2008 मध्ये एकही युनिकॉर्न स्टॉर्ट-अप नसलेल्या मुंबईनं आज बेंगलोरला गाठत आणलंय
मुंबईमध्ये येणारा माणूस कधी उपाशी मरत नाही ही आता आख्यायिका झाली आहे. या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मध्ये येऊ लाखो लोकांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. महाराष्ट्राची ही राजधानी अख्या देशाची आर्थिक राजधानी आहे. भारतात येणाऱ्या सगळ्या मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस मायानगरीत आहेत.
मात्र काळानुरूप होणाऱ्या बदल्यात आपलं स्वप्नांचं शहर मागं पडतं का अशी परिस्तिथी निर्माण झाली होती.
कारण होतं मुंबईत असलेला स्टार्ट-अपचा दुष्काळ.
मात्र आता मुंबईने ती देखील कसर भरून काढली आहे.
भारतात युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या १०० झाली आहे. केरळच्या पोरांनी चालू केलेल्या बेंगलोर निओबँक स्टार्ट-अप हे १००वं युनिकॉर्न ठरलं आहे. अपेक्षेप्रमाणे बंगलोर पुढं आहे मात्र त्याचवेळी मुंबईनं जी मजल मारली आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे.
मुंबईमध्ये आत्ताच्या घडीला 20 युनिकॉर्न स्टार्ट-अप आहेत.
आधी प्रकरण जास्त नं लांबवता युनिकॉर्न म्हणजे काय ते पाहिलं क्लेयर करू.
ज्या स्टार्ट-अपचं वॅल्युएशन 1 बिलिअन डॉलरपेक्षा जास्त होतं त्यांना युनिकॉर्न म्हणतात. आणि आता असेच स्टार्ट-अप्स मुंबईमध्ये वाढायला लागलेत. वाढायला लागलेत म्हणजे स्टार्ट-अप हब असणाऱ्या बंगलोरला पार मुंबईने गाठत आणलंय.
मुंबईमध्ये आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त स्टार्टअप रजिस्टर झालेत. मोठ्या बँकिंग आणि वित्तीय संस्थांची उपस्थिती आणि इतर शहरांशी समृद्ध कनेक्टिव्हिटी असूनही मुंबईला 2019 पर्यंत त्याच्या पहिल्या युनिकॉर्नसाठी प्रतीक्षा करावी लागली होती.
तेव्हा ड्रीम 11 चं वॅल्युएशन 1.5 बिलियन डॉलरचं झालं तेव्हा मुंबईला पहिला युनिकॉर्न स्टार्ट अप मिळाला
त्यानंतर हेल्थटेक स्टार्टअप CitiusTech हे 1.8 बिलियन डॉलरसह मुंबईतलं दुसरं युनिकॉर्न ठरलं.
त्यामुळं मुंबईमधला हा स्टार्टअपचा दुष्काळ कसा दूर झाला याचा एक आढावा घेऊ. विश्लेषकांच्या मते मुंबईतल्या स्टार्टअप्सना पेटीएम, ओला, ओयो सारखं 1 बिलियन डॉलरच्या फंडिंग राउंडला आकर्षित करण्यात यश येत नव्हतं त्यामुळं हे मायानगरीत युनिकॉर्न निर्माण होत नव्हते.
याचं कारण होतं ते म्हणजे सुरवातीला B2C बिझनेस टू कस्टमर स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणात फंडाची गरज होती आणि असे स्टार्टअप्स सुरवातीला बेंगलोर मध्येच मोठ्या प्रमाणात होते.
मुंबईमध्ये या उलट B2B स्टार्टअप्स आकार घेत होते.
मात्र गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. भारतातील 30 संभाव्य युनिकॉर्नपैकी जवळपास एक तृतीयांश युनिकॉर्नचे मुख्यालय आज मुंबईत आहे. हे ‘सुनीकॉर्न्स’ ज्यांचे मूल्य 500 दशलक्ष डॉलरते 750 दशलक्ष डॉलर दरम्यानचे असते.
त्यामध्ये Cartrade, FINO PayTech, Pepperfry, Nazara, BookMyShow या स्टार्टअप्सचा समावेश आहे. आता हे स्टार्टअप्स आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून किती निधी आकर्षित करतात यावर या सूनिकॉर्नचे यश अवलंबून असेल.
स्टार्टअप्सचं स्थलांतर
मुंबईच्या स्टार्टअप्स इकोसिस्टिमचा एका कायमचा प्रॉब्लेम असायचा तो म्हणजे स्टार्टअप्सचं स्थलांतर. यामुळं मुंबईत चालू होणारी स्टार्टअप्स थोडी मोठी झाल्यावरबेंगलोरला जात होती. यामध्ये ओला, इनमोबी, क्विकर, फ्रीचार्ज, इन्स्टामोजो, वर्कइंडिया या भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या अनेक पोस्टर बॉईजचा समावेश आहे.
टॅलेंटेड टेक्निकल लेबरची कमतरता, भाड्यासह राहणीमानाचा उच्च खर्च आणि जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या शहरांपैकी एक असलेल्या शहरात दैनंदिन प्रवासाच्या समस्या ही या स्टार्टअप्सच्या स्थलांतरांमागील प्रमुख कारणं होती.
“आम्हाला आमची टेक आणि प्रोडक्ट टीम दुप्पट करायची आहे. आम्हाला मुंबईत 18-24 महिने लागले असते, पण बंगळुरूमध्ये आम्हाला हे काम लवकर करता येइल”
2014 मध्ये, जेव्हा क्विकर मुंबईहून बेंगलोरला गेलं तेव्हा त्याचे संस्थापक-सीईओ प्रणय चुलेट यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
मात्र त्यांनतर राज्य सरकारने आणलेल्या धोरणांमुळे बाजी बऱ्यापैकी पालटली.
२०१८ मध्ये फिनटेक धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले होते. वर्षभरात, सरकारने २५०+ स्टार्टअप्सना अनुदान आणि बक्षीस रक्कम म्हणून ९ कोटी रुपये वितरित केले होते. शहरातील मोठ्या बँका, वित्तीय सेवा, विमा कंपन्या, ब्रोकरेज, हेज फंड आणि व्हीसी फर्मच्या उपस्थितीमुळे फिनटेकवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. आणि याचं फळ लवकरच मिळालं Tracxn च्या मते, मुंबई हे भारतातील सर्वात जास्त फिनटेक स्टार्टअप्स असलेलं शहर आहे.
राज्य सरकारने चालू केलेल्या इनोव्हेशन हबचाही स्टार्ट अप्स इकोसिस्टिम चा मोठा हातभार लागला.
राज्य सरकारने मुंबईमध्ये स्टार्टअप्सची स्थापन करण्यासाठी मुंबई इनोव्हेशन सेंटर (MIC) ची निर्मिती केली आहे. इथं स्टार्टअप्सच्या वाढीस चालना देण्यासाठी ज्या प्रमुख सुविधा लागतात त्या देण्यात येतात. या केंद्राअंतर्गत कमी किमतीत ऑफिससाठी जागा, त्याचबरोबर परवडणारी राहण्याची जागा, मार्गदर्शक कार्यक्रम अशा सुविधा पुरवण्यात आल्या. “स्टार्टअप क्लिनिक” डिजिटल पायाभूत सुविधा आणि साधने, प्रशासकीय सेवा,टेस्टिंग लॅब्स पुरवण्यात आल्या.
को-लिविंग सारख्या सुविधा ज्यामुळं स्टार्टअप्समध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी परवडणाऱ्या दारात राहण्याची सोया झाली त्यामुळं मुंबईत राहण्याचा खर्च कमी झाला. त्यामुळं इतक्या दिवस मुंबईमध्ये राहण्याचा खर्च जास्त आहे म्ह्णून मुंबईला नकार देणारा टॅलेंटेड वर्कफोर्स मुंबईकडे शिफ्ट होऊ लागला. तसेच स्वतःस्त ऑफिसेस मिळाल्याचा स्टार्टअप्स ना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
त्यामुळं मुंबईमध्ये तरी स्टार्टअप्स इकोसिस्टिम नं चांगलाच जोर धरलाय.
मात्र देशातल्या आघाडीचं IT हब असलेल्या पुण्याला मात्र अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे असंच दिसतंय.
सध्या पुण्यात फक्त 5 युनिकॉर्न आहेत. पुण्यामध्ये आयटी कंपन्यांची झालेली भरभराट, कुशल सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, मुंबईसारख्या शहराशी कनेक्टिव्हिटी आणि राहणीमानाचा तुलनेनं कमी खर्च या सर्व बाबी असतानादेखील पुण्यात स्टार्ट-अप इकोसिस्टिम का डेव्हलप झालं नाही याचा सांगोपांग विचार होणं गरजेचं आहे असं जाणकार सांगतात.
त्याचबरोबर मुंबईमध्ये राज्य सरकारने जसे प्रयत्न केले तसेच प्रयत्न पुणे आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरात होणं अपेक्षित असल्याचंही जाणकार सांगतात. त्यामुळं येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींवर लक्ष दिल्यास महाराष्ट्र युनिकॉर्नच्या संख्येत कर्नाटकलाही मागे टाकेल यात वाद नाही.
हे ही वाच भिडू :
- इलॉन मस्कच्या स्पेसएक्स प्रमाणे अंतराळ गाजवू शकणारे स्टार्टअप भारतात पण आहेत….
- स्टार्टअप इकोसिस्टिमचा ‘बॅड बॉय’ म्हणून आजही या स्टार्ट-अप फाउंडरचं नाव घेतलं जातं.
- या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय