उडत्या बसचं माहीत नाही, पण हायड्रोजन कारमध्ये दम आहे

सकाळी सकाळी पेट्रोल पंपावर थांबलो होतो, गर्दीतल्या एकाही चेहऱ्यावर आनंद नव्हता. गाडीत शंभरचं टाकलं तरी आणि टाकी फुल केली तरी लोकं गणितं करतच जात होते. आपण पाकीट रिकामं करुन पेट्रोल भरलेलं असताना, शेजारून इलेक्ट्रिक बाईकवाला मात्र हसत हसत जातो.

आपण मनात विचार करतो, की आपल्याला इलेक्ट्रिक बाईक कधी परवडणार आणि तेवढ्यात बातमी समोर येते की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन कारमधून प्रवास केला.

आपण विज्ञानाच्या तासाला हायड्रोजनबद्दल शिकलो होतो, त्यानंतर आपण त्याचा फारसा लोड घेतला नाही आणि आता अचानक हायड्रोजनवर गाड्या पळायला लागल्या. पण हायड्रोजनवर कार कशी त्याचे काय फायदे काय आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला हायड्रोजनवर चालणारी गाडी परवडणार का? असे लय प्रश्न आपल्याला पडतात. त्यात इलेक्ट्रिक गाडी भारी की हायड्रोजनवाली हे गणित आहेच.

लोड घेऊ नका सोप्प करुन सांगतो…

नितीन गडकरी ज्या गाडीतून संसदेत गेले, ती गाडी होती टोयोटाची ‘मिराई.’ जपानी भाषेत मिराई शब्दाचा अर्थ होतो, भविष्य.

सध्या टोयोटा किर्लोस्कर मोटार आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी भारतातल्या उष्णतेत आणि वातावरणात हायड्रोजन कार कशी चालेल, याची चाचणी करतायत. चाचणी करायला व्हॉलेंटियर आहेत, स्वतः नितीन गडकरी.

आता गाडी मार्केटमध्ये येईल तेव्हा येईल, पण गाडी हायड्रोजनवर चालते तरी कशी?

तर आपल्या गाडीत जसं पेट्रोल बसतं, तसंच इथं हाय प्रेशर टॅंकमध्ये हायड्रोजन साठवला जातो. पुढं तो वीज निर्मितीसाठी फ्युअल सेलमध्ये पाठवला जातो. त्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये रिऍक्शन होते आणि वीज निर्माण झाल्यानं आपली गाडी पळू लागते.

या ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीची एवढी चर्चा होतेय, म्हणल्यावर कायतर भारी असणारच की. विषय असाय, की या गाडीमुळं अजिबात प्रदूषण होत नाही. टाकीत एकावेळी साडेपाच किलो हायड्रोजन बसतं, म्हणजे एका फिलिंगमध्ये तुमची गाडी पळणार ६४६ किलोमीटरपर्यंत.

पुण्यातून गोवा एका टप्प्यात. बरं समजा जरा कर्नाटकात जाऊन यावं वाटलं आणि टाकी रिकामी झालीच, तर परत फुल करायला वेळ लागतोय डोक्यावरुन पाणी ५ मिनिटांचा. म्हणजे पुन्हा ६४६ किलोमीटरचा टप्पा धरायला तयार. प्रदूषण नाही, मायलेज खुंखार म्हणल्यावर गाडी घ्यायची इच्छा होणारच की.

पण कसंय ही गाडी मार्केटमध्ये उपलब्ध होणं हा काय सोपा विषय नाही. 

त्यासाठी सरकारला प्लँनिंग करुन योजना राबवणं गरजेचं आहे. कारण गाडी दिसायला आणि पळायला भारी असली, तरी हायड्रोजनची किंमत काय परवडणारी नाही. सध्या एक किलो हायड्रोजन साधारण ३५० रुपयापर्यंत जातं, म्हणजे गाडी फुल करायला १७००-१८०० रुपये गेले. 

आता नॉर्मल गाड्यांना यापेक्षा जास्त पैसे लागत असले, तरी हायड्रोजन गाडीची किंमत अंदाजे ५० लाखापर्यंत जाऊ शकते. रोजच्या प्रवासासाठी ५० लाखाची गाडी घेणं सामान्य माणसाला तरी परवडत नसतंय भिडू. लोकांना गाडी परवडण्यासाठी गाडीची आणि हायड्रोजनची किंमत खाली येणं गरजेचं आहे. 

भारत सरकारनं फेब्रुवारीमध्ये हायड्रोजन मिशन जाहीर करत, २०३० पर्यंत ५० लाख टन ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी सरकार ३ हजार कोटी खर्चही करत आहे. हे शक्य झालं, तर भारत ग्रीन हायड्रोजन निर्यात करू शकतोय. या मिशनअंतर्गत भारत पाण्यापासून आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहे. 

साहजिकच पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांच्या आयातीमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा बोझ कमी होईल. 

पण नुसतं हायड्रोजन निर्माण करुनही चालणार नाय, जर गाड्या मार्केटमध्ये आणल्या… तर त्याच्यात गॅस भरायला हायड्रोजन स्टेशनही उभारली पाहिजेत. आपल्याकडं इलेक्ट्रिक गाड्या दिसत असल्या, तरी त्यांच्यासाठी फारशी स्टेशनं नाहीत, तिथं हायड्रोजन कारची अगरबत्ती कशी ओवाळणार?

सध्या पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना इलेक्ट्रिक गाड्या टक्कर देतायत. ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या आल्या की इलेक्ट्रिक की हायड्रोजन असा प्रश्न फिक्स पडणार. तर विषय असा आहे, की हायड्रोजन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं हायड्रोजनच्या गाड्यांना एक मार्क जास्त मिळतो.

 इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीज खराब होऊ शकतात. त्या गाड्या पेट घेण्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहेत. दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक गाड्या हलक्या आहेत, तर हायड्रोजन गाड्या टाक्यांमुळं जड होणार. इलेक्ट्रिक बाईक्स आल्या असल्या, तरी हायड्रोजन बाईक्स येणार का नाय?  याबद्दलचं चित्र अजूनतरी स्पष्ट नाही. त्यामुळं कार घ्यायला हायड्रोजन बरं असलं, तरी बाईकसाठी इलेक्ट्रिकचाच पर्याय फॉर्मात असेल. 

एक मात्र आहे, भारत सरकारची योजना यशस्वी झाली, तर रस्त्यांवरचं चित्र एकदम भारी असेल. गाड्या पळतायत पण हॉर्न सोडून कसला मोठा आवाज नाही, आपल्याला खोकायला लावणारा पुढच्या गाडीतुन येणारा धूर नाही. समजा हायड्रोजन आणि विजेचे भाव खाली आले, तर गाडी पळवण्यासाठी पाकीट रिकामंही करावं लागणार नाही. 

सध्या गडकरी ट्रायल घेत असले, तरी त्यांच्याकडची मिराई सगळ्या भारताचं ‘मिराई’ बदलू शकते, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.