भावी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या रेसमध्ये योगी आदित्यनाथ सगळ्यात लास्ट आहेत…

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी चालू आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याला साजेशी अशीच निवडणुकीची तयारी चालू आहे. आता वरकरणी जरी समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात फाइट असली तरी आमचाच मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचं म्हणणं आहे. आता यातही प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांनीच घेतलाय. दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज भरताना प्रॉपर्टी जाहीर केलीय. त्यामुळं एकदा बघूच कोणी किती माला माल आहे ते.

योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे दीड कोटी किंवा एक्झॅट सांगायचं झाल्यास १,५४,९४,०५४ रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केलेआहे. 

यामध्ये हातात रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हे देखील घोषित केले की त्यांच्याकडे १२,००० रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन,१,००,०००रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८०,०००रुपये किमतीची रायफल आहे.

प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांच्याकडे ४९,००० रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि त्याचबरोबर २०,००० रुपये किमतीची सोन्याची चेन आणि १० ग्रॅम वजनाचे रुद्राक्ष गळ्यातील दागिने आहेत.

२०१७ च्या शपथपत्रात सीएम योगी यांनी आपल्या विरोधात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. यावेळी मात्र प्रतिज्ञापत्रात एकही केस नसल्याचे योगींनी म्हटले आहे.

गोरक्षपीठाचे महंत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणतीही कृषी किंवा अकृषिक मालमत्ता नाही. तसेच त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाहीये.

आता जाणून घेऊ अखिलेश यादव यांच्याकडे किती संपत्ती आहे.

सपा प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या नामांकनात अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव आणि मुलांसह त्यांच्या जंगम आणि जंगम संपत्तीचा तपशील दिला आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अखिलेश यादव यांच्याकडे केवळ १.७९ लाख रुपये आणि पत्नी डिंपल यादव यांच्याकडे ३.३२ लाख रुपये रोख आहेत.

अखिलेशच्या नावावर सात आणि डिंपल यादवच्या नावावर ११ बँक खाती आहेत. त्यांनी शेती, पगार, भाडे हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत सांगितले आहेत. पत्नी डिंपल यादव यांच्या उत्पन्नाचा स्रोत माजी खासदार निवृत्ती वेतन, भाडे आणि शेती असा आहे.

बसपा प्रमुख मायावतींनी किमान संपत्तीच्या बाबतीत तरी सगळ्यांना मात दिली आहे. मायावती यांनी २०१२ ला राज्यसभेसाठी नामांकन करताना त्यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशीलही दिला होता.

मायनेता या वेबसाइटनुसार, मायावतींनी त्यांच्याकडे शंभर कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे सांगितले होते. 

२०१२ मध्ये मायावतींचे प्रतिज्ञापत्र पाहिले तर त्यांच्याकडे १ अब्ज ११ कोटी ६२ लाख २४ हजार ८४० रुपयांची एकूण संपत्ती होती. यामध्ये त्यांच्याकडे १० लाख २० हजार रुपये रोख होते.मायावतींच्या बँक खात्यात १३ कोटी ९५ लाख १४ हजार ४५० रुपये होते. बसपा सुप्रिमोंकडे 1 कोटी 5 लाख 85 हजार रुपयांचे दागिने होते. मायावती यांच्या नावावर रिव्हॉल्व्हर होते, ज्याची किंमत ५,३९० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या सर्व गोष्टींसोबतच मायावती यांच्याकडे १५ कोटी २६ लाख २४ हजार ८४०रुपयांची जंगम मालमत्ताही होती.

आता राहतात प्रियांका गांधी. त्यांनी कधी निवडणूक लढवली नसल्यानं त्यांच्या संपत्तीचा निश्चित आकडा मिळवणं थोडं अवघड आहे.

FinApp या आर्थिक वेबसाइटनुसार त्यांची एकूण संपत्ती ४५० कोटी इतकी आहे आणि त्या दरवर्षी सुमारे ३३ कोटी कमवतात. आत ह्यात आता पती रॉबर्ट वाड्रा यांची शेकडो कोटींच्या मालमत्तेचा समावेश करण्यात आलेला नाहीये.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.