बॉयकॉटचा ट्रेंड सुरू असला, तरी ७ महिन्यांपूर्वी कतार एअरवेजनंच भारतीयांचे प्राण वाचवलेले

गेल्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा हे नाव माध्यमांमध्ये सातत्यानं झळकत आहे. भाजप नेत्या शर्मा यांनी मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर कानपुरमध्ये दंगली उफाळल्या. हा मुद्दा अगदी विदेशापर्यंत पोहोचला. या मुद्द्यावरून इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. देश-विदेशातून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर वाद-प्रतिवाद केले जात होते.

त्यात उडी घेतली कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने. कंगनाने नुपूर यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आता परत एकदा तिचं या मुद्यावरचं वक्तव्य चर्चेत आलंय.

नुपूर त्यांच्या वक्तव्यानंतर कतारने या प्रकरणी भारत सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली, त्यानंतर भारतात सोशल मिडीयावरील एका गटाने ट्विटरवर कतार एअरवेजच्या बहिष्काराची मागणी करण्यास सुरवात केली.

ज्यात वासुदेव नावाच्या एका युझरनं व्हिडिओ टाकत कतार एअरवेजवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.

वासुदेवचा हा व्हिडिओ अहद नावाच्या ट्विटर हँडलने रिट्विट केला असून कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बकर यांची जुनी मुलाखत शेअर केली आहे. ज्यात कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर वासुदेवला बहिष्कार मागे घेण्याची विनंती करत त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

पण हा व्हिडीओ खरा नसून एडिटेड आहे…  

याच एडिटेड व्हिडीओला बळी पडत कंगना रणौतने अकबर अल बकर यांच्यावर ताशेरे ओढणारी पोस्ट स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केली. एका गरीब ‘भारतीया’ची चेष्टा केल्याचा आरोप तिनं अकबर अल बकर यांच्यावर केला, शिवाय “जे या व्हिडीओला लाईक करत आहेत, ते भारतासारख्या देशाला एक ओझे आहेत” असंही ती म्हणाली.

WhatsApp Image 2022 06 09 at 3.17.48 PM

त्यानंतर जेव्हा तिच्या लक्षात आलं की हा व्हिडीओ एडिटेड आहे, तेव्हा तिने तो डिलीट केला. मात्र तोपर्यंत तिची पोस्ट व्हायरल झाली आणि ट्रोलिंगला सुरुवात झाली.

कंगनाची स्टोरी हे फक्त एक निम्मित असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर  #BoycottQatarAirways हा हॅशटॅग ट्रेंड केला होतोय. तापलेल्या मुद्द्यावरुन कतार एअरवेजवर टीका होत असली, तरी याच कतार एअरवेजमुळे अनेक भारतीय नागरिकांना संकटकाळी अफगाणिस्तानातून बाहेर काढणं शक्य झालं होतं. 

जास्त जुनी नाही… २०२१ च्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट आहे. 

अफगाणिस्तानवर तालिबाननं पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं. तालिबानच्या दहशतीमुळं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. मोठ्या संख्येनं लोक अफगाणिस्तान सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. साहजिकच काबूल विमानतळावरची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. 

‘नाटो’च्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार फक्त सात दिवसांत २० जणांना प्राण गमवावे लागले होते. 

काबूल विमानतळावरून सर्व परदेशी नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न अमेरिकन सैन्य करत होतं. त्यात विमानतळावर चेंगराचेंगरी होऊन सात अफगाणी नागरिक ठार झाले होते. व्यावसायिक विमानंही सुरु झाली नव्हती. 

अशा भयंकर परिस्थितीत अनेक भारतीयही अफगाणिस्तानमध्ये अडकले होते. 

त्यांना कसं सोडवायचं हा विचार भारत सरकार करत होतं. सातत्यानं अमेरीकन सैन्याशी भारत सरकारचा संपर्क सुरूच होता. लवकरात लवकर मार्ग निघण्याची सगळे वाट बघत होते. भारतीय वायू सेनाही काम करत होती.

१७ ऑगस्ट रोजी भारतीय हवाई दलाचं एक विमान १५० भारतीयांना घेऊन काबूल मधून मायदेशी आलं होतं. मात्र शक्ती कमी पडत होती. अजूनही अनेक भारतीय काबूलमध्येच अडकले होते.

अशात कतार एअरवेज भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावली. 

कतार एअरवेजच्या मदतीने अफगाणिस्तानातून सुमारे १५० भारतीयांना दोहा इथे हलवण्यात आलं.

दोहामध्ये भारतीय दूतावास आहे. हे भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाण. म्हणून त्यांना पहिल्या टप्प्यात तिथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नंतर दोह्यावरून या भारतीयांना दिल्लीला आणलं गेलं होतं.

अशाप्रकारे कतार एअरवेजनं भारताची आणि भारतोयंची मदत केली होती. या मदत करण्यामागे कतार आणि भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंधही महत्वाचे ठरले. 

भारत आणि कतार या दोन्ही देशांमधल्या व्यवसायामुळे, ज्याचा फायदा कतारच्या शेखांनाही होतो आणि भारतातील कंपन्याही नफा कमावतात. 

कतारने भारताला ऊर्जासुरक्षेच्या क्षेत्रात मोठी हमी दिली आहे. कतारच्या दोहामधील भारतीय दूतावासाच्या मते, कतार हा भारताचा सर्वात मोठा एलएनजी निर्यातदार देश आहे. भारत एकूण एलएनजी आयातीपैकी ४० टक्के आयात कतारकडून करतो. तर कतारच्या एकूण एलएनजी निर्यातीत भारताच्या खरेदीचा वाटा १५ टक्के आहे.

२०१६ मध्ये कतारने भारतासाठी एलएनजीच्या किंमतीत ५० टक्क्यांहून अधिक कपात केली होती. तर कतारने भारताला दंडातूनही मुक्त केलं होतं. भारताचे पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम यांच्यात २०१५-१६ मध्ये झालेल्या करारामुळे कतारने भारताला ही सूट देण्यास सहमती दर्शवली होती. 

आजवर तरी या भारत आणि कतारमधले संबंध सामंजस्याचे राहिले आहेत. कतार एअरवेजनंही संकटाच्या काळात भारतीय नागरिकांचा जीव वाचवत मोलाची भूमिका बजावली होती. बिझनेससोबतच त्यांनी द्विराष्ट्रीय संबंधही अशाप्रकारे जपले होते. 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.