शिल्पा शेट्टीवर टप्पे टाकणाऱ्या जेफ्री बॉयकॉटचं तोंड नवजोत सिंग सिद्धूनं बंद केलं होतं…

भारत क्रिकेटची मॅच जिंकला काय किंवा हारला काय… इंग्लंडचा एक गडी ट्विटरवर आपली मापं काढायला हातात मोबाईल घेऊनच बसलेला असतो. तुम्ही क्रिकेट फॅन असाल, तर तुम्ही शंभर टक्के नाव ओळखलं असणार… मायकेल वॉन. त्याचं भारताशी काय वाकडं आहे माहीत नाय, पण वॉन भाऊ बोलबच्चन टाकणार आणि आपला वसीम जाफर त्याचा किरकोळीत मामा करणार… हे चित्र क्रिकेट फॅन्सच्या सवयीचं झालंय.

बरं भारताची माप काढायला उत्सुक असणारा मायकेल वॉन हा काय एकटा इंग्लिश क्रिकेटर नाही. त्याच्याही आधी एक माणूस होता, ज्याला वाटायचं भारत म्हणजे लेचीपेची टीम, भारतीय कमेंटेटर्समध्ये काय दम नाही, पण याचा हाच माज लॉर्ड्सच्या गॅलरीत टी-शर्ट काढणाऱ्या सौरव गांगुलीनं आणि एका फटक्यात निरुत्तर करणाऱ्या नवजोत सिंग सिद्धूनं मोडला होता. हा माणूस म्हणजे सर जेफ्री बॉयकॉट.

नावामागं सर ही उपाधी मिळालेला जेफ्री क्रिकेटर म्हणून लय बादशहा नसला, तरी गुणवान मात्र होता. जुने जाणते क्रिकेट चाहते त्याला डिफेन्सचं मूर्तीमंत उदाहरण म्हणायचे. भाऊ डिफेन्स करण्यात इतका बाप होता, की गुगलवर त्याचं नाव टाकलं, की खाली प्रश्न येतो, ‘जेफ्री बॉयकॉटनं कधी सिक्स मारलाय का?’ कट्टर टेस्ट क्रिकेटर. जेफ्री आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १०८ टेस्ट मॅचेस खेळला, आठ हजारापेक्षा जास्त रन्स केले, २२ शतकं मारली. त्याच्या खेळामुळे त्याचं नाव चांगलंच गाजलं.

पण एक मेख होती की, जेफ्रीला फार मित्र नव्हते. तो स्वतःचं कौतुक करण्यात किंवा स्वतःचा उदोउदो करण्यात कायम मश्गुल असायचा. क्रिकेट थांबल्यानंतर त्याची पावलं वळली कमेंट्री बॉक्सकडे. क्रिकेटचं चांगलं ज्ञान आणि खिळवून ठेवणारा आवाज, यामुळं त्याची कमेंट्री लोकांना आवडायचीही, पण त्याच्यातही स्वतःचं मोठेपण सांगणं असायचंच.

बऱ्याचदा कमेंट्री बॉक्समध्ये त्याचा सहकारी असायचा नवजोत सिंग सिद्धू. आता सिद्धू क्रिकेटच्या मैदानावर तरी आपल्या कॅप्टनचं किंवा बॅटिंग पार्टनरचं ऐकेल. पण कमेंट्री बॉक्समध्ये (आणि पक्षातही) सिद्धू समोरच्याला गप्प करण्यात वस्ताद आहे. जेफ्री बॉयकॉटनं अनेकदा सिद्धूची चेष्टा मस्करी केली, सिद्धू आपला मोठेपणाचा मान ठेवून थंड घ्यायचा पण एक दिवस त्याचं सटकलंच…

तेव्हा इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमुळं बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या होत्या. अभिनेत्री शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांना हजर असायची. जेफ्रीभाऊलाही नाईंटीजच्या पोरांप्रमाणं शिल्पा आवडायला लागली. पण आता तिचा फोटो पाकिटात ठेवायचा आणि गप बसायचं ही स्कीम त्याला माहीत नसावी. कारण हा गडी जाहीरपणे म्हणायचा, ‘शिल्पा फक्त माझ्याकडे बघून हसते.’

एकदा सिद्धू आणि बॉयकॉट कमेंट्री बॉक्समध्ये एकत्र होते. बॉयकॉट म्हणाला, ‘सुंदर सूर्यप्रकाशाला बघून मला शिल्पा शेट्टीची आठवण येते.’ सिद्धू जणू काही वाटच पाहत होता, तो म्हणाला, ‘सर जेफ्री शिल्पा तुमच्याकडे बघून हसते कारण तिला वाटतं तुम्ही तिच्या वडिलांचे मित्र आहात.’ तेव्हा साधारण ७० वर्षांचा असणारा जेफ्री खवळला. तो म्हणला, ‘असं काही नाहीये, मी अजूनही तरुण आहे. माझ्या डोक्याकडे बघ.’

सिद्धूला तर फुलटॉस मिळाला होताच, त्यानं थेट सिक्स हाणला. तो जेफ्रीला बोलला, ‘सर जेफ्री तुमच्या मागच्या वाढदिवसाला जेवढा खर्च केकवर झाला, त्यापेक्षा जास्त खर्च मेणबत्त्यांसाठी झाला असेल.’ सिद्धू आपल्याला असं काही बोलेल याची वय झालेल्या जेफ्रीनं कल्पनाच केली नव्हती, त्याच्या या अचानक आलेल्या उत्तरामुळं तो हँग झाला आणि त्यानंतर शिल्पा शेट्टीबद्दल काहीच बोलला नाही. सिद्धूच्या शब्दांनी चांगलीच टाळी ठोकली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.