महाराणी एलिझाबेथ यांच्या पाठीमागे प्रिन्स चार्ल्सला किती संपत्ती मिळणार आहे ?

जेंव्हा केंव्हा राजघराण्याच्या संपत्तीचा विषय निघतो तेव्हा एक प्रश्न कायम पडतो की, इंग्लंडच्या महाराणीकडे किती संपत्ती असेल?  जगातील श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा इंग्लंडच्या महाराणीकडे असलेली संपत्ती ही जास्त असल्याची चर्चा केली जाते. खरंच तसं आहे ? 

काल ८ सप्टेंबर रोजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यामुळे राणीकडे किती संपत्ती होती आणि ती आता कुणाला मिळणार आहे? हे प्रश्न चर्चेत आहेत.

याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर, राणीच्या बहुचर्चित खाजगी संपत्तीचा आकडा आहे ४२७ मिलियन डॉलर इतका !!!  

संपत्तीबद्दल माहिती जाहीर करण्याचं बंधन महाराणीवर नसते. मात्र युकेच्या संडे टाइम्स रिचने २०२२ मध्ये ब्रिटनच्या २५० श्रीमंत लोकांच्या यादीत राणीचा समावेश केला होता. त्यातील आकडेवारीनुसार, महाराणीकडे जवळपास ३ हजार ४०० कोटी रुपयांची खाजगी संपत्ती होती.   आता राणीच्या पश्चात वारस असलेल्या प्रिन्स चार्ल्स हस्तांतरित होण्याची सुद्धा प्रक्रिया आहे.

राणीची संपत्ती शेकडो कोटींची असली तरी जगातील श्रीमंत लोकांची तुलना केल्यास हा आकडा फारसा मोठा नाही. असं का?

अगदी भारतातील राजे राजवाड्यांकडे सुद्धा २०-३० हजार कोटींची संपत्ती असते मात्र एवढ्या मोठ्या भागावर अजूनही राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या राणीकडे इतकी कमी संपत्ती असण्याचे काही कारण आहेत. ते म्हणजे ब्रिटनमध्ये भलेही राणी राष्ट्रप्रमुख असली तरी तिथे संसदीय व्यवस्था आहे. त्यामुळे देशातून जमा होणाऱ्या महसुलाचं नियंत्रण संसदेच्या हातात असतं.

देशात जमा होणाऱ्या एकूण महसुलापैकी ठराविक रक्कम राणीला दरवर्षी पगार स्वरूपात दिली जाते, यालाच सामान्यपणे सोव्हेरियन ग्रँट असे म्हणतात. या सोव्हेरियन ग्रँटची सुरुवात १७६० मध्ये सुरु झालीय आणि तेव्हापासून त्याच पद्धतीने ही व्यवस्था आजही सुरु आहे.

आता प्रश्न असा पडतो की एकेकाळी संपूर्ण देशाची मालकी असलेल्या ब्रिटनच्या राजांना  निव्वळ पगारदार का व्हावं लागलं? 

१७२१ साली ब्रिटन मध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही सुरु झाली आणि देशाचा कारभार संसदेच्या हातात गेला त्यामुळे राजपरिवाराचे अधिकार आणखीनच मर्यादित झाले. त्यातूनच १७६० मध्ये ग्रेट ब्रिटनचे राजे जॉर्ज तिसरे आणि पंतप्रधान विल्यम पिट यांच्या सत्ताकाळात एक करार करण्यात आला. 

त्या करारानुसार इंग्लंडच्या राजघराण्याची खाजगी मालमत्ता वगळता सगळी मालमत्ता आणि त्यातून मिळणारं उत्पन्न संसदेच्या हातात देण्यात आलं. तसंच राजाने याआधी घेतलेल्या सर्व कर्जांना परतफेड करण्याची जबादारी सुद्धा संसदेकडे गेली. राजाने संसदेकडे दिलेल्या संपत्तीच्या उत्पन्नाचा १५ टक्के भाग हा राजपरिवाराला सोव्हेरियन ग्रँट म्हणून देण्यात येतो. 

त्या कराराला २०१२ मध्ये बदलण्यात आलं आणि एक ठराविक रक्क्म राजघराण्याला देण्याची सुरुवात झाली. २०२१-२२ मध्ये ८६ मिलियन पाउंडची रक्कम राजपरिवाराला देण्यात आली. या पैशातूनच  राजपरिवाराचा खर्च आणि शाही संपत्तीची देखरेख केली जाते. 

सोव्हरेन ग्रँटसोबतच राणीची खाजगी संपत्ती सुद्धा आहे.

ही खाजगी संपत्ती राणीला परंपरागत मिळालेली आहे आणि तिच्या स्वतःच्या कमाईतून निर्माण झालेली आहे. यात मुख्यत्वे राणीने केलेल्या गुंतवणुकी, दागदागिने, संग्रह, सँडरिंगहॅम हाऊस आणि बालमोरल कॅसलचा समावेश आहे. इंग्लंडचा रिजेंट स्ट्रीट या व्यावसायिक भागाचाही समावेश आहे. यातून राणीला जो नफा मिळतो त्याला राणीची खाजगी संपत्ती म्हणतात. हीच संपत्ती जवळपास ३ हजार ४०० कोटींची आहे. 

यासोबतच २००२ मध्ये महाराणी एलिझाबेथला तिच्या आईच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने ७० मिलियन डॉलरची संपत्ती मिळाली होती. त्यात पेंटिंग्ज, स्टॅम्प कलेक्शन, दागिने, घोडे आणि मौल्यवान संग्रहातील वस्तू आहेत. वासशाने मिळालेल्या या संपत्तीवर राणीला कर भरावा लागला नव्हता. 

पण राणीच्या खाजगी संपत्तीसोबतच आणखी वेगळी संपत्ती आहे जी ट्रस्टकडे ठेवण्यात आलीय. 

इंग्लंडच्या राजपरिवाराची रॉयल संपत्ती जपून ठेवण्यासाठी एक रॉयल फर्म आहे ज्याला मोनार्की पीएलसी म्हणून ओळखलं जातं. २०२१ च्या आकडेवारीनुसार या रॉयल फर्मची संपूर्ण किंमत २८ अब्ज डॉलर आहे. त्यात १९.५ अब्ज डॉलरची क्राऊन इस्टेट, ४.९ अब्ज डॉलरचं लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटन आणि वेल्समध्ये तब्बल ४५ हजार ८४७ हजार एकर जमीन अशी स्थावर संपत्ती आहे.

तसेच या संपत्तीमधील फर्निचर, दागदागिने, महागड्या वस्तू, पेंटिंग्ज आणि वेगवेगळ्या देशांमधून आणण्यात आलेल्या बहुमूल्य वस्तूंचा संग्रह आहे. या संपत्तीला राणी विकू शकत नाही. ही संपत्ती एका ट्रस्टकडे असते आणि ट्रस्ट ही संपत्ती राजपरिवाराच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करत असते. २०२१-२२ मध्ये या संपत्तीमधून ३१२.७ मिलियन डॉलरचा नफा मिळाला होता. 

राणीला संपत्तीची माहिती देण्याचं बंधन नाही तसंच राणीकडे असलेल्या वस्तू या जुन्या असल्यामुळे त्यांची किंमत बहुमूल्य आहे. त्यामुळे राणीच्या संपूर्ण संपत्तीचा आकडा अधिकृत सांगितला जाऊ शकत नसला तरी आता राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूमुळे ब्रिटनचे नवीन राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर ही संपत्ती त्यांच्या अधिकृत मालकीची होईल.

त्यातील खाजगी संपत्तीचा ते आपल्या मर्जीनुसार वापर करू शकतात. तर क्राऊन इस्टेटचा वापर करून ती पुढच्या पिढीला हस्तांतरित करावी लागणार आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.