मुंब्रा : भारतातली मुस्लिमांची सगळ्यात मोठी वस्ती बदनाम कशी झाली?
मुंबईच्या लोकलने ठाण्यावरून कल्याणाकडे जाताना एक स्टेशन लागायचं मुंब्रा. तुम्ही पक्के मुंबईकर असाल तर जास्त डिटेल मध्ये जाऊन सांगतो ते म्हणजे मध्य रेल्वेच्या स्लो लोकलनं जाताना हे स्टेशन लागतं, कारण फास्ट ट्रेनसाठी झालेल्या बोगद्यामुळे कळवा आणि मुंब्रा ही दोन स्टेशन स्किप होतात.
या स्टेशनवर मुस्लिम समाजाच्या लोकांची संख्या नेहमी जास्त दिसायची. बुरखा घातलेल्या महिला देखील या स्टेशनावरच जास्त दिसायच्या. घरच्यांना विचारलं तर इथं मुस्लिम समाजाचे लोक जास्त राहतात हेच उत्तर मिळायचं. मग पुन्हा का? विचारलं तर त्याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नसायचं.
आता राज ठाकरेंनी प्रत्येकवेळी दहशतवादी मुंब्य्रातच सापडतात या टीकेमुळे मुंब्रा पुन्हा चर्चेत आले आहे.
आज जवळपास मुंब्य्रात ८० ते ९०% जनता ही मुस्लिम असल्याचं सांगण्यात येतं आणि द हिंदूच्या रिपोर्टनुसार ही भारतातली सगळ्यात मोठी मुस्लिमांची वस्ती आहे. वस्तीपेक्षा घेट्टो हा शब्द बरोबर बसतो. घेट्टो म्हणजे शहराचा असा भाग जिथं एकाच जातीचे, धर्माचे अनेक लोक गरीब परिस्थितीत राहतात.
तर मुंब्य्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त मुस्लिम समाजाचीच लोकसंख्या असण्यामागं कारण आहे दंगलींचं.
१९९२ मध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर पूर्ण देशभरात दंगली उसळलेल्या होत्या. याच काळात मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या. अनेक ठिकाणी संख्येने कमी असलेल्या मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं होतं.
मात्र ही परिस्थिती अजूनच बिघडली जेव्हा १९९२ च्या दंगलींचा बदला म्हणून मुंबईच्या अंडरवर्ल्डमधल्या मुस्लिम डॉननी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. दाऊद, टायगर ब्रदर्स हे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी होते. यामुळे मात्र मुंबईची सामाजिक घडी उसवली गेली.
अनेक मुस्लिमांनी जिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी स्थलांतरित होण्यास सुरवात केली. आता साऊथ मुंबईमध्ये आधीच गर्दी झाली होती. त्याचबरोबर डोंगरी, हाजी अली या ठिकाणी घरं घेणं परवडणारं पण नव्हतं.
मग पर्याय आला ठाण्याच्या पुढं असलेल्या मुंब्य्राचा.
त्यावेळी तिथं कोकणातून आलेल्या मुस्लिम समाजाची ठीकठाक वस्ती होती. तसेच दलदलीचा भाग असलेला हा भाग अजून तितकासा डेव्हलप झाला नव्हता.
तसेच मुंब्य्रात त्यावेळी ग्रामपंचायत होती. त्यामुळं घर बांधण्यासाठी किंवा बिल्डिंग उभारण्यासाठी जास्त कायदेशीर अडथळे येत नव्हते. परवानग्याही कमी लागत होत्या किंवा मॅनेज करता येत होत्या. त्यामुळं मुंब्य्रात स्वस्तात घरं उपलब्ध झाली. आणि त्यामुळेच मुस्लिम समजातून मोठ्या प्रमाणात इथं स्थलांतर होऊ लागलं. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, बेहरामबाग, वाळकेश्वर या मुंबईच्या उपनगरातून हजारो लोक मुंब्य्राला स्थलांतरित झाले.
१९९२ च्या दंगलीनंतर मुंब्य्राची लोकसंख्या ४५,००० वरून सुमारे २० पटीने वाढून २०११ मध्ये (जनगणनेनुसार) ९,००,००० पेक्षा जास्त झाली. भारतातील शहरी क्षेत्राच्या सर्वात वेगवान विस्तारांपैकी हा एक विस्तार होता.
मात्र कोणत्याही प्रकारचं प्लँनिंग, सोयीसुविधा नसताना हा विस्तार झाला. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं.
मुंब्य्रातील ९०% बिल्डींग अनधिकृत असल्याचं सांगण्यात येतं.
तसेच आता ठाणे महानगरपालिकेचा भाग असला तरी अनधिकृत बांधकामामामुळे लाइट,पाणी यांसारख्या सोई सुविधांची वानवा या भागात आढळते.
मुंब्रा अनेकवेळा चर्चेत असतो त्याचं अजून एक कारण म्हणजे इथून अनेकवेळा पकडण्यात आलेले दहशतवादी.
दंगलींमुळे स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना कट्टरतेकडे वळवण्याचे प्रयत्न धर्मांध मुस्लिमांकडून केले गेले आणि सुरवातीला या प्रचाराला अनेक तरुण बळीदेखील पडल्याचं सांगण्यात येतं.
भारतात आजपर्यंत झालेल्या जवळपास सगळ्याच मोठ्या संघटनांचे दहशतवादी मुंब्य्रात सापडले आहेत. २००१ मध्ये जेव्हा सिमी संघटना दहशतवादी कारवायांत गुंतली होती तेव्हा सिमीच्या अनेक अतिरेक्यांना पण मुंब्य्रामधून अटक करण्यात आली होती.
त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा या संघटनांच्या दहशतवाद्यांचं मुंब्रा कनेक्शन पुढं आलेलं आहे. संसदेवरील हल्ल्यातील आरोपीही मुंब्य्रामध्ये सापडले होते. आजच्या सभेतही राज ठाकरे यांनी या दहशतवाद्यांची नावं आणि त्यांचं मुंब्रा कनेक्शन याची यादीच जाहीर केली होती.
२०१६ मध्ये तर ISIS च्या मुदब्बीर शेख याला मुंब्य्रातुन अटक करण्यात आली होती. तो इसिस चा भारतातला म्होरक्या असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.
तरी या सगळ्यात चर्चा झालेलं प्रकरण होतं इशरत जहाँचं
मुंब्य्रातली १९ वर्षीय इशरत १५ जून २००४ रोजी जावेद शेख, अमजदअली अकबरअली राणा आणि जीशान जोहर यांच्याबरोबर गुजरात पोलीसांच्या एन्काउंटरमध्ये मारली गेली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणारे ते दहशतवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण बनावट असल्याचाही आरोप झाला होता.
मात्र या सर्व दहशतवादी कारवायांत मुंब्य्राचं नाव बदनाम झालं ते झालंच. विशेषतः इशरत जहाँ प्रकरणामुळे मुंब्य्रातल्या लोकांनाही त्रास झाला. या केसनंतर पत्त्यावर मुंब्रा असेल तर तिथल्या पोरापोरींना शाळा, कॉलेजात तसेच नोकरीच्या ठिकाणी प्रवेश नाकरल्याची उदाहरणं समोर आली होती.
राजकीय आरोप प्रत्यारोपामुळेही मुंब्रा बदनाम होत गेलं. जसं की मुंब्य्राचे सध्याचे आमदार यांनी तिथं वस्तराही सापडणार नाही असं म्हटलं तर राज ठाकरे यांनी मुंब्य्राच्या दहशतवादी कनेक्शनची लिस्टच वाचून दाखवली.
त्यामुळं आता बदलत्या जगानुसार तरी मुंब्रा आपली ओळख पुसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- उर्दू फक्त मुस्लिमांचीच भाषा म्हणत असला तर तुम्ही चुकताय..
- हिंदू, मुस्लिम,शीख एकता म्हणत त्याने काश्मिरसाठी प्राण सोडले, अन् तो धर्माने मुस्लिम होता…
- बायकोचं अफेअर, गंडलेला फॉर्म, गेलेली जागा… दिनेश कार्तिकला कुणीच संपवू शकलं नाही