बॉलिवूडपासून अंडरवर्ल्डच्या लाडक्या रामपुरी चाकूची धार चायनामुळं गेली…

मध्यंतरी थिएटरला एक पिक्चर लागलेला, त्याचं नाव नाय सांगत पण ट्रेलरमधल्या हॉट सीन्समुळं त्याची लय चर्चा झाली. आमच्या चौकातली पोरं फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन आली. आल्यावर हिरॉईनची इन्स्टाग्राम अकाऊंट विचारतील असं वाटत होतं, पण आमच्या एका गड्याला वेगळाच प्रश्न पडला होता. तो म्हणला, ‘त्या पिक्चरमध्ये तो बटनवाला चाकू दाखवलाय, तो आता कोण वापरत असेल का?’ झालं सगळ्या मंडळाचं डोकं त्या चाकूमध्ये गेलं.

त्या बटनवाल्या चाकूचं मेनस्ट्रीम नाव म्हणजे रामपुरी चाकू. पँटच्या खिशात आरामात बसणारा, एका बटनावर खसकन ओपन होणारा, खुंखार धार आणि भाईगिरीच्या कित्येक सिन्सची आठवण शून्य मिनिटात करून देणारा हा रामपुरी चाकू. पिक्चरमध्ये बघून बघून पोरांना याचं इतकं येड होतं की, काऊंटर स्ट्राईक खेळताना समोरच्याला चाकूनी मारलं की एक वेगळाच फील यायचा.

हे रामपुरी चाकूचं येड लागण्यामागचं मेन कारण होतं बॉलिवूड आणि पुस्तकातल्या रहस्यकथा. मुन्नाभाईचं काळीज असणारा सर्किट जेव्हा त्या प्रोफेसरला ठसवण्यासाठी चाकू बाहेर काढतो, तेव्हा सगळं थिएटर शिट्टी वाचवतं. पुस्तकात जेव्हा कर्तबगार पोलिस गुन्हेगाराचा पाठलाग करत असतो आणि तो गुन्हेगार आपल्या खिशात लपवलेला रामपुरी चाकू काढून त्याच्यावर वार करतो… हे वाचून आपल्या अंगावर पण काटा उभा राहतो. अंडरवर्ल्ड जेव्हा पूर्ण फॉर्ममध्ये होतं, तेव्हा याच रामपुरी चाकूमुळं काय काय घडलं असेल, याचा विचार करणंही कठीण आहे.

सगळ्या भारतात सुपरहिट असणाऱ्या रामपुरी चाकूचा जन्म कुठं झाला?

भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर असलेल्या रामपूरमध्ये या चाकूचा जन्म झाला. साहजिकच या नावावरुन रामपुरी हे नाव कायम झालं. लाकडाची नक्षीदार मूठ, लोखंडाची अणकुचीदार आणि नागमोडी सुरी आणि ती झाकायला तितकंच भारी कव्हर… हा या चाकूचा ओरिजनल अवतार. पुढं त्यात बदल होत गेले… पण एका बटनावर उघडणं हि खासियत कायम राहिली.

रामपूरमध्ये अनेकांचा मुख्य व्यवसाय हे रामपुरी चाकू बनवणं हाच होता. पण उत्तर प्रदेश सरकारनं १९९० मध्ये साडेचार इंचांपेक्षा चाकू जवळ बाळगणं आणि विकणं हा गुन्हा ठरवला. साहजिकच या व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला. त्यातच मार्केटमध्ये आणखी नवी हत्यारं आली. दुर्दैवानं गुन्हेगारीचं आधुनिकीकरण झालं. तरीही लोकं शौक म्हणून किंवा शोपिस म्हणून रामपुरी बाळगत होते, त्यामुळं कामगारांनी तुटपूंज्या फायद्यावर का होईना पण व्यवसाय सुरू ठेवले होते.

पण पुढं नोटाबंदी आली आणि या व्यवसायाचा सपशेल बाजार उठला. त्यांचा धंदा ठप्प झाला, पण तरीही घरगुती वापराची कुलुपं, भाजी कापायला लागणाऱ्या सुऱ्या बनवत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. पण त्यांना सगळ्यात मोठा धक्का दिला, तो चायनीज मालानं.

स्वस्तात मिळणाऱ्या चायनीज मालाला जास्त पसंती मिळू लागली. प्लॅस्टिक आणि स्टीलपासून बनवलेले हे चाकू लोकांमध्ये हिट झाले. त्याच्यात जास्त दम नव्हता, पण हे चाकू असेही शोपिस म्हणूनच उरले होते. आकर्षक डिजाईन्सवाले चायनीज चाकू सगळं मार्केट आता आपलंय म्हणू लागले.

मशीनवर ३५-४० चाकू दिवसाला बनत होते आणि हातानी कारागिरी करुन दिवसात फक्त काहीच चाकू बनवणारे कारागीर मागे पडले. बॉलिवूडमध्येही रामपुरी चाकूची जागा बंदुकांनी घेतली…

एक मात्र आहे, कुठलेही गरमागरम सीन्स पाहिले तरी एका अक्ख्या पिढीला… अजूनही येड रामपुरी चाकूचंच आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.