झहीर खानला टीममध्ये घेतलं नाही आणि त्याने मुंबईचाच बाजार उठवला…
मुंबईचं वानखेडे स्टेडियम खचाखच भरलं होतं. फक्त आपल्यासारखे क्रिकेट चाहतेच नाही, तर लय मोठमोठे महारथी स्टेडियममध्ये होते. प्रेशर म्हणजे काय हे त्या दिवशी कळत होतं. दिवस होता २०११ च्या वर्ल्डकप फायनलचा. भारताच्या त्या टीममध्ये सचिन तेंडुलकरनंतर सगळ्यात जास्त कुणाच्या नावाचा गजर झाला असेल… तर झहीर खान.
झहीरचं नुसतं नाव घेतलं, तरी आपलं बालपण झर्रकन डोळ्यासमोरुन निघून जातं. हळूहळू पण तरीही डौलातला रनअप, केसांची ती खास हेअरस्टाईल आणि बॉल हातात लपवून टाकायची सवय, क्रिकेट आवडणाऱ्या जवळपास प्रत्येकानी झहीरची ती उडीवाली ऍक्शन एकदा तरी कॉपी केलीच असणार, इतकं येड आपल्याला झहीरचं होतं.
कपिल देव, जवागल श्रीनाथ यांच्यानंतर भारतातली फास्ट बॉलर्सची परंपरा संपणार की काय असं वाटत होतं. पण झहीर नावाचं वादळ आलं आणि आईची आन लई भारी वाटलं. भलेभले फलंदाज त्याच्यासमोर गांगरुन जायचे. ग्रॅम स्मिथ सारख्या टॉप क्लास प्लेअरचा झहीरनं बकरा केला होता. आपल्या भारतातही टप्प्यावर मारा करणारी, हातभर स्विंग करणारी पोरं तयार होऊ शकतात हे झहीरनं दाखवून दिलं.
झहीरला क्रिकेटचं फार जबरदस्त वेड. पण त्याला आधी वाटायचं की आपण इंजिनिअर व्हावं. त्याच्या वडिलांनी मात्र, एकदम उलटाच सल्ला दिला. ते म्हणाले बाबा इंजिनिअर नको, तू फास्ट बॉलर बन. लोकल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत, झहीरनं एमआरएफ पेस बॉलिंग अकादमीमध्ये धडक मारली.
त्याचाही एक किस्सा आहे, झहीर शिक्षण करत करत मॅचेस खेळत होता. एका इंटर-झोनल मॅचमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली. त्याचवेळी मैदानावर एमआरएफ फाऊंडेशनचे टी. ए. शेखर उपस्थित होते. झहीर त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, ‘मला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रवेश घ्यायचाय.’ त्याचवेळी शेखर भारतीय संघासाठी लेफ्ट आर्म पेस बॉलर शोधत होते. त्यांनी झहीरची बॉलिंगही पाहिली होती. नेमके मार्गदर्शक डेनिस लिली त्यावेळी फाऊंडेशनमध्ये नव्हते. त्यामुळं शेखर यांनी झहीरला सांगितलं की, ‘तू १८ जानेवारीला ये.’
पण आपले झहीर भाऊ इतके आतुर होते, की गडी १६ जानेवारीलाच एमआरएफ फाऊंडेशनमध्ये पोहोचला. याचं क्रिकेट प्रेम बघून तिकडची जनताही हॅंग झाली.
जेव्हा डेनिस लिलीनं झहीरला बॉलिंग करताना पाहिलं, तेव्हा तो शेखर यांना म्हणाला की, ‘हा एक दिवस भारतासाठी खेळणार बघ.’ झहीरची प्रगती जबरदस्त होतं. सगळ्यांना वाटत होतं की आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत झहीर मुंबईकडून खेळणार आणि धमाका करणार. पण झालं भलतंच. मुंबईनं झहीर खानला संघात घेतलंच नाही.
पण शेखर यांची फार इच्छा होती की, झहीरला रणजी खेळण्याची संधी मिळावी. त्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या जयवंत लेले यांना झहीरला आपली संघात स्थान देण्याबाबत विचारलं. लेलेंनी झहीरला ट्रायलला बोलावलं तेव्हा, बडोद्याच्या फलंदाजांना त्याचे बॉल जरा जास्तीच वेगवान वाटले. साहजिकच झहीरला बडोद्याच्या संघात स्थान मिळालं. त्यांची पहिली मॅच होती, गुजरात विरुद्ध. झहीरनं ३ विकेट्स आणि २२ रन्स करत आपली छाप पाडली.
बडोद्याची दुसरी मॅच होती, मुंबई विरुद्ध. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या जायंट मुंबईला भिडणं हे काही सोपं काम नव्हतं. त्यात झहीरला स्वतःला सिद्ध करण्याचं प्रेशरही सांभाळायचं होतं. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये अमित पागनीस, विनोद कांबळी, अमोल राणे, पारस म्हांबरे आणि संतोष सक्सेना असे पाच मुंबईकर भिडू तंबूत धाडले. बॅटिंग करताना बहुमोल २४ रन्स केले. झहीरच्या जलव्यामुळं मॅच ड्रॉ झाली आणि मुंबईला कुठं ना कुठं आपली चूक समजली. पुढं जाऊन झहीरनं भारताकडूनही दमदार पदार्पण केलं आणि नंतर तो मुंबईच्या संघाकडूनही खेळला.
एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये दोन दिवस आधीच जाणाऱ्या झहीरनं दाखवून दिलं होतं… की तो लंबी रेस का घोडाय!!
हे ही वाच भिडू:
- शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे झहीर खानचं करियर वाचलं होतं.
- झहिर खानची छोटीशी इनिंग सचिनच्या शतकावर भारी पडली !
- फास्टर बॉलर व्हायला निघालेल्या तेंडुलकरला त्याने सांगितलं, “तुमसे ना हो पायेगा”