रशियाकडून पेट्रोल डिझेल घेऊन भारत किती पैसे वाचवतोय ?

रशिया -युक्रेन युद्धाला जवळपास एक वर्ष पूर्ण झालंय. या युद्धाची झळ हे केवळ दोन्ही देशांपुरतीच मर्यादित न राहता जगभर पसरली आहे. अनेक मोठ्या अर्थव्यवस्था या युद्धामुळे आलेल्या मंदीमुळे कचाट्यात सापडल्या आहेत. युरोपातल्या देशांनी रशियावर निर्बंध घातल्यानंतर त्यांचा फटका केवळ रशियालाच बसलेला नाहीये. तर या निर्बंध घालणाऱ्या देशांमध्ये पण महागाईचा भडका उडाला आहे. कारण स्वस्तात मिळणारे रशियन खनिज तेल आणि नॅचरल गॅस या देशांना आता विकत घेता येत नाहीये.

मात्र या निर्बंधांचा काही देशांना फायदा देखील होत आहे.

रशियाच्या तेल व्यापारावर पाश्चिमात्य निर्बंधांचा भारताला मोठा फायदा झाला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत सरकारने रशियन तेलाची आयात वाढवून अंदाजे $3.6 अब्ज वाचवले आहेत.

जर रुपयांमध्ये बघायचं झाल्यास हा आकडा ३० हजार कोटींच्या पलीकडे जातो.

मे २०२२ पर्यंत रशियाकडून जे खनिज तेल निर्यात केलं जात होतं त्याची किंमत आधीच इंटरनॅशनल रेट्सपेक्षा १६ डॉलरने कमी होती. मात्र त्यानंतरही भारताने रशियाशी करार करून प्रत्येक बॅरेलमागे ३० डॉलरची कपात देखील मागून घेतली. त्यामुळे $६० डॉलरच्या खाली रशियाकडून तेल विकत घ्यायचे नाही हा पाश्चिमात्य देशांचा निर्बंध देखील भारताने पाळला नाही आणि रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेणं चालूच ठेवलं. 

साहजिकच भारताला मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे.

भारताच्या या तेल आयातीचा रशियालाही फायदा होत आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिका आणि युरोप युनियननं निर्बंध लादल्यानंतर रशियाने आशियातील बाजारावर आपला मोर्चा वळवला. तोपर्यंत युरोप ही रशियाची सर्वात मोठी बाजारपेठ होती. आता चीन आणि भारत हे रशियन तेलाचे दोन प्रमुख आयातदार झाले आहे.

भारत देश आपल्या 85% पेट्रोलियम गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. या आयातीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी सारख्या खाजगी कंपन्यांचा निम्म्याहून अधिक वाटा आहे.

या कंपन्यांच्या मार्फत जून २०२२ मध्ये भारताच्या एकूण ऑइल इंपोर्टमधला रशियाचा वाटा २ टक्क्यांवरून जून २०२२ पर्यंतच १८% झाला होता.

ज्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात स्वस्त इंधन मिळत गेलं. त्याचबरोबर रशियन तेलाच्या किमतीशी स्पर्धा करण्यासाठी इतर तेलउत्पादक देशही तेलाच्या किमती कमी करत होते.

भारताचा एक प्रमुख पुरवठादार असलेल्या इराकने देखील अशाच तेलाच्या किमती कमी केल्या ज्याचा फायदा भारताला होत आहे. यामुळे तेलाच्या किंमतीवर जंगल वेठीस धरणाऱ्या ओपेक देशांकडून होणारी आयात मात्र भारताकडून कमी झाली आहे. ओपेक देशांकडून होणारी निर्यात ४८% वर आली आहे कि भारताची आता पर्यंतची सर्वात कमी निर्णयात असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र भारताच्या रशियाकडून खनिज तेल घेण्यात वाढ करण्यावरून पाश्चिमात्य देशांकडून टीका देखील होत आहे. ज्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वेळोवेळी बाजू देखील मांडली आहे.

रशिया एक भारताचा जुना आणि भरवशाचा मित्र आहे. दोन्ही देशांचे अनेक दशकांपासूनचे जुने संबंध आहेत हे कारण सांगत भारताने रशियाशी असलेला व्यापार कायम ठेवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही भारताकडून रशियाशी असलेला तेलाचा व्यापार कायम ठेवला जाऊ शकतोय.

मात्र त्याचवेळी भारताने या युद्धाचे कोणत्याही प्रकारचे समर्थन केलेलं नाहीये. याउलट भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं यासाठीच प्रयत्न केले आहेत.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.