संजय गांधींनी विमानातून शेती पाहिली, आज त्याच पट्ट्यावर ट्विन टॉवरवालं ‘नोएडा’ उभं राहिलं…

बातम्या आणि सोशल मीडियावर सकाळपासून फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे नोएडामधले ट्वीन टॉवर्स. खरंतर गेल्या काही दिवसांपासूनच हा विषय बातम्यांमध्ये येत होता, मात्र रविवारी अडीच वाजता पार काऊंटडाउन देऊन फक्त १० सेकंदात हे ३२ आणि २९ मजली टॉवर्स पाडण्यात आले. यानंतर नोएडामध्ये धुळीचा लोट उठला आणि सोशल मीडियावर मिम्सचा.

पार सस्पेन्स असलेल्या मॅचची कॉमेंट्री केल्यासारखं कित्येक रिपोर्टर लोकांनी खतरनाक सूत्रसंचालन केलं. ते ऐकतानाच एक वाक्य होतं, या ‘ट्वीन टॉवर’च्या आजूबाजूला तब्बल ४५ इमारती आहेत. आता आपल्या मुंबईत तेवढ्या एरियात आणखी ढीगभर बिल्डिंगा बसल्या असत्या. त्यामुळं नोएडातली गर्दी मुंबईपुढं अतिसामान्यच.

पण आपल्या मुंबईला फार मोठा इतिहास आहे, मुंबईची प्रगतीही गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र नोएडा गेल्या ४६ वर्षांत उभं राहिलंय. आज औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळवलेलं हे नोएडा उभं राहिलं ते संजय गांधींच्या एका विमानप्रवासामुळं.

वर्ष १९७६ देशात आणीबाणी लागली होती. इंदिरा गांधींचा एकछत्री अंमल सुरू होता आणि त्याचवेळी भारताच्या राजकीय पटलावर संजय गांधींचा उदय झाला होता. नसबंदी मोहीमेमुळं आणि स्वतःच्या एकाधिकारशाहीमुळं लोकांमध्ये संजय गांधी यांच्याबाबत मोठा रोष होता. कित्येक राजकारणी मात्र संजय गांधींचाच आदेश प्रमाण मानत होते. त्यामुळं अर्थातच संजय गांधींना अभूतपूर्व अशी ताकद मिळाली होती.

आता विषय असा होता की, एनडी तिवारींना न्यू दिल्ली तिवारी असं म्हणलं जायचं, कारण दिल्ली वरुन येणारा प्रत्येक आदेश ते पाळायचे.

त्यात आणीबाणीच्या दिवसात संजय गांधींनी दिलेला सल्लाही आदेशासारखाच होता. त्यामुळं एनडी तिवारींनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. झटपट सूत्रं हलली आणि दिल्लीच्या सीमेवर औद्योगिक शहर उभं करण्यासाठी प्रयत्नही सुरू झाले.

तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारनं १७ एप्रिल १९७६ ला अध्यादेश काढला आणि उत्तर प्रदेशच्या सरकारकडून याला मंजुरीही मिळाली. काहीच दिवसात न्यू ओखला इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अथॉरिटी (NOIDA) उभं राहीलं. या गोष्टी झटपट होण्यामागचं कारण साहजिकच संजय गांधींचा आग्रह होता.

पण संजय गांधींना नोएडामध्ये औद्योगिक शहर का उभं करायचं होतं..?

देशाची राजधानी असल्यानं दिल्लीत मोठ्या प्रमाणावर फॅक्टरीज होत्या. औद्योगिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र संजय गांधींना या सगळ्या फॅक्टरीज दिल्लीच्या जवळच हलवायच्या होत्या. त्यामुळे दिल्लीच्या अगदी सीमेवरच असलेल्या या शेतीच्या पट्ट्याला संजय गांधींनी पसंती दिली. 

त्यांचा विचार होता की यामुळं दिल्लीतलं प्रदूषण तर थांबेलच, पण सोबतच निवासी क्षेत्रासाठी मोठा प्रदेश खुला होईल.

पण मग त्याआधी नोएडाचा इतिहास काय सांगतो..?

नोएडा ही क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखलं जायचं. रामप्रसाद बिस्मिल आणि भगतसिंग या क्रांतिकारकांनी भूमिगत होण्यासाठी नोएडाचाच पर्याय निवडला होता. पुराणातही नोएडाच्या भागाचा उल्लेख सापडतो. १८०३ साली मराठे आणि ब्रिटिशांमध्ये झालेलं युद्धही याच भागात झालं होतं. त्याची आठवण म्हणून इथं ब्रिटिशांनी उभा केलेला ‘जीतगढ स्तंभ’ ही आहे. त्यामुळं यमुनेकाठच्या या भागाला मोठा वारसा लाभला होता, १९७६ पर्यंत इथं मोठ्या प्रमाणावर शेती होती. साहजिकच यमुनेच्या पाण्यामुळं ही शेती बहरली होती. मात्र या भागाचं रूप पालटलं ते औद्योगिकीकरणामुळं.

हे औद्योगिकीकरण झालं तरी कसं, याचा इतिहास जाणून घेणं मात्र महत्त्वाचा आहे.

तिथं होती शेती, त्यामुळं शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेणं महत्त्वाचं होतं. सरकारनं यासाठी भू संपादन कायदा लागू केला. त्याअंतर्गत अगदी तत्परतेनं जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. गाझियाबाद आणि बुंदेलखंडमधली जमीन मोठ्या प्रमाणावर सरकारनं आपल्याकडे घेतली. मात्र या जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना या बदल्यात एका स्क्वेअरफूटला ३ ते ४ रुपयेच मोबदला देण्यात आला. साहजिकच इथले शेतकरी चिडले आणि कित्येकांनी जमिनी द्यायला विरोध केला. कित्येकांनी सरकारवर जबरदस्ती जमीन ताब्यात घेतल्याचे आरोपही केले. 

काही शेतकऱ्यांनी मोबदला घ्यायला नकार देत, थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. आजही यबबद्दलच्या कित्येक केस प्रलंबित आहेत.

याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या नोएडात आता जमिनीचे, घरांचे भाव कोट्यावधींमध्ये आहेत. हायटेक शहर म्हणून नोएडा नावारूपाला आलंय. तिकडे मेट्रो तर आलीच, पण मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेसही नोएडामध्येच आहेत.

कधीकाळी शेतीचा हिरवा पट्टा असणारा हा भाग आता मात्र रविवारी पाडलेल्या ट्विन टॉवर्ससारख्या असंख्य मोठ्या बिल्डिंग, कारखाने आणि ऑफिसेस उभी आहेत. तब्बल १६० गावांचा समावेश नोएडामध्ये होतो, तिथं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण हे सगळं शक्य झालं, ते संजय गांधींचा त्या विमानप्रवासामुळं आणि त्यांच्या सल्ल्याला आदेश मानून काम करणाऱ्या एनडी तिवारींमुळं!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.