तेव्हा ‘अपयशा’चा शिक्का बसला, म्हणून आज मीराबाई चानू वेटलिफ्टिंगवर राज्य करतीये…

आपल्या भारतात अजूनही अनेक जण असे आहेत, जे पेपर वाचायची सुरुवात मागच्या पानापासून करतात. कारण सोपं असतं की, त्यापानावर क्रीडा विश्वातल्या बातम्या असतात. पण कधीकधी अशा काही घटना घडतात, ज्यामुळं मागच्या पानावरचं क्रीडाविश्व पहिल्या पानावर येतं.

बऱ्याचदा पुढच्या पानावर येणारी बातमी ही क्रिकेटचीच असायची, पण आजचा पेपर बघितला तर पहिल्या पानावर आपल्याला तिघा वेटलिफ्टर खेळाडूंचे फोटो दिसतात. एक आहे महाराष्ट्राचा संकेत सरगर, दुसरा गुरुराजा पुजारी आणि तिसरी मीराबाई चानू. अर्थात सगळ्यात मोठा फोटो मीराबाईचा आहे. त्याला कारणही तसंच आहे, मीराबाईनं यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४९ किलो वजनी गटात गोल्ड मेडलला गवसणी घातलीये.

याच वजनी गटात तिनं टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सिल्व्हर जिंकलं होतं, यावेळी त्याचं गोल्ड मेडलमध्ये रुपांतर झालं.

यावेळचा मीराबाईचा विजय साधा अजिबात नाहीये, तिनं स्नॅच प्रकारात ८८ किलो वजन उचलत कॉमनवेल्थ रेकॉर्ड केला. क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात १०९ किलो वजन उचलत तिनं आपलं गोल्ड जवळपास फिक्स केलं होतं, पण दुसऱ्या प्रयत्नात ४ किलोनं वजन वाढवत तिनं ११३ किलो वजन उचललं. एकूण २०१ किलो वजन उचलत तिनं गोल्ड मेडलला गवसणी घातली.

खरंतर टोकियो ऑलिंपिक्समध्ये तिनं मिळवलेल्या सिल्व्हरनंतरच तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या होत्या. मीराबाई आपल्याला फिक्स मेडल मिळवून देणार याची खात्री वर्तवण्यात येत होती. ही सगळी परिस्थिती टोकियो ऑलिम्पिकमुळं बदलली, खरं त्याआधीचं चित्र असं नव्हतं.

त्यामागचं कारण होतं, २०१६ चं रिओ ऑलिम्पिक

२०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाईनं सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. तिच्या कामगिरीचा चढता आलेख पाहता रिओमध्ये तिच्याकडून पदकाच्या भरपूर आशा होत्या. मात्र रिओतली स्पर्धा पार पडली आणि मीराबाईच्या नावापुढं लिहिण्यात आलं ‘डिड नॉट फिनिश.’

मीराबाईला ऑलिम्पिकमध्ये एकाही प्रयत्नात योग्य प्रकारे वजन उचलता आलं नाही, तिचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेजवर, दर ४ वर्षांनी मिळणाऱ्या संधीमध्ये तिच्या वाट्याला निराशा आली.

आपल्या कुणाच्याही आयुष्यात असा कुठला प्रसंग आला की, आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे… सगळं सोडून द्यावं.

मीराबाईच्या डोक्यातही हीच गोष्ट आली होती, मात्र तिनं हार मानली नाही, कचही खाल्ली नाही. डिप्रेशनवर थेरपी घेतली आणि पुन्हा एकदा मेडल जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करायचं ठरवलं. स्वतःला डिप्रेशनमधून बाहेर काढलं, सख्ख्या बहिणीचं लग्न बाजूला ठेवलं आणि पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली.

या झपाटून प्रॅक्टिस करण्याचा रिझल्ट २०१७ मध्येच आला, मीराबाईनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. रिओतल्या अपयशाचं तिनं उट्टं काढलं होतं. 

पण मीराबाई तिथंच थांबली नाही, २०१८ कॉमनवेल्थ गेम्स- मीराबाईनं गोल्ड जिंकलं. २०२१ टोकियो ऑलिम्पिक्स- मीराबाईनं सिल्व्हर जिंकलं. २०२१ एशियन वेट लिफ्टिंग – मीराबाईनं क्लीन अँड जर्कमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलं आणि आता २०२२ कॉमनवेल्थ गेम्स – मीराबाईनं गोल्ड जिंकलं.

या ४ मेडल्स आणि एका वर्ल्ड रेकॉर्डनं मीराबाई चानूलाच नाही, तर वेटलिफ्टिंगलाही पेपरच्या मागच्या पानावरुन पहिल्या पानावर आणलं.

दरवेळी मीराबाईनं मेडल जिंकल्यावर हा एक फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतो…

WhatsApp Image 2022 07 31 at 2.12.41 PM

तशी या फोटोमागं विशिष्ट स्टोरी नसली, तरी मीराबाईचा साधेपणा मात्र खरा आहे. तिच्या लहानपणी तिच्या आईनं एकदा आपल्याकडे बैलगाडी असती तर अशी आशा बोलून दाखवली होती. मीराबाईनं ते स्वप्न उराशी बाळगलं होतं, कॉमनवेल्थला मेडल आणल्यानंतर तिला मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी १५ लाखाचं बक्षीस दिलं, सरकारनं पद्मश्री दिला,

या पैशातनं तिनं बैलगाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

आजही वर्ल्ड चॅम्पियन, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ मेडल्स नावावर असताना, मीराबाई चानूला सगळ्यात जास्त ओढ कशाची असते, तर घरच्या जेवणाची. आपल्यासारखंच मीराबाईही डिप्रेशनमध्ये जाते, आपल्यासारखंच तीही जमिनीवर बसून जेवते; आपल्यापेक्षा वेगळी फक्त तिची जिंकण्याची जिद्द आहे.

१९९३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू होती, तेव्हा एका बातमीनं भारतीयांना सुखद हादरा दिला होता. ती बातमी होती, कर्णम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉंझ मेडल जिंकल्याची. पुढच्याच वर्षी मल्लेश्वरीनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मारलं, एशियन गेम्समध्ये सिल्व्हर आणि १९९५, १९९६ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये परत गोल्ड. सलग ४ वर्ष भारताच्या वेटलिफ्टरनं खेळावर राज्य केलं होतं. २००० साली जेव्हा महिला वेटलिफ्टिंगचा समावेश पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला, तेव्हा ६९ किलो वजनी गटात खेळूनही मल्लेश्वरीनं ब्रॉंझ मेडलवर नाव कोरलं.

त्यावेळेस इतकी जबरदस्त कामगिरी करुनही मल्लेश्वरीला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही, सुदैवानं मीराबाईला ती प्रसिद्धी मिळाली पण सोबतच अपेक्षांचं ओझंही वाढलं. खरंतर वेटलिफ्टिंग हा काही क्रिकेट किंवा फुटबॉल प्रमाणं खिळवून ठेवणारा खेळ नाही, पण तरीही मीराबाईमुळं कित्येक जण वेटलिफ्टिंग बघू लागले. मल्लेश्वरीनं पास केलेला बॅटन तिनं आणखी मोठ्या उंचीवर नेला.

आजच्या घडीला कॉमनवेल्थ गेम्समध्येच भारत-पाकिस्तान मुलींचा क्रिकेट सामना आहे, जी क्रिकेट मॅच कित्येकांसाठी युद्ध-बिद्ध असते, त्या मॅचपेक्षा जास्त चर्चा मीराबाईच्या आणि इतर वेटलिफ्टरच्या कॉमनवेल्थमधल्या यशाची आहे. 

विराट कोहली रोहित शर्मा झिम्बाब्वे टूरला खेळणार नाहीत याची चर्चा नाही, भारत-पाकिस्तान मॅचचा स्कोअर ट्रेंडिंगला नाही… कारण मीराबाई चानूनं पुन्हा एकदा भारताला जाणीव करुन दिलीये, की क्रिकेटच्या पलीकडंही जग असतंय.

ही जाणीव करुन द्यायला, तिला २०१७ पासून एकूण ५ वर्ष लागली, पण त्याआधी रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरल्यानंतरचं, तिचं मेहनतीचं आणि हार न मानण्याचं वर्ष जास्त महत्त्वाचं होतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.