ऐनवेळी किशोर कुमार आला नाही, पण मेहमूदनं त्याचा विश्वास सार्थ ठरवला…

विनोदी अभिनेता महमूद साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमामध्ये नायकांच्या बरोबरीने  मानधन घेत असे. मेहमूद जर सिनेमात असेल तर पिक्चर हिट होणारच हा यशाचा फॉर्म्युला त्यावेळेला ठरला होता. मेहमूदच्या चित्रपटातील अस्तित्वाची भीती मोठे मोठे कलाकार देखील घेत होते. कारण एकटा मेहमूद सिनेमा खाऊन टाकत असे. 

चित्रपटात जर मेहमूद असेल तर नायकाकडे फारसे कोणाचे लक्ष नसे! त्यामुळे मेहमूदचं सिनेमांमध्ये गाणं हमखास असायचं. त्याचे सीन्स वाढवलेले असायचे. चित्रपटातील कथानकात त्याच्या भूमिकेला मोठं महत्व असायचं. कारण त्यापूर्वी कॉमेडी आणि कॉमेडीयन सिनेमांमध्ये फक्त पॅचवर्कचे काम करायचे. पण मेहमूदने कॉमेडीला मोठ्या उंचावर नेऊन ठेवले आणि हिंदी सिनेमांमध्ये कॉमेडी आणि कॉमेडीयन यांचा मान वाढवला.

सत्तरच्या दशकामध्ये ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाला प्रचंड मोठी यश मिळाले. त्यानंतर मेहमूद ने ‘दो फूल’ हा चित्रपट तयार करायचे ठरवले. वस्तुतः हा सिनेमा १९६७ साली तमिळमध्ये आलेल्या ‘अनुबावी राजा अनुबावी’ चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक होता. 

या तमिळ चित्रपटांमध्ये एक गाणं होतं ‘मुथ कुल्लीका वारीर गल्ला’ हे गाणं त्या काळात तामिळमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मेहमूद देखील या गाण्याचा प्रेमात पडला होता. ज्यावेळी या सिनेमाचा रिमेक हिंदीत  करायचे ठरवले त्या वेळेला हे गाणं सिनेमात घ्यायचं ठरवलं. गाण्याची प्रचंड लोकप्रियता पाहून ते तमिळ शब्द  हिंदीमध्ये तसेच ठेवून त्यांनी मजरूह सुलतानपुरी यांना पुढील गाणं लिहायला सांगितले. 

या गाण्याची चाल मूळ तमिळ गाण्याचीच  ठेवायची असल्यामुळे मजरूह यांनी त्यावर शब्द लिहिले. या सिनेमांमध्ये विनोद मेहरा, अशोक कुमार ,अरुणा इराणी,अंजना मुमताज  यांच्या भूमिका होत्या.

गाणं लिहून झालं. आता गाण्याचे  रेकॉर्डिंग किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात करायचे होते. संगीतकार होते आर डी बर्मन. त्याच्या काही रिहर्सल देखील झाल्या. फायनल रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. त्या दिवशी आशा भोसले रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये पोहोचल्या. सर्व वादक तसेच संगीतकार राहुल देव बर्मन किशोर कुमारची वाट पाहत होते.

सर्व जण वाट पाहून कंटाळले. परंतु त्याचवेळी स्टुडिओमध्ये किशोर कुमारचा फोन मेहमूदसाठी आला. मेहमूदने फोन उचलला.

त्यावेळी समोरून किशोर कुमारने सांगितले, “यार मेहमूद, मी एका कामात अडकलो असल्यामुळे आज रेकॉर्डिंगला काही येऊ शकत नाही. त्यामुळे हे गाणं तुझ्या आवाजात तू रेकॉर्ड कर. नाहीतरी हे तमिळ मधील गाणं तुला प्रचंड आवडलेलं होतं त्यामुळे तुला गाणं गायला अजिबात अडचण येणार नाही.”

त्यावर मेहमूद म्हणाला, “हे कसे शक्य आहे? कारण गायला माझ्यासोबत आशा भोसले आहेत. त्यांच्या  सोबत मी कसं काय गाणं गाऊ शकतो?” त्यावर किशोर कुमारनं तोडगा सांगितला, “अरे तू फक्त आज गाणं गा. कारण तुम्हाला हे गाणं उद्या शूट करायचे आहे. नंतर मी सवडीने येऊन माझ्या आवाजात हे गाणे डब करून जाईल. त्यामुळे तुला फक्त आजच्या पुरतं हे गाणे गायचं आहे!”

साक्षात आशा भोसले सोबत गाणं गायचं म्हणून मेहमूदला अक्षरशः घाम फुटला. पण पंचमने आणि आशा भोसलेंनी त्याला समजून सांगितलं, “तू काळजी करू नकोस. तू तुझ्या पद्धतीने गा. नाही तरी हे गाणं पुन्हा आपल्याला किशोर कुमारच्या आवाजात डब करायचे आहेच.”

अशा पद्धतीने मेहमूद आणि आशा भोसले यांच्या स्वरात ‘मुथ कोडी काव्वाडी हाडा’ हे गाणं रेकॉर्ड झालं. लगेच पुढच्या आठवड्यात त्याचं शूटिंग देखील झालं. हे गाणं सिनेमात मेहमूद आणि अंजना मुमताज वर चित्रित झाले. शूटिंगच्या दरम्यान सगळेजण हेच गाणं म्हणत होते. हळूहळू हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी बसलं.

किशोर कुमारने ज्यावेळेला हे गाणे ऐकलं; त्यावेळेला त्याने मेहमूद ला फोन केला, “अरे यार इतकं फर्स्ट क्लास तू गाणं गायलं असताना मी कशाला ते गाणं परत डब करू? हे गाणं तुझ्याच आवाजात भन्नाट आहे. तेव्हा तसचं राहू दे.” तरी मेहमूदला शंका वाटत होती. आपल्या भसाड्या आवाजात हे गाणे पब्लिक कसं स्वीकारतील? त्याने राजेश खन्नाला देखील विचारले. आणखी कुणा कुणाला विचारले.

सर्वांनी सांगितले, “मेहमूद तुझ्या आवाजातील गाणे सुपरहिट होणार!” आणि झालं तसंच. 

हे गाणं त्या वर्षीचे  सुपरहिट गाणं ठरलं. चित्रपट आज जरी विस्मृतीत गेला असला तरी हे गाणं आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.

जाता जाता: 

१९६७ साली ‘अनुबावी राजा अनुबावी’ लोकप्रिय झाल्यानंतर हा सिनेमा तेलगू मध्ये डब करण्यात आला. नंतर त्याचा रिमेक कन्नड मध्ये देखील झाला आणि गंमत म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये याचा रिमेक मराठीमध्ये झाला. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या सिनेमात काम केलं होतं. चित्रपट होता चंगू मंगू!

चंगू मंगू चित्रपटात या गाण्याच्या सिच्युएशनला  ‘अय्यो रामा…’ हे मराठी गाणे होते. चित्रपटातले हे गाणे अशोक सराफ आणि अरुणा इराणी हिच्यावर चित्रीत होते. या गाण्याचे चित्रीकरण हुबेहूब ‘मुथ कोडी…’  टाईप केले होते. अशोक सराफचा पेहराव कम्प्लीट मेहमूद सारखा होता.

नव्वदच्या दशकामध्ये डेव्हिड धवनच्या ‘आंखे’ या चित्रपटाला देखील बऱ्यापैकी याच सिनेमाचा आधार होता.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.