खुद्द पु.ल.देशपांडे यांच्या हस्ताक्षरात साहित्यिक आनंद यादव यांचा जन्म झाला.

कागलच्या आन्दाला शाळा शिकायला झोंबी खेळावी लागली. शेतकऱ्याच्या पोरांना शिक्षण म्हणजे चैन समजण्याच्या तो काळ. बापाचा मार आणि शिव्या खात कसतरी दहावी पूर्ण केली. पण संघर्ष थांबला नाही.

अखेर आन्दाने कागल सोडलं.

सोडलं म्हणजे काय तिथून पळून गेला. गावातल्या शहाण्या लोकांनी या होतकरू पोराला पुढच्या शिक्षणासाठी वर्गणी काढली होती. त्याच पैशांनी पुढच शिक्षण त्याला पूर्ण करायचं होत.

कधीतर आवेगाने लिहिलेल्या वेदनेच्या कवितांची वही, आईने शिंकाळ्यावर ठेवलेली भाकर आणि शेतात गाळलेल्या घामाच्या आठवणी हि शिदोरी बांधून त्याने रत्नागिरी गाठली.

रत्नागिरीमध्ये विनोबांच्या सारख्या गांधीवादी कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या सर्वोदय छात्रलयात तो येऊन पोहचला. चरख्यावर सुत कातणे एवढीच अट तिथ राहण्यासाठी होती. यामुळे राहण्याखाण्याचा  प्रश्न सुटला. गोगटे कॉलेजात त्याचं अॅडमिशन झालं. फक्त तिथल्या फी ची चिंता असायची.

एक दिवस कॉलेजचे प्राचार्य भावे मास्तरांनी त्याला भेटायला घरी बोलवले. खुद्द प्राचार्यांनी भेटायला बोलावले म्हटल्यावर आन्दाच्या पाचावर धरण बसली. रखडलेल्या फीबद्दल काही तरी कारण सांगाव लागणार हे त्यान मनाशी बांधलं होत. भावे सरांच्या घरात गेल्यावर त्यांनी त्यांच्या सुपरिचित गंभीर चेहऱ्यान त्यांना आत बोलावलं.

“बसा या खुर्चीवर”

आनंद उभाच राहिला. सर म्हणाले, “संकोच करू नका बसा. पु.ल.देशपांडे आले आहेत. त्यांना तुमच्या कविता वाचायला दिल्या. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे.”

अनपेक्षित झालेल्या या आनंदाने आन्दु गुदमरून गेला.

भावे सरांनी शिपायाला सांगितलं,

“अरे पीएल ना हाक मार. त्यांना म्हणावं जकाते आलाय भेटायला.”

पुलं आणि सुनीताबाई देशपांडे तिथ आले. आन्दाने त्यांना नमस्कार केला. आल्या आल्या त्यांनी विषयालाच हात घातला. “तुमच्या कविता फारचं छान आहेत. आम्हाला दोघांनाही त्या फार आवडल्या.” 

आन्दाला काय बोलावे तेच कळेना. एवढा मोठा साहित्यिक एका अकरावीच्या मुलाच्या कवितांच कौतुक करतोय ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती.

पुलं आणि सुनिताबाई आनंदच्या कवितेतील वास्तव ग्रामीण जीवन, त्यातले नाट्य, सहज वाटणारी अभिव्यक्ती,  ग्रामीण भाषेतला गोडवा याबद्दल बोलत राहिले. त्याच्या कवितांच पुनःपुन्ह वाचन करण्यात आल. हे सगळं दृश्य डोळ्यांचे दिवे करून आन्दा भरून ठेवत होता.

अचानक पुलं नी त्याला प्रश्न विचारला,

“तुम्हाला दोन आडनाव कशी?”

आनंद म्हणाला,”आमचं मूळ आडनाव यादव. पूर्वीच्या काळी आमच्या घराण्यातले लोक जकात गोळा करायचे म्हणून पडनाव जकाते !”

पुलं म्हणाले ,”असं होय. मग तुम्ही कशाला आनंद यादव-जकाते असं मोठ नाव लावता. साहित्यात तुमच्या या जकातीच्या धंद्याचा काही उपयोग नाही. आता पासून फक्त आनंद यादव इतकचं नाव लावा.” सगळेच या विनोदावर हसू लागले.

पुलं एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी समोरचं पडलेली प्राचार्य भावे यांची टिकमार्क करायची तांबडी पेन्सिल घेतली आणि आन्दाच्या वहीच्या पहिल्या पानावर  लिहिलं,

“हिरवं जग- आनंद यादव”

त्यांनी आनंद ला त्या कविता परत सुवाच्च अक्षरात लिहून काढायला लावल्या. त्याला काही पैसे दिले आणि ती वही पुण्याच्या आकाशवाणीच्या पत्त्यावर पाठवून द्यायला लावली. पुण्याच्या साहित्यिक वर्तुळात ती वही फिरत राहिली.

  1. पुलं नी आपल्या सगळ्या मित्रांना या उभरत्या कवीच्या कविता वाचून दाखवल्या. अवघ्या आकरावीच्या मुलाला आकाशवाणीची श्रुतिका लिहिण्याचा मान मिळाला.

आनंद यादव यांच्या प्रत्येक यशअपयशाच्या वेळी पुलं आणि सुनीताबाई त्याच्या पालकत्वाच्या जबाबदारीन त्याच्या पाठीशी राहिले. त्याच्या “झोंबी” या पहिल्या कादंबरीची प्रस्तावना सुद्धा त्यांनी लिहिली.

आनंद यादवमधली साहित्यिककला त्यांनी घडवली नाही पण शेतातल्या काळ्या मातीत लपलेला हा हिरा त्यांनी सगळ्या जगासमोर आणला.

हे ही वाचा –

2 Comments
  1. Vikas More says

    खूपच छान आठवण नमूद केलीय.आनंद यादवांची मी नटरंग कादंबरी वाचली होती.मी देखील कोल्हापूरचा च असल्याने त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. ग्रामीण भागातील लोकांचं जीणं त्यांनी अप्रतिमरित्या शब्दबध्द केलंय.
    आनंद यादव यांना त्यांच्या अजरामर साहित्यसंपदेसाठी मानाचा मुजरा!!!

Leave A Reply

Your email address will not be published.