मोदी टीका करतायत खरं घराणेशाहीनं पार भाजपलाही पोखरलंय

भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन नुकताच पार पडला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दोन गोष्टींवर सडकून टीका केली. पहिला मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरा मुद्दा म्हणजे घराणेशाही.

आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घराणेशाहीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “राजकारणातली घराणेशाही संपायला हवी. घराणेशाहीच्या राजकारणाला देशाशी काहीही देणघेणं नसतं. यामुळे देशातल्या राजकारणाच्या शुद्धीसाठी घराणेशाहीच्या मानसिकतेला दूर करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचं आवाहन मी तुम्हाला करतोय. राजकीय घराणेशाहीमुळं भारतातल्या प्रत्येक संस्थेत घराणेशाहीला पोषण दिलं जातंय. याच कारणामुळं देशाच्या सामर्थ्याला आणि बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचतंय. घराणेशाही भ्रष्टाचारालाही कारणीभूत आहे.”

फक्त मोदीच नाही, तर याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता.  तर मोदींच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली.

आता हे टीकांचं सत्र दोन्ही बाजूनं सुरू राहील, पण हे पाहायला हवं की आपल्या महाराष्ट्रात आणि देशात घराणेशाही कशी पसरली आहे.

राज्याबाबत बोलायचं झालं, तर पहिलं नाव येतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. एकनाथ शिंदेंना घरातून राजकीय वारसा नसला, तरी शिंदे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. साहजिकच एकाच घरात मुख्यमंत्री (आमदार)-खासदार ही पदं आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते, तर काकू शोभा फडणवीस यांनी राज्याचं मंत्रीपदही भूषवलं आहे.

राज्यातलं तिसरं महत्त्वाचं नाव येतं, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं. अजित पवार यांचे काका शरद पवार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत दोन टर्म खासदार आहेत. तर शरद पवारांचे नातू रोहित पवार हे सुद्धा आमदार आहेत.

सध्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे पाहिलं, तर सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील. त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे ७ वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे सध्या लोकसभेत खासदार आहेत.

राज्यातली आणखीही अनेक नावं ही घराणेशाहीतूनच पुढं आली आहेत किंवा प्रस्थापित झालेल्या नेत्यांची मुलं आता राजकारणात उतरली आहेत. आमदारकी-खासदारकी एकाच घरात, नगराध्यक्ष-आमदारकी एकाच घरात अशीही अनेक उदाहरणं आपल्याला राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतात.

अगदीच व्यवस्थित अंदाज येण्यासाठी २०१९ च्या विधानसभा उमेदवारांची आकडेवारी पाहुयात.

दिव्य मराठीनं प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातली आकडेवारी पाहिली, तर तब्बल ९४ उमेदवार हे घराणेशाहीतून पुढे आलेले होते. यापैकी सर्वाधिक ३५ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, त्यानंतर भाजपचे २५, काँग्रेसचे १९ तर शिवसेनेचे ११ उमेदवार घराणेशाही मधले होते. विशेष म्हणजे निवडणुकीत यातले ५४ उमेदवार निवडूनही आले.

आणि ही फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या १४ जिल्ह्यांचीच आकडेवारी आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे १६ तर राष्ट्रवादीचे १० उमेदवार आहेत.

हे झालं महाराष्ट्राचं, पण केंद्रातल्या राजकारणाचं काय..?

तर लोकसभेत सगळ्यात मोठा पक्ष आहे ३०३ खासदार असलेला भाजप. या ३०३ खासदारांपैकी ७५ खासदार हे घराणेशाहीतुन निवडून आलेले आहेत, पण ३०३ खासदारांमुळे या ७५ खासदारांची टक्केवारी फक्त २४.७५ टक्के इतकीच होते. खासदारांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे ५२ खासदार असणारा काँग्रेस. ज्यांचे २४ खासदार हे घराणेशाहीचे मेम्बर आहेत, ज्यामुळं त्यांची टक्केवारी जाते ४६.१५ टक्के.

यानंतर मुद्दा येतो तो राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचे लोकसभेत ५ खासदार आहेत, ज्यातल्या दोन खासदारांना राजकीय वारसा आहे. महाराष्ट्रातला आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेचे सध्या लोकसभेत दोन गट आहेत आणि खासदारांची एकूण संख्या आहे १९ आणि त्यातले ९ खासदार घराणेशाही असलेले आहेत, ज्याची टक्केवारी जाते ४२.११ टक्के.

शिवसेनेबद्दल बोलायचं झालं, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार कोसळेपर्यंत एकाच घरात मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या रूपात कॅबिनेट मंत्रीपद होतं.

घराणेशाहीचा परिणाम किती खोलवर रुजलाय, हे पाहायचं झालं तर देशातल्या मुख्यमंत्र्यांकडे एकदा नजर टाकुयात.

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजकारणातलं मोठं नाव.
  • अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे वडील दोरजी खांडू हे सुद्धा माजी मुख्यमंत्री.
  • झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र.
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वडील सुद्धा माजी मुख्यमंत्रीच.
  • मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचे वडील पीए संगमा हे सुद्धा माजी मुख्यमंत्री.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक.
  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र. 

थोडक्यात ७ राज्यांचे मुख्यमंत्री हे माजी मुख्यमंत्र्यांचेच पुत्र आहेत.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांचा मुलगा आदित्य तमांग हे सिक्कीम विधानसभेत आमदार आहेत.

त्यामुळं मोदी लाल किल्ल्यावरुन टीका करत असले, तरी भाजपचे ७५ खासदार, बसवराज बोम्मई आणि पेमा खांडू हे मुख्यमंत्री घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत. त्यामुळं काँग्रेस असो किंवा भाजप किंवा अगदी इतर प्रादेशिक पक्ष, फक्त आमदारकी आणि खासदारकीच नाही, तर अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत घराणेशाही पोहोचलेली आहे, हेच या आकडेवारीमधून स्पष्ट होतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.