प्लेअर म्हणून असेल किंवा कोच म्हणून, मार्क बाऊचरच्या करिअरचा अंत नेहमी दुर्दैवीच ठरलाय…

रिकी पॉन्टिंगची ऑस्ट्रेलियन टीम आठवते ? आपण राक्षससेना म्हणायचो त्यांना. स्वतः पॉन्टिंग, मॅकग्रा, हेडन, गिलख्रिस्ट, ब्रेट ली, ,सायमंड्स, वॉर्न, लँगर जितकी नावं घ्याल तितकी कमी. या टीमचा दरारा असा होता, की यांच्याविरुद्ध मॅच आहे असं समजल्यावर आपण मॅच हरली हे डोक्यात धरूनच मॅच बघायला बसायचो.

या ऑस्ट्रेलियन टीमनं दहशत निर्माण केली होती, ज्याच्या जवळपास आजवर कुणीच पोहोचलेलं नाही. पण एक टीम होती, ज्यांची दहशत नसली, तरी टेन्शन मात्र असायचंच.

ही टीम म्हणजे ग्रॅम स्मिथची साऊथ आफ्रिकन टीम.

यांची दहशत बसायचं कारण नव्हतं, कारण यांच्याकडचे प्लेअर्स खडूस नव्हते. हे जिंकल्यावर ‘रडून जिंकले रे’ असं कधीच वाटायचं नाही. उलट मॅच बघायला मजा यायची. कॅप्टन स्मिथ, मिस्टर ३६० एबीडी, नांगर स्पेशालिस्ट हाशिम आमला, हर्शेल गिब्स, पोलॉक-स्टेन-फिलँडर-मॉर्केल-एन्टिनी असला तोफखाना, इम्रान ताहीरची फिरकी अशी तगडी टीम आफ्रिकेकडे होती.

डेंजर बॅटिंग ऑर्डरला तितक्याच डेंजर बॉलिंग लाईनअपशी जोडणारा एक दुवा होता, तो म्हणजे मार्क बाऊचर.

बाऊचर आफ्रिकेचा विकेटकिपर. जेव्हा धोनी आणि संगकारा आपल्या करिअरच्या पीकला होते, तेव्हा बाऊचरचा अस्त झाला. पण त्याच्या किपींगनं आणि बॅटिंगनं कित्येकांना किपींग बघणं आवडू लागलं होतं. जशी बॅटिंग तंत्रशुद्ध असते तशी किपींगही. बॉल हातात घेतल्यानंतरचा हातांचा स्विंग, कुठल्या बॉलरला कुठं थांबायचं याची ठरलेली जागा, हेल्मेट अशा सगळ्या गोष्टी. पण बाऊचर काहीसा ‘अनऑर्थोडॉक्स’ होता. बेसबॉल खेळणारे प्लेअर्स घालतात तसलं हेल्मेट घालून बाऊचर किपींगला थांबायचा. एका बाजूनं इम्रान ताहीर कसेही बॉल वळवायचा आणि दुसऱ्या बाजूला स्टेन आग ओकायचा. साहजिकच बाऊचरचे हात शेकून निघायचे.

त्यात साऊथ आफ्रिकन पिच म्हणजे ओबडधबड विषय. बॉल कधी उसळेल, कधी खाली राहील हे स्वतः क्युरेटरलाही सांगता यायचं नाही, अशा पिचवर बाऊचरनं किपींग केली. बॅटिंगचा तर विषयच नव्हता, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडायची. पण बाऊचरला डिफेन्स करताना पाहण्यापेक्षा हाणामारी करताना पाहणं कधीही जास्त स्पेशल होतं.

ग्रॅम स्मिथनं जी टीम उभी केली होती, ती आफ्रिकेची सगळ्यात बाप टीम होती. २०१२ मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवत या टीमनं कळस गाठलाच होता. त्यानंतर एक एक करत प्लेअर्स रिटायर होत गेले आणि आफ्रिकन टीम कमकुवत झाली. त्यांच्या टीममधल्या रिकाम्या जागा भरल्या गेल्या नाहीत, चोकर्सचा शिक्का आणखी गडद होत गेला.

जुने प्लेअर्स जाऊन नवे प्लेअर्स सेटल होईपर्यंतचा काळ कुठल्याही टीमला कठीण जातो आणि या कठीण काळात पुन्हा जुने प्लेअर्सच कामाला येतात.

२०१९ मध्ये जेव्हा मार्क बाऊचर साऊथ आफ्रिकन टीमचा कोच झाला, तेव्हा अनेकांना वाटलं होतं अफ्रिकेचे दिवस पुन्हा बदलतील. काही प्रमाणात ते झालं सुद्धा, आफ्रिकेनं भारताला हरवलं, इतर टीम्सलाही चांगली झुंज दिली. एक एक टप्पा पार होत होता, नवे प्लेअर्स सेटल होत होते आणि अचानक मार्क बाऊचरनं आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

यामागचं कारण काय ?

तर अगदी नजीकचं कारण म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये झालेला पराभव. पहिली मॅच किरकोळीत जिंकल्यानंतर आफ्रिकेनं पुढच्या दोन्ही टेस्ट लई वाईट हरल्या. त्याआधीचं कारण म्हणजे बाऊचर आणि आफ्रिकन क्रिकेट बोर्डात झालेले वाद. बाऊचरवर वर्णभेदाचे आणि फेव्हरिट्झमचेही आरोपही झाले. मात्र तो यातून निर्दोष सुटला.

पण महत्त्वाचं आहे ते बाऊचरनं सांगितलेलं कारण…

बाऊचर म्हणला, “माझं टेस्ट क्रिकेटवर मनापासून प्रेम आहे. साऊथ आफ्रिकन टीमनं टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठावी असं मला मनापासून वाटतं. पण आफ्रिकन टीमला पुरेशा टेस्ट मॅचेस खेळायला मिळत नाहीत. टी२० क्रिकेटमुळं टेस्ट क्रिकेट बदलतंय, अधिक आक्रमक होतंय. पण मला भीती आहे की, टी२० च्या लोकप्रियतेपुढं टेस्ट क्रिकेटचं महत्त्व अबाधित राहील का ?”

तो असं बोलण्यामागचं कारण म्हणजे, पुढच्या ५ वर्षांमध्ये साऊथ आफ्रिका फक्त २८ टेस्ट मॅचेस खेळणार आहे. याच कालावधीत इंग्लंड टेस्ट मॅचेस खेळणार आहे.. ४८.

 ही सगळी कारणं एकत्र आली आणि भारतात होणाऱ्या २०२३ च्या वनडे वर्ल्डकपनंतर संपणारं बाऊचरचं कॉन्ट्रॅक्ट वर्षभर आधीच संपलं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपनंतर बाऊचर आफ्रिकन टीमसोबत नसेल.

२०१२ च्या बाप टीमचे दोन दुवे सध्या आफ्रिकन टीमशी जोडले गेलेत, ग्रॅमी स्मिथ ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे, तर बाऊचर कोच. आता फक्त त्या टीममधला एकच दुवा राहिला…

बाऊचरला एक संधी होती, कधीकाळी आपल्याच चुकलेल्या गणितामुळं हुकलेलं आफ्रिकेचं वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न कोच म्हणून पूर्ण करायचं

बाऊचरच्या वर्ल्डकपमध्ये चुकलेल्या गणितामुळं आफ्रिका पुन्हा एकदा रांझनामधली कुंदन ठरली…

पण त्याआधीच त्यानं राजीनामा दिला. 

एखाद्या मेन टप्प्याआधीच बाऊचरला एक्झिट घ्यायला लागणं हे काही पहिल्यांदा घडत नाहीये…

२०१२ मध्ये साऊथ आफ्रिकेच्या इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजनंतर आपण रिटायर होणार अशी घोषणा बाऊचरनं केली होती. या सिरीजची लास्ट मॅच लॉर्ड्सवर होती. बाऊचर ‘लॉर्ड्स’वर रिटायर होणार होता, स्टेज सेट होतं. त्याआधी आफ्रिकेच्या काही टूर मॅचेस होत्या, सॉमरसेट विरुद्धच्या मॅचमध्ये बाऊचर किपींग करत होता. इम्रान ताहीर बॉलिंगला होता, ताहीरचा बॉल उसळला आणि बॅट्समन बोल्ड झाला.

त्याच्या बॉलमुळं उडालेली बेल बाऊचरच्या डोळ्यात थेट बुबुळाला लागली. बाऊचरला मैदान सोडावं लागलं आणि बातमी आली की, बाऊचरला कदाचित डोळाच गमवावा लागेल. त्याचा डोळा वाचला, पण क्रिकेट करिअरला फुलस्टॉप लागला.

बाऊचर ती इंग्लंड विरुद्धची सिरीज खेळूच शकला नाही. त्याच सिरीजनंतर लॉर्ड्सवर ग्रॅमी स्मिथनं टॉपच्या टेस्ट टीमला मिळणारी गदा उंचावली.. मात्र त्याच्या टीमला इथवर पोहोचवणारा बाऊचर मात्र तेव्हा त्याच्यासोबत नव्हता.

फेअरवेल मॅच खेळायला न मिळण्यापेक्षा मोठं दुःख कसलं होतं माहिती, तेव्हा बाऊचरच्या नावावर वनडे, टेस्ट आणि टी२० इंटरनॅशनल्स अशा तिन्ही फॉरमॅट्समधले कॅचेस आणि स्टम्पिंग मिळून ९९९ विकेट्स होत्या. हजारच्या माईलस्टोनपासून तो फक्त एक कॅच किंवा एक स्टम्पिंग मागं होता. पण दुर्दैवानं बाऊचरला ती संधी मिळालीच नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.