या ६ किस्स्यांमधुन कळतंय, मुघलांच्या काळात समलैंगिकतेला लय स्वातंत्र्य होतं…
मुघल काळातला एक किस्सा इतिहासात लई फेमस आहे, एकदा सैनिकांनी दोन तरुण मुलांना अटक केली. हे दोन्ही तरुण एकाच सोफ्यावर एकमेकांना अगदीच चिटकून झोपले होते. अटक का झाली माहितीये ? तुम्ही म्हणाल ‘मुगल काळ म्हणजे केवढा मागासलेला असणार आणि तिथं दोन तरुण असे झोपलेत म्हणून अटक झाली असणार,’
तर भिडू या दोघांना अटक झाली कारण यातला एक तरुण हा ब्राह्मण समाजाचा होता आणि दुसरा नावाजलेला मुघल वकील बैरम खानचा नातू. या दोघांना अटक होण्याचं कारण म्हणजे यांचे धर्म वेगळे होते, त्यांचं नातं नैसर्गिक की अनैर्सगिक हा विषयच नव्हता.
या किस्स्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की, मुगल काळात समलैंगिकतेला कुणी निषिद्ध मानत नव्हतं. दोन पुरुषांमधले, दोन स्त्रियांमधले आणि इतकंच नाही तर तृतीयपंथीयांसोबतच्या संबंधांनाही मोठ्या प्रमाणावर मोकळीक होती.
आता हे डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपल्याला मुघल काळातल्या राजांचे, राण्यांचे काही किस्से बघावे लागतील.
पहिला किस्सा मुघल बादशहा बाबरचा
बाबरनं या सगळ्या प्रकरणाबद्दल स्वतःच आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्याचं झालेलं असं की बाबरला एक पोरगा आवडायचा, पण राजकारभार, दरबार, डावपेच यात बाबर इतका गुंतला की त्याला त्या मुलाला सोडून द्यावं लागलं. त्या मुलाला सोडल्यामुळं बाबरला जे काही दुःख आणि त्रासाचा सामना करावा लागला ते सगळं त्यानं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. आता बाबरसारखा बलाढ्य सम्राट आपल्या समलैंगिकतेबद्दल इतक्या खुलेपणानं लिहीत असेल, तर यावरुनच आपल्याला त्या काळातल्या वातावरणाचा अंदाज येतो.
दुसरा किस्सा बघूयात सरमदचा
औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहच्या खास समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये एक माणूस होता, त्याचं नाव सरमद. धर्मानं ज्यू असलेला हा सरमद इराणच्या काशन शहरातून भारतात आला होता, तो दारा शुकोहकडे कामाला होता. या सरमदनं मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं काही लेखांमध्ये सांगण्यात येतं, तर काही लेखांमध्ये तो नास्तिक होता अशी माहिती मिळते.
सरमदचं नाव चर्चेत येण्यामागचं मुख्य कारण होतं, ते म्हणजे त्याचं थट्टा नावाच्या एका हिंदू मुलावर प्रचंड प्रेम जडलं होतं, त्याच्या प्रेमात तो अंगावरचे कपडे उतरवून ‘नंगा फकीर’ म्हणून फिरायला लागला होता. यामुळं त्याची सगळ्या राजधानीत चर्चा झाली होती.
पुढं या सरमदला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, त्याचं शीर धडावेगळं करण्याचे आदेश दिले. पण याचं कारण, त्याचं समलैंगिक असणं, एका मुलाच्या प्रेमात कपडे उतरवून फिरणं हे नव्हतं.
सरमद दारा शुकोहच्या मर्जीतला होता, जेव्हा औरंगजेब सत्तेत आला, तेव्हा त्यानं दाराच्या मर्जीतली माणसंही जिवंत ठेवली नाहीत. पण १६६० मध्ये सरमदला मारण्यासाठी, ‘तो अर्धाच कलमा वाचायचा आणि त्यानं देवाच्या अस्तित्वालाच नकार दिला होता,’ हे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. तेव्हाही समलैंगिक असणं हे अनैर्सगिक किंवा गुन्हा नव्हतं.
तिसरा किस्सा जहाँआरा बेगमचा
जहाँआरा बेगम म्हणजे बादशहा शाहजहानची मुलगी. जहाँआरावर आपल्या वडिलांसोबतच संबंध असल्याचे आरोप होते, त्यामुळं तिचं लग्नच झालं नाही. या सगळ्या परिस्थितीत जहाँआराचा आपल्या सेवेतल्या एका दासीवर जीव जडला. आता हे प्रेम किती होतं याचा दाखल देणाराही एक किस्सा आहे, जहाँआराच्या या आवडत्या दासीच्या कपड्यांना एकदा नाचता नाचता आग लागली, ही आग विझवण्यासाठी जहाँआरानं स्वतःला भाजेपर्यंत प्रयत्न केले.
थोडक्यात काय, तर दोन स्त्रियांमधली किंवा पुरुषांमधली जवळीक हा विषय तेव्हा वर्ज्य नक्कीच नव्हता.
चौथ्या किस्स्यात आपल्याला सापडतं, स्त्रियांनी एकमेकांजवळ येण्याचं कारण…
मुघल काळात स्त्रियांनी हरममध्येच राहायला हवं, हा अगदी कडक नियम होता. या हरममध्ये फक्त स्त्रिया आणि लहान मुलं यांनाच प्रवेश होता. हरमच्या रक्षणासाठीही स्त्री सुरक्षारक्षकांना तैनात केलं जायचं आणि सोबतच लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय करण्यात आलेल्या खोजांवर हरमची जबाबदारी दिलेली असायची. पुढं जाऊन तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे अनेक मुघल राजकन्यांची लग्नच झाली नाहीत. साहजिकच त्यांना शरीरसुखाचा आनंद घेता आला नाही. यामुळं हरममधल्या स्त्रियांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं.
इतिहासात अशीही एक नोंद सापडते की, या हरममध्ये दारु, भांग, अफू आणि जायफळ यांची नशा करायला बंदी होतीच पण सोबतच गाजर, मुळा किंवा दुधीभोपळा अशा भाज्या हरममध्ये नेणं निषिद्ध होतं.
पाचवा किस्सा ख्वाजासर म्हणजेच खोज्यांचा
या खोजांमध्ये दोन प्रकार असायचे. काहींना गुप्तांग कापून खोजे बनवलं जायचं, तर काही जण तृतीयपंथीय असायचे. लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय असल्यानं या खोजांवर राजघराण्यातल्या स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी असायची. हरममध्ये त्यांना मुक्त प्रवेश होता, तर स्त्रियांनाही खोजांसमोर पडदा न घेण्याची अनुमती होती.
यामुळेच खोजा आणि महिलांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित होत गेले. काही तत्कालीन पुराव्यांनुसार हे खोजे लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय असले, तरी त्यांच्यात आणि महिलांमध्ये शारीरिक संबंध होते.
मुघल काळावर विस्तृत लेखन करणाऱ्या मनुचीनं लिहिलंय, ‘काही राजकन्यांचे आपल्या आवडीचे असे खोजे होते. या राजकन्या त्या खोजांकडून अशा गोष्टींचा आनंद घेण्याची मागणी करायच्या, ज्या लिहितानाही मला लाज वाटते. हे खोजे महिलांची आपल्या हातानं आणि जिभेनं एकाचवेळी तपासणी करायचे.’
या सगळ्या गोष्टी मनुचीनं सामान्य लोकांच्या आणि खोजांच्या चर्चांमधून लिहिल्या आहेत.
काही श्रीमंत खोजे इतके खतरनाक होते की त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या स्त्रियांनाच आपल्याकडे कामाला ठेवलं होतं. खोजांसमोर पडद्याचं बंधन नसल्यानं हे संबंध सहज प्रस्थापित व्हायचे, त्यामुळेच कित्येक अमीर-उमराव आणि व्यापाऱ्यांनी आपल्याकडे खोजांना कामाला ठेवलं नव्हतं.
इतकंच नाही तर काही खोजांवर धार्मिक जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या, मात्र यात त्यांची लैंगिकता आड येत नव्हती. थोडक्यात तत्कालीन धर्मसंस्थांचाही समलैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होता, हे आपल्या लक्षात येतं.
सहावा किस्सा आहे तुर्की राजांचा
फक्त मुघलच नाही, तर तुर्की राजांमध्येही समलैंगिकता सामान्य असल्याची माहिती इतिहासातून मिळते. १५८८ ते १६२९ असा कार्यकाळ असणारा शाह अब्बास हा दास्यांचा नाही, तर हँडसम पुरुषांचा शौकीन होता. तर मेहमद नावाच्या तुर्क राजाला सुंदर दिसणारे तरुण पुरुष जास्त आवडायचे.
थोडक्यात काय तर आज अनेक देशांमध्ये कायदेशीर लढ्यानंतर समलैंगिकतेला मान्यता मिळाली असली, तरी मुघल काळात मात्र ही गोष्ट निषिद्ध नव्हतीच, पण सोबतच समलैंगिकतेला स्वातंत्र्यही होतं, हेच यातून लक्षात येतं.
हे ही वाच भिडू:
- समलैंगिकता ही पाश्चात्य संकल्पना आहे असे ज्यांना वाटते त्यांनी खजुराहो येथे जायलाच हवे
- समलैंगिकतेवरून दंगा करणाऱ्यांनो आपल्या संस्कृतीत याचा उल्लेख खूप जुनाय
- काहीही असलं तरी मुघलांना टाळून भारताचा इतिहास लिहला जावू शकत नाही..