हारतात मुंबई आणि चेन्नई, वांदा होतोय बीसीसीआयचा. कसा? तेच वाचा…

आयपीएल सुरू होऊन तसे आता लय दिवस झाले, पण सोशल मीडियावर चक्कर मारली… तर यंदाची आयपीएल अजूनही मोसम पकडत नाहीये असं लगेच जाणवतं. कारण फिलच येईना भिडू. इतर वेळी एकमेकांच्या झिंज्या उपटणारे, उसात नेऊन हाणामारी करणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स यावेळी थंड आहेत.

ना धोनीच्या वयाची मापं निघतायत, ना रोहितच्या फिटनेसची, कुणी एकमेकांना अंपायर्स कुणाचे यावरुनही चिडवत नाहीये आणि कुणी तुमची टीम दोन वर्ष कुठं गेलेली म्हणून इज्जतही काढत नाहीये.

हा असा थंडपणा नेमका आलाय तरी का?

 तर कारण लय सिम्पल आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीम्स प्रत्येकी चार-चार मॅचेस खेळल्या. पण जिंकली मात्र एकही नाही.

आता चेन्नईचा फॅन मुंबई हरली म्हणून नाचायला गेला, तर त्याचीच टीम ऑलरेडी खड्ड्यात आहे. मुंबई फॅनच्या बाबतीत पण अगदी हेच गणित. त्यामुळं सोशल मीडियावर एकाला ट्रोल करायला दुसऱ्याचा कीबोर्ड धजावत नाही आणि आपल्याला आयपीएल सुरू झाल्याचं फिलिंगच येत नाही.

तुम्ही म्हणाल, भिडू या दोघांमध्ये राडा नाय म्हणून सोशल मीडिया निवांत आहे. नायतर कसला कल्ला केला असता. पण कसंय, ट्रोलिंगनं चार-पाचशे लाईक्स येतात, त्या गेल्या तरी गम नाही. पण या दोघांमध्ये राडा नाही, या टीम जिंकत नाही याचा डायरेक्ट परिणाम आयपीएलच्या टीआरपीवर झालाय.

 टीआरपीचा परिणाम जाहिरातींच्या रेटवर होणार आणि साहजिकच संघमालकांच्या प्रॉफिटवरही.

बाकी मुकेशभाई असो किंवा श्रीनी मामा… सबसे बडा रुपय्या ही स्कीम कायम आहे. 

टीआरपीचं गणित कसं गंडलंय हे सांगतो…

तुम्ही बातमी वाचली असेल, की आयपीएलचा टीआरपी पडला. पडून नेमका किती झाला? तर यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या आठवड्याचे टीआरपी रेटिंग्स २.७५ टक्के आहेत. मागच्या सिझनशी तुलना केली, तर हे रेटिंग्स ३३ टक्क्यांनी गंडलेत. नुसता टीआरपीच नाही, तर व्ह्यूअर्सची संख्याही ४ कोटींनी कमी झालीये.

आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांतच असा प्रतिसाद मिळतोय म्हणल्यावर विषय सप्पय गंडलाय.

नेहमीच आयपीएलचा टीआरपी सातवे आसमाँवर असतोय का?

तर नाय. वर खाली होत असतंच. म्हणजे कसं समजा ज्या दोन टीम्सची मॅच आहे, त्यांच्यात बाप-बाप प्लेअर्स नसतील तर लोकं ही मॅच फाट्यावर मारतात. मग अशा मॅचला मुंबई आणि चेन्नईच्या मॅच तारुन न्यायच्या. मुंबई कुणाशीही खेळत असली, तरी मुंबईचे फॅन्स मॅच बघणारच आणि हरली तर मजा घ्यायला चेन्नईवालेही बघणार असं चित्र असायचं. त्यामुळं टीआरपीची नौका बुडायला लागली, तरी या दोन टीम्सचा आधार होताच.

जेव्हा या टीम्स एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होतं?

तर राडा होतो. भांडणं-मारामाऱ्या होतात आणि टीआरपीचा हेलिकॉप्टर शॉट बसतो. संदर्भासहित स्पष्टीकरण देतो- २०२१ ची आयपीएल दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात आली. दुसऱ्या टप्प्याला लोकांचा प्रतिसाद यायचा नाही, असा अनेकांचा अंदाज होता.

जेव्हा मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच झाली… तेव्हा ती आतापर्यंतच्या आयपीएलमधली सगळ्यात जास्त पाहण्यात आलेली ‘मिड सिझन’ मॅच ठरली.  तर २०२१ च्या आयपीएल मधली सगळ्यात जास्त पाहिलेली मॅच ठरली. BARC च्या रेटिंग्सनुसार सगळी गणितं जुळवून एकूण ११.२ बिलियन मिनिट्स ही मॅच पाहिली गेली. 

बरं एवढंच नाही, २०२० मध्ये आयपीएल युएईला झाली. कोविडच्या लाटा, समोर उभ्या असलेल्या अडचणी यामधून लोक आयपीएलला भाव देण्याची शक्यता तशी कमीच होती. पण आयपीएलवाले लय शहाणे आहेत, त्यांनी एक स्कीम टाकली. सिझनची पहिलीच मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी लावली.

लोकं अधाशासारखी टीव्हीसमोर बसली आणि पहिल्याच मॅचला BARC चे रेटिंग्स मिळाले १०.४. (आत्ताच्या रेटिंग पेक्षा पाचपट जास्त.)

इथून मग आयपीएलला बूस्टर मिळाला, लोकं रोज काहीतरी खळबळ होईल म्हणून टीव्ही-मोबाईल घेऊन बसू लागले. यंदा मात्र ना मुंबई जिंकतिये, ना चेन्नई. ना पोलार्डच्या बॅटचा तडाखा आहे, ना रवींद्र जडेजाच्या. धोनी अण्णा एक-दोन मॅचेस भारी खेळले असले, तरी ऋतुराजचा स्पार्क काय चमकेना. बुमराहला तर बॉलर हाणून जातायत आणि चहर आहे इंज्युर्ड. काय मोठं घडेना त्यामुळं लोकं आयपीएल बघेना.

याचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसत असेल, तर बीसीसीआयला.

कारण बीसीसीआय आता मीडिया राईट्स नव्यानं विकतंय. त्यांचं टार्गेट आहे, ४० हजार करोड. एवढ्या मोठ्या रकमेला राईट्स विकायचे असतील, तर टीआरपीचं गणित गंडून चालत नसतंय. कारण जसा टीआरपीचा आकडा घसरेल, तसाच मीडिया राईट्सच्या कराराचाही घसरू शकतोय.

बीसीसीआयचं गणित सोपं आहे, पैसा छापणं, लोकांना क्रिकेट दाखवणं आणि टॅलेंट पुढं आणणं. यात पहिला नंबर पैसा छापण्याचा लागत असल्यानं, टीआरपी वाढणं लय मस्ट आहे. 

टीआरपी वाढवायचा असला, तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनं कायतरी खळबळ करायलाच पाहिजे… नायतर नुसती ट्रोलिंगची मजाच नाही तर आयपीएलच्या बिझनेसचं गणितही गंडू शकतंय.

मुंबई आणि चेन्नई फॅन्सनं तोंड बारीक करु नका, तुमच्या टीममध्ये एवढी ताकद ए की त्यांनी दुनिया हलवली नाही, तरी पैशाच्या गणितांची शिट्टी फिक्स वाजवू शकतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.