घरातच असलेलं ऑडिओ लेटर मिळायला २७ वर्ष लागल्यानं महेश भटची प्रेमकहाणी अधुरी राहिली
सिनेमाच्या झगमगाटी दुनियेतील, लाईमलाईट मधील प्रेम बऱ्याचदा तडजोड, गरज किंवा संधी या मतलबासाठीच जुळले जाते का? कचकड्याच्या दुनियेतील हे प्रेम त्यामुळेच वासनेच्या पातळीवर राहून ‘व्यावसायिक’ संबध संपले की ते देखील संपून जाते. प्रत्येक वेळी असेच असते का? प्रत्येक प्रेमात व्यवहारच पाहिला जातो का? याचे उत्तर व्यक्ती सापेक्ष असते.
पण काही प्रेम कहाण्या मात्र रसिकांच्या मनात कायम घर करून राहतात.
प्रेमभंगाच्या, विरहाच्या त्या वेदना दोन्ही बाजूला आयुष्यभर सलत राहतात. कधी कधी त्या कलाकृतीतून व्यक्त होतात. मायानगरीत अशी बरीच उदाहरणे आहेत. सिनेमातील कलावंतांचं प्रेम हे फिल्मी आहे, तात्पुरतं आहे, वरवरचं आहे असं समजलं जातं; पण प्रत्यक्षात सर्वच वेळेला असंच असतं असं नाही.
प्रेमभंगाचं दुःख मात्र प्रचंड वेदनादायी असते, मग हे दुःख बुडवण्यासाठी कोणी पुढे ‘एकच प्याला’चा आधार घेतला तर कोणी ड्रगचा. सिनेमाच्या दुनियेतील मोकळंढाकळं वातावरण, कपडे बदलावेत तसे पार्टनर बदलण्याचं कल्चर यातून समाजात एक वेगळाच इम्पॅक्ट निर्माण होतो.
काही कलाकार मात्र यात कोसळतात. त्यांच्यातली प्रतिभा हरवून जाते. अभिनेत्री परवीन बाबी तर स्किझोफ्रेनियाची शिकार झाली आणि यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.
अभिनेत्री परवीन बाबी आणि दिग्दर्शक महेश भट हे सत्तरच्या दशकात तीन-चार वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. साधारणतः १९७५ ते १९७९ या कालावधीत दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. वस्तुतः महेश भट हे विवाहित होते. १९७० साली त्यांचे लॉरेन ब्राईट सोबत लग्न झाले होते. (तो देखील प्रेम विवाह होता) ते एका मुलीचे वडील होते. पण परवीन बाबी साठी महेश भट दिवाने झाले होते.
त्या काळात परवीन बाबी स्टार होती. तर महेश भट यांचा स्ट्रगलिंग पिरेड चालू होता. १९७९ साली ज्यावेळी महेश भट ‘लहु के दो रंग’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी दार्जिलिंगला गेले होते. त्यावेळी मुंबईत परवीन बाबी एकटीच होती.
या दोघांमधील संबंध तुटण्याच्या मार्गावर होते. परवीनचा लग्नाचा तगादा महेश भट यांना मान्य नव्हता. त्यांचे ब्रेकअप होणे नक्की झाले होते. परवीन बाबी त्यामुळे प्रचंड दुःखाने अस्वस्थ होती. महेश भट फोन उचलत नव्हते. त्यांना भेटायला ती ‘बेकरार’ होती पण ते शक्य नव्हते.
त्यामुळे तिने एक कॅसेट स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून त्यांच्याकडे पाठवली. तिच्या दृष्टीने ते एक ऑडिओ लेटर होते. यात तिने रडत रडत महेशला आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली होती. साधारणत: तीस मिनिटांची तिची प्रेमाची कैफियत होती.
ही कॅसेट मात्र महेश भट यांना न मिळता त्यांची पत्नी लॉरेन ब्राईट (किरण भट) हिच्या हाती आली. तिने ती कॅसेट महेश भटला न देता तशीच स्वत:च्या कपाटात ठेवून दिली.
पुढे दहा वर्ष कॅसेट कडे कोणाचेच लक्ष नाही. पण ज्यावेळी लॉरेन ब्राईट (किरण भट) आणि महेश भट यांचे वैवाहिक संबंध संपुष्टात आले, त्यावेळी किरणने ती कॅसेट आपली मुलगी पूजा भट हिच्या ताब्यात दिली.
आता महेश भट आणि सोनी राजदान यांचे लग्न झाले होते. पूजा भटने देखील या कॅसेटकडे दुर्लक्षच केले. २० जानेवारी २००५ ला परवीन बाबीचे निधन झाले. त्यानंतर तिने सहज कुतुहल म्हणून ही कॅसेट वाजवुन पाहिली. त्यावेळी तिला प्रचंड धक्का बसला!
तिच्या वडिलांना अभिनेत्री परवीन बाबीने पाठवलेल्या भावना त्या कॅसेटमध्ये होत्या. परवीनने अगदी जीवापाड प्रेम महेश भट यांच्यावर केले होते. त्या प्रेमातील एक एक शब्द, त्या वेदना, ते दुःख त्या कॅसेट मधून व्यक्त होत होते. परवीनने या मध्ये या दोघांच्या संबंधाचे अनेक प्रसंग, कधी कधी इंटीमेट प्रसंगाचे देखील वर्णन केले होते.
पूजा भट ही कॅसेट एकूण प्रचंड भारावली. एक व्यक्ती इतके जीवापाड प्रेम कसे करू शकते? २० सप्टेंबर हा महेश भट यांचा वाढदिवस असतो. २० सप्टेंबर २००५ या दिवशी वाढदिवसाची भेट म्हणून तिने सत्तावीस वर्षांपूर्वी परवीन बाबीने त्यांना पाठवलेली कॅसेट भेट दिली.
आपल्या मुलीकडून मिळालेले बर्थडे गिफ्ट महेश भट खूपच आवडले. रात्रभर ती कॅसेट ऐकून रडत होते. परवीन बाबीच्या आठवणीने ते बेदम बेचैन झाले होते. पहाटे त्यांनी आपला पुतण्या मोहित सुरी यांना ती कॅसेट दिली आणि त्यातूनच पुढे ‘वो लम्हे’ या चित्रपटाची निर्मिती झाली!
जर महेश भटला त्याच वेळी म्हणजे १९७९ सालीच ती कॅसेट मिळाली असती तर…
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू:
- ब्रेकअप करून निघालेल्या महेश भट्टला अडवण्यासाठी ती विवस्त्र अवस्थेत धावत होती.
- आजही अनुपम खेरला प्रत्येक सिनेमाच्या मानधनातून काही वाटा महेश भट्टला द्यावा लागतो
- जहर अक्सर मध्ये राडा करणाऱ्या उदिताने शिक्षण पूर्ण करायसाठी फिल्म इंडस्ट्री सोडली होती..