गोळी असती स्टॅमिना वाढवण्यासाठी, मग अचानक जीवावर कसं काय बेततंय..?

बरोब्बर एका वर्षापूर्वी माध्यमांमध्ये एक बातमी आली होती, “प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू’.

घटना शी होती की, सावनेरमध्ये एक तरुण आणि तरुणी लॉजवर गेले होते. त्यांनी चेक इन केलं आणि रुममध्ये गेले. रूममध्ये जाताच थोड्या वेळात तो तरुण बेशुद्ध पडला. त्याला बेशुद्ध पडल्याचं बघून प्रेयसीने तात्काळ हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि तरुणाच्या मित्राला देखील माहिती दिली. सगळ्यांनी बेशुद्ध तरुणाला शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. म्हणून प्रकरण संशयास्पद मृत्यूच्या विळख्यात अडकलं.

पोलिसांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा मृत तरुणाच्या खिशात स्टॅमिना बुस्टर टॅब्लेट्स आढळल्या. म्हणजेच या तरुणाने सेक्स पावर वाढवण्याची शक्तिवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. मात्र त्याने गोळ्या प्रमाणाबाहेर घेतल्याने तो बेशुद्ध झाला आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

कोणत्याही गोष्टीचं अर्धवट ज्ञान असणं हे किती घातक ठरू शकतं याचंच उदाहरण म्हणून या घटनेकडे बघितलं जाऊ शकतं. सेक्स पावर वाढवण्याच्या गोळ्यांचं सेवन कुणी करतंय, मात्र ते किती प्रमाणात करावं याचं ज्ञान नसल्याने जीवावर बेतू शकतं, हे यातून स्पष्ट झालंय.

तसं बघितलं तर लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. व्हायग्रा सारख्या गोळ्या तर माहीतच असतील. मात्र अशा अनेक इतर गोळ्या आहेत. शिवाय आयुर्वेदिक गोळ्या म्हणून विकल्या जाणाऱ्या गोळ्यांचं प्रमाण सध्या वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात.

सेक्स पावर कमी होण्याला वैद्यकीय भाषेत इरेक्टाइल डिसफंक्शन आणि मराठीत स्तंभन दोष असं म्हणतात. सेक्स करताना एखाद्या व्यक्तीचं लिंग जर कडक होत नसेल, अर्ली इजॅक्युलेशन (सेक्स करतेवेळी लवकर पाणी पडणं) होत असेल असे दोष असतील तर उपचाराची गरज असते. या दोषांमध्ये इतर आजारांचा प्रश्न असतो. 

म्हणजे वजन जास्त असेल, डायबिटीज असेल, ब्लडप्रेशर असेल किंवा मानसिक काही त्रास असेल किंवा काही वेळा तर शरीरातील हार्मोन्स कमी झाले असतील तेव्हा सेक्स पावर कमी होण्याचा दोष निर्माण होतो. अशात उपचाराची गरज भासू शकते.

डॉक्टरांचा सल्ला घेऊन या गोळ्या घेतल्या जातात. फिजिशियन किंवा युरॉलॉजिस्ट याचे उपचार करतात. साधारणपणे वयाची पस्तिशी-चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांना या गोळ्यांची गरज भासू शकते. मात्र अलीकडे तरुणांतही या गोळ्या घेण्याचं प्रमाण जास्त असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

तरुणांमध्ये याचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे एन्झायटी, शारीरिक आरोग्याकडे लक्ष न देणं, आहार योग्य नसणं आणि व्यायामाचा अभाव यातून वाढत जाणारं स्थूलत्व. शिवाय ताणतणावाने चिंता देखील वाढते. यामुळे कमी वयात आजार जडतात आणि सेक्स पावर कमी होण्याचा दोष निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. 

या दोषांमुळे स्टॅमिना वाढवण्याच्या गोळ्यांची मागणीही वाढली आहे. 

या गोळ्यांची मागणी बघायची असेल तर सोपं काम करू शकतात… गुगलवर जाऊन सेक्स पावर वाढवण्याच्या गोळ्या सर्च करा. ढीगाने लेख मिळतील यावर लिहिलेले. टॉप १० गोळ्या, टॉप ५ आयुर्वेदिक गोळ्या. आणि मग त्यांच्या किंमती चेक करा… अहो, हजार-दोन हजाराच्या पारच आहेत आकडे. शिवाय मागणीच्या रेटिंग बघा… त्यांचाही आलेख उंचच दिसेल.

सर्रासपणे या गोळ्यांची खरेदी आणि विक्री वाढल्याचं यातून दिसतं. जाहिरातींच्या माध्यमातून याची माहिती दिली जात आहे. या गोळ्यांची ऑनलाईन विक्री तर होतेच पण मेडिकल स्टोर्समध्ये देखील यांचा खप वाढला असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

यात महत्वाचा मुद्दा असा की, या गोळ्यांची विक्री करताना कोणत्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन आजकाल चेक केलं जात नाहीये. म्हणून या गोळ्या सहज ऍक्सेसिबल झाल्या आहेत.

परस्पर तरुण ही औषधं घेत आहेत मात्र काही औषधांमुळे मानवी शरिरावर विपरित परिणाम होत आहेत, हे ही तितकंच खरं आहे.

म्हणूनच अशा शक्तिवर्धक गोळ्या घेताना त्याचे साईड इफेक्टस, लक्षणं काय असतात? आणि जीवावर बेतू नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने…

IMA चे माजी अध्यक्ष, आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली. 

त्यांनी सांगितलं…

लैंगिक उत्तेजना आणि छातीचे ठोके यांच्यात एक महत्त्वाचा परस्परसंबंध असतो. लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या एकमेकांशी थेट जोडलेल्या असतात. म्हणून अशा गोळ्यांचे दुष्परिणाम थेट हृदयाला होतात, हृदयात दोष निर्माण होतो. 

ब्लड प्रेशर (रक्तदाब) वाढणं, हृदयाचे ठोके अनियमित पडणं, हृदयाचे ठोके वाढले की श्वसन प्रक्रिया वाढणं आणि श्वास घेण्यास त्रास वाढला तर हृदय बंद पडणं, असे साईड इफेक्टस होतात.

असं होऊन जीवावर बेतू नये म्हणून एकच उपाय असतो तो म्हणजे – 

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणं.

सेक्स स्टॅमिना कमी होण्यासाठीची औषधं देताना डॉक्टर पुढच्या व्यक्तीला नक्की कुठल्या प्रकारचा त्रास आहे, हे तपासून औषध देत असतात. यावेळी रुग्णाच्या वयाचा, वजनाचा आणि आजाराचा विचार केला जातो. त्यानुसार औषधाचं प्रमाण म्हणजेच डोस ठरवला जातो. 

तसं न करता परस्पर गोळ्या घेतल्या तर विपरीत परिणाम होतात.

उदाहरणार्थ व्हायग्रा सारखी जी औषधं असतात ती हृदयविकार ज्यांना आहे, ब्लडप्रेशरचा त्रास आहे, हृदयाच्या स्पंदनांमध्ये त्रास आहे त्यांच्यासाठी धोकायदायक असतात. त्यांनी ही औषधं घेतल्यास व्यक्तीला अटॅक येऊ शकतो, हृदय बंद पडू शकतं.

अशाप्रकारे वेगवेगळ्या औषधांचे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. हे दुष्परिणाम औषधं देणाऱ्या डॉक्टरला माहित असतात म्हणून त्याप्रमाणे ते योग्य गोळ्या सुचवतात. म्हणून त्यांचा सल्ला हा अत्यंत महत्वाचा असतो.

अनेकदा कोणत्याही औषधाची गरज नसते कारण हा त्रास मानसिक असू शकतो. ताणतणावामुळे अशी समस्या उद्भवली असेल तर ती मार्गदर्शनाने दूर होऊ शकते. कोणत्याही औषधाची गरज भासत नाही, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं आहे. 

लक्षात घ्या.. कुठल्याही औषधांचा अधिकचा डोस घेतल्याने त्याचा जास्त लवकर परिणाम होतो असं मुळीच नसतं. ताप असेल तर एकच गोळी पुरेशी असते. जास्त गोळ्या घेतल्या तर विपरीत परिणाम होऊन ताप डोक्यातही जाऊ शकतो, हे साधं उदाहरण आपल्या समोर आहे. तेव्हा हे सर्व लक्षात घेऊन सतर्क राहणं गरजेचं आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.