघा आमचं घर, आमच घर कवलारूचं है
हे आमचवालं आंगण व्हय
हा ओठा व्हय
ही बाबाची बैठक रूम व्हय
सयपाक घर व्हय हे
मध्ये तुमाले चौक दिसतं आहे
चौकात हौद आहे
भल्ला मोठा संगीन है हौद
पलिकडं आमच्या गुरामशीचा गोठा आहे
हे आमचे बैल होत
हा वाला हैबती व्हय
आणि तो दौवलती व्हय
हैबती दौलती आऊत ओढत्यात
कधी कधी गाडी बी ओढतात
कधी मोटारीले
जरा समोरकं गेलं की मोठं मैदान है..
चला आपण तिथं जाऊ जरासक विटीदांडू खेलू..
मस्त मज्जा करू..
आता काही काही ठिकाणच्या भिडूंशी आमचं बोलणं झालं नाय. मग म्हणलं तुम्ही पण आमचेच भिडू आहात… जिथली भाषा लिहायची राहिलीये, ती झटकन कमेंट्समध्ये लिहा आणि तुमच्या भाषेतला धडापण लोकांपर्यंत पोहोचू द्या.
हे ही वाच भिडू:
- इस्त्रायलमध्ये मराठी भाषा बोलणारे हजारों लोक आहेत.
- तेव्हापासून महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य झाला…
- मराठीमध्ये दिवाळी अंक काढायची आयडिया त्यांना लंडनमध्ये सुचली….