प्रत्येक गोष्टीत असतोय, तसा धोनीचा अदृश्य हात हार्दिक पंड्या भारताचा कॅप्टन होण्यातही आहे

सध्या नुसतं भारतीय क्रिकेटपुरतं पाहिलं, तरी रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल्स, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी२० सिरीज सुरू आहेत. त्यात भारताची सिनिअर टीम इंग्लंड दौऱ्यावर गेलीये. बरं इतकंच नाही, तर आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी२० सिरीजसाठीही भारतीय संघाची घोषणा झालीये.

अपेक्षेप्रमाणं सूर्यकुमार यादवनं कमबॅक केलंय, संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळालीये, पुणेकर राहुल त्रिपाठीला भारतीय संघातून बोलावणं आलंय; मात्र सगळ्यात लक्षवेधी घटना घडलीये ती म्हणजे..

हार्दिक पंड्या भारतीय संघाचा कॅप्टन झालाय.

खरंतर जेव्हा पंड्यानं गुजरात टायटन्सचं यशस्वी नेतृत्व करत पहिल्याच सिझनला त्यांना आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं, तेव्हाच भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचा विचार होणार का अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

आता दोन टी२० मॅचेससाठी का होईना, पण हार्दिक टीम इंडियाचं नेतृत्व सांभाळेल.

नव्या जमान्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये काहीही घडलं, तरी त्याचं क्रेडिट धोनीला दिलं जातंच. २००७ च्या टी२० वर्ल्डकपपासून सुरू झालेली ही परंपरा चाहत्यांनी आजही कायम ठेवलीये. रोहित शर्माला ओपनर म्हणून बढती देण्याचं, विराट कोहलीला योग्यवेळी कॅप्टन बनवण्याचं, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल सारखी स्पिनर्सची जोडी खेळवण्याचं आणि २००७ पासून भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडवण्याचं श्रेय अर्थात धोनीचंच आहे.

धोनी आणि क्रेडिट या दोन्ही विषयांची एकत्रित आठवण आली, ती हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीमुळं.

एकतर हार्दिक पंड्याला सुरुवातीपासून खेळताना बघणाऱ्यांपैकी फार कमी लोकांना हार्दिक पुढं जाऊन भारतीय संघाचा कॅप्टन होईल असं वाटलं असेल. कारण हार्दिक काहीसा आक्रमक आहे, त्याला शानमध्ये रहायला आवडायचं आणि त्यामुळंच त्याच्या मैदानातल्या कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरची कामगिरीच कायम चर्चेत असायची.

कॉफी विथ करणच्या राड्यापासून आतापर्यंतच्या प्रवासात एका क्रिकेटरनं मात्र हार्दिकला कायम साथ दिली, तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी.

हार्दिकची पहिलीच इंटरनॅशनल मॅच होती, बॉलिंगचा चान्स मिळाला तेव्हा त्यानं ओव्हरमध्ये २४-२५ रन खाल्ले. लोकांचं सोडा त्याला स्वत:लाही वाटलं होतं की, ही त्याची पहिली आणि शेवटची इंटरनॅशनल ओव्हर असणार. कॅप्टन धोनीनं मात्र तेव्हा हार्दिकवर विश्वास दाखवला आणि बाकीच्या ओव्हरमध्ये त्याची जादू चालली.

ही पाठींब्याची गोष्ट इथंच थांबली नाही. हार्दिक अत्यंत गरीबीतून पुढं आलेला क्रिकेटर. त्यात आयपीएलनं त्याला लवकर श्रीमंत केलं, तिथला परफॉर्मन्स बघून भारतासाठी सिलेक्शन व्हायलाही वेळ लागला नाही. साहजिकच पैसा येत गेला आणि काही प्रमाणात डोक्यात हवा गेलीच. कॉफी विथ करण प्रकरणातून तर ते सगळ्या जगानं पाहिलं.

जेव्हा बीसीसीआयनं हार्दिकवर निलंबनाची कारवाई केली, तेव्हा धोनीनं त्याची साथ सोडली नाही. त्या बॅड पॅचमधून धोनीनं त्याला बाहेर काढलं.

२०१९ मध्ये हार्दिकची अचानक न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली, नेमकं तेव्हा त्याच्यासाठी रुम आरक्षित नव्हती. धोनीनं त्याला आपल्या रुममध्ये बोलावलं. गोष्ट तशी साधीशी होती, पण याच साध्या गोष्टीतून धोनी टीम घडवतो हे पुन्हा एकदा लक्षात आलं.

बघायला गेलं तर हार्दिक पंड्याचा स्वभाव हा एका टोकाचा आणि धोनीचा एका टोकाचा. पण धोनीनं हा पूल बांधून घेतला. त्यानं हार्दिकला आणखी उथळ होऊ दिलं नाही.

जेव्हा हार्दिक गुजरात टायटन्सचा कॅप्टन झाला, तेव्हा साहजिकच त्याच्यावर मोठं प्रेशर होतं. त्याआधी त्यानं सिनियर लेव्हलला टीमचं नेतृत्व केलं नव्हतं. मात्र हार्दिकला मैदानात पाहताना तसं जाणवलं नाही. स्वत: मोठी जबाबदारी घेणं, टॅलेंट असलेले प्लेअर्स अपयशी ठरले तरी त्यांना पाठिंबा देत राहणं या गोष्टी हार्दिक करत राहिला.

आयपीएल सुरू होण्याआधी एका मुलाखतीत त्यानं धोनी, विराट आणि रोहितकडून काय शिकायला मिळालं याचा उल्लेख केला होता. आयपीएलच्या फायनल आधी सुनील गावसकर हार्दिकच्या नेतृत्वाबाबत बोलताना म्हणाले, “हार्दिकच्या कॅप्टन्सीकडे बघून समजतं, की तो महेंद्रसिंह धोनीकडून बरंच काही शिकलाय. त्याच्या फिल्ड प्लेसमेन्टपासून बॉलिंग चेंजेसपर्यंत सगळ्यात धोनीची छाप आहे. मैदानावर असताना कोणत्याच भावना दाखवायच्या नाहीत आणि ड्रेसिंग रुममध्ये प्लेअर्सशी चर्चा करायची हा धोनीचा गुण त्यानं अचूक घेतलाय.”

धोनीचं स्टारडम मोठं असलं, तरी तो मैदानावर किंवा बाहेरही कायम शांत असतो. त्याचा आणि हार्दिकचा बॅटिंग रोल काहीसा सारखा आहे, तो हार्दिकनं अगदी बरोबर पिक केला. पण कॅप्टन कूल धोनीइतकं शांत कॅप्टन होणं अवघड होतं. हार्दिकनं ते काही प्रमाणात का होईना पण जमवलंच. धोनी फारसा गाजावाजा न करता प्लेअर्स घडवतो, हे हार्दिकच्या रुपानं पुन्हा एकदा दिसून आलंय.

गावसकरसारखा मोठा प्लेअर हार्दिकच्या या प्रगतीचं क्रेडिट धोनीला देतो. ‘आज में करके आया’ चा किस्सा असेल, मैदानात आपल्याच प्लेअर्सवर केलेली चिडचिड असेल किंवा लक्झरी लाईफमुळं आलेल्या अडचणी असतील; हार्दिक कायम दरीच्या टोकावरुन चालला, पण त्याचा तोल सावरण्याचं काम धोनीच्या अदृश्य हातानं केलं,

हे कुणीच नाकारू शकत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.