आज श्रीलंकेला हरवणाऱ्या नामिबियाचा संघर्ष पार २००३ पासून सुरु आहे…

२००३ चा वर्ल्डकप. भारतीय लोकं सहजासहजी विसरणार नाही अशी गोष्ट. गांगुलीच्या नेतृत्वात भारताच्या तरण्याताठ्या टीमनं थेट फायनलपर्यंत धडक मारली. सचिन तेंडुलकरनं हा वर्ल्डकप गाजवलाच पण सोबतच युवराज सिंग, झहीर खान ही पोरंही या वर्ल्डकपच्या निमित्तानं चमकली.

याच वर्ल्डकपमध्ये भारताची एक मॅच झाली ती नामिबियासोबत.

पहिली बॅटिंग करणाऱ्या भारतानं ३११ रन्स चोपले. सचिननं कडकडीत दीडशे रन्स मारले आणि गांगुलीनंही शंभर ठोकत कॅप्टन्स नॉक खेळला. भारताला प्रत्युत्तर देताना नामिबियाची मात्र घसरगुंडी उडाली, त्यांना फक्त १३० रन्सच करता आले. पुढं भारत फायनलमध्ये हरला आणि आपल्या लक्षात ती हारच राहिली.

कारण नामिबियाला लक्षात ठेवावं असं फार विशेष काही त्या मॅचमध्ये घडलं नाही.

आपला पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या नामिबियाला त्यावेळी एकही मॅच जिंकता आली नाही, पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी जवळपास विजय खेचून आणला होता, पण मॅच जिंकणं लांब राहिलं.

हे झालं २००३ मधलं, याला आता जवळपास ९ वर्ष उलटली. आजच टी२० वर्ल्डकपला सुरुवात झाली. वर्ल्डकपची पहिलीच मॅच होती नामिबिया विरुद्ध श्रीलंका. श्रीलंकेनं नुकताच भारताला, फॉर्मातल्या पाकिस्तानला सलग दोनदा हरवून एशिया कप जिंकला. त्यामुळं नुकतीच टी२० मध्ये महत्त्वाची स्पर्धा जिंकलेली लंकन टीम नामिबिया विरुद्ध फेव्हरिट्स होती.

त्यात जेव्हा पहिली बॅटिंग करणाऱ्या नामिबियाची अवस्था ९३ वर ६ विकेट अशी झाली, तेव्हा अनेकांचा अंदाज होता की श्रीलंका सहज मॅच मारणार. मात्र जॅन फ्रायलिंक आणि जेजे स्मिट यांनी खतरनाक पार्टनरशिप केली आणि टीमचा फायनल स्कोअर झाला ७ आऊट १६३.

अगदी शेवटच्या बॉलपर्यंत या दोघांनी लढत दिली आणि तिथंच एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, नामिबिया सहजासहजी हार मानणार नाही.

हाच उत्साह त्यांनी बॉलिंगमध्येही कायम ठेवला आणि फॉर्मात असलेल्या श्रीलंकेची अवस्था ४ आऊट ४० झाली. सुरुवातीलाच झालेल्या या पडझडीनंतर लंकेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. टप्प्याटप्यानं विकेट्स पडत गेल्या आणि नामिबियानं थोड्या नाही तर ५५ रन्सनं मॅच मारली.

टी२० वर्ल्डकपची सुरुवातच धक्कादायक झाली कारण रॅकिंगमध्ये १४ व्या नंबरवर असलेल्या टीमनं एशिया चॅम्पियन आणि रँकिंगमध्ये ८ नंबरवर असलेल्या श्रीलंकेला हरवलं.

टी२० क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकत असलं, तरी नामिबियाचा हा विजय महत्त्वाचा आहे…

याचं कारण म्हणजे त्यांचा संघर्ष

आपल्या भारतात मोठ्या राज्यांमध्ये किमान एक तरी इंटरनॅशनल दर्जाचं क्रिकेट स्टेडियम आहे. प्रॅक्टिस ग्राऊंड, क्लब ग्राऊंड यांची तर गिणतीच नाही. नुसत्या पुण्याचं उदाहरण घेतलं तरी, ग्राऊंडचा आकडा सहज १५-२० च्या पुढं जातो. पण सगळ्या नामिबियामध्ये मिळून ग्राऊंडची संख्या आहे ९.

म्हणजे जी काही प्रॅक्टिस, लोकल मॅचेस होतात त्या फक्त या ९ क्रिकेट ग्राऊंडवरच.

नामिबियाची लोकसंख्या आहे जवळपास २५ लाख. त्यात त्यांच्याकडे प्रामुख्यानं क्रिकेट खेळलं जातं ते राजधानी विंडहॉकमध्येच. इथलेच ५ क्लब नॅशनल चॅंपियनशिपसाठी झुंजतात आणि याच ५ क्लबमधले प्लेअर्स, पुढं इंटरनॅशनल टीममध्ये येतात.

थोडक्यात नामिबियाकडे मनुष्यबळ कमी आहेच पण संसाधनंही. त्यात २००३ नंतर नामिबियाला सातत्यानं प्रयत्न करुनही वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये धडक मारता आली नाही. ते मॅचेस जिंकत होते, पण आफ्रिकन नेशन्समध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये. त्यामुळं त्यांची दखलही तेवढ्यापुरतीच घेतली जात होती.

मात्र तरीही नामिबियानं जवळपास प्रत्येक क्वालीफायरमध्ये भाग घेणं सुरुच ठेवलं. काही मॅचेस जिंकल्या तरी सगळी स्पर्धा जिंकून वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवायला त्यांना २०२१ पर्यंत वाट पाहावी लागली.

२०२१ ला युएईमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी सुपर १२ मध्ये स्थान तर मिळवलंच पण सोबतच स्कॉटलंडला हरवून मोठा धक्काही दिला.

यानंतर मात्र भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड अशा ग्रुपमधल्या इतर तगड्या टीम्सना हरवणं मात्र त्यांना जमलं नाही. तरीही २०२१ चा हा वर्ल्डकप नामिबियासाठी फायद्याचा ठरला. त्यांच्या प्लेअर्सला इंटरनॅशनल पातळीवर स्वतःचं टॅलेंट दाखवता आलं. टीमला गरजेचे असणारे स्पॉनर्सही मिळाले.

स्पॉनर्स किंवा पैसे किती महत्त्वाचे असतात, हे जेव्हा एखाद्या नवख्या प्लेअरला आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा नाही, तर नामिबियासारख्या टीमला आर्थिक मदत मिळते तेव्हा समजतं.

नामिबिया हा आयसीसीचा असोसिएट मेम्बर देश आहे. त्यांच्या देशातलं क्रिकेट वाढावं आयसीसी त्यांना आर्थिक मदत करतं. २०१९ मध्ये नामिबियाला वनडे नेशनचा दर्जा मिळाला. यामुळं साहजिकच आयसीसीकडून येणाऱ्या आर्थिक मदतीचा स्रोत वाढला. याचा फायदा म्हणजे नामिबियानं आणखी काही प्लेअर्ससोबत कॉन्ट्रॅक्ट केलं.

त्याआधी नामिबियाचे फक्त तीनच प्लेअर्स नामिबियन क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध होते. आयसीसीच्या या मदतीनंतर हा आकडा वाढून १३ झाला.

फक्त एका रात्रीत बाकीचे जॉब आणि शिक्षण सांभाळून क्रिकेट खेळणारे नामिबियाचे प्लेअर्स प्रोफेशनल क्रिकेटर्स झाले.

पण या एका रात्रीसाठी त्यांनी जवळपास २००३ पासून सातत्यानं केलेला संघर्ष विसरुन चालत नाही. नामिबियाला आणखी एक आधार मिळाला तो म्हणजे डेव्हिड विझ नावाचा प्लेअर. आजच्या मॅचमध्ये भले त्याची बॅट बोलली नसेल, पण विझ हा नामिबियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. सुरुवातीला त्यानं साऊथ आफ्रिकेकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं, अगदी वर्ल्डकपही खेळला. मात्र नंतर इंग्लंडला स्थायिक झाला. जेव्हा ब्रेक्झिट झालं तेव्हा विझ इंग्लंडमधून बाहेर पडला आणि इतर क्लब्स किंवा चांगली कमाई करुन देणाऱ्या टीम्सकडून खेळण्याची संधी असूनही त्यानं आपले पूर्वज ज्या देशाचे होते, त्यानामिबियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

एकटा डेव्हिड विझ नाही, तर कॅप्टन गेरहार्ड इरॅस्मस, जॅन फ्रायलिंक अशा कित्येक क्रिकेटर्सनं बाहेरच्या देशाकडून खेळण्याच्या, पैसे कमवण्याच्या कित्येक संधीवर पाणी सोडलं.

आज जेव्हा नामिबियानं श्रीलंकेसारख्या बलाढ्य टीमला सहज हरवलं, तेव्हा २००३ पासून करत आलेल्या त्यांच्या कष्टाचं निश्चितच चीज झालं असेल.

आता नामिबियासमोर पुढचं आव्हान सुपर १२ मध्ये प्रवेश करुन आणखी मोठी मजल मारण्याचं असेल, जे शक्य होणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. हे श्रीलंका विरुद्ध नामिबियाचं स्कोअरकार्ड पाहिलं की लक्षात येतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.