आमच्या ताईच्या वहीत राहुल द्रविडचा फोटो सापडला होता…

आपलं बालपण क्रिकेट बघण्यात आणि खेळण्यात गेलं. चेहऱ्याचा रंग, फुटलेले गुडघे-कोपरे, घरी अगणित वेळा खाल्लेला तुफानी मार आणि शाळेला मारलेली कल्टी या सगळ्यामागचं कारण एकच होतं क्रिकेट. आता क्रिकेटमुळं मार खाणं वैगेरे जाऊद्या, पण आपलं बालपणही लय भारी झालं हेही तितकंच खरं.

भारताची मॅच असल्यावर पोरं सोडा पोरीनं भेटायला बोलवलं, तरी पोरं घराच्या बाहेर पाऊल टाकायची नाहीत. मॅच असली की सकाळी अभ्यास-बिभ्यास उरकून टीव्हीसमोर निवांत बसायचं. आता त्याकाळात आपले हिरो ठरलेले… तेंडल्या, दादा, भज्जी, झहीर, कुंबळे… त्याप्रमाणं पोरांची टोपणनावंही ठरलेली. लई रन करणारं पोरगं तेंडल्या, आळस देऊन बॉलिंग करतोय म्हणजे भज्जी आणि लई टुकू टुकू खेळत असेल तर त्याचं टोपणनाव राहुल द्रविड.

राहुल द्रविड. कायम अभ्यासू पोरांसारखा चेहरा, वागण्यात शिस्त, व्यवस्थित भांग पाडलेले केस आणि एकदा बॅटिंगला उतरला की लय वेळ टिच्चून खेळणार याची गॅरंटी. त्याकाळातले बॉलर्स पण लय डेंजर होते, शोएब अख्तर, मॅकग्रा, डोनाल्ड, ली हे गडी तर निव्वळ आग ओकायचे. पण द्रविड तपस्या केल्यासारखा त्यांच्या आगीला निवांत तोंड द्यायचा.

एकदा खेळून आल्यावर पाहिलं तर ताई घरात बोलणी खात होती. आता आपलं डिपार्टमेंट ताईकडे गेल्यावर काहीतरी मोठा विषय असणार हे नक्की. तिला काय वाचवायला-बिचवायला गेलो नाय, पण ओरडणाऱ्या आईचा आवाज आला. ‘पोराचा फोटो वहीत ठेवलाच कशाला?’ विषय आपल्यावर कधीही घसरु शकतोय हे माहीत असल्यानं कल्टी हाणली आणि नंतर ताईची वही उघडून पाहिली, तेव्हा समजलं तो फोटो होता राहुल द्रविडचा.

द्रविड दिसायला खरंच लई चिकणा. कट्ट्यावरच्या भाषेत सांगायचं झालं, तर पोरांमधलं मॅरेज मटेरियल. त्याच्याकडे ना सिक्स पॅक होते, ना बॉडी बिल्डिंग केलेली तब्येत पण पेशन्स, सभ्यता आणि चेहऱ्यावरचं हसू म्हणजे अगदी विषय खोल.

२००५ मध्ये तर द्रविडनं सेक्सिएस्ट स्पोर्ट्सपर्सन अलाईव्ह इन इंडिया हा पुरस्कार जिंकला तेही युवराज सिंगला मागं टाकून.

पोरगं फक्त दिसायलाच भारी होतं अशातलीही गोष्ट नाही. टीमसाठी काय वाटेल ते करायची तयारी द्रविडची असायची. ओपनिंगला जा सांगितलं तर द्रविड ओपनिंग करायचा, टीममध्ये एक बॅटर जास्त खेळवायचाय म्हणून किपींग कर सांगितलं तर ग्लोव्ह्ज चढवायचा, एकदा तर भावानं बॉलिंगवर मॅच जिंकून दिली होती. एकदम परफेक्ट टीममॅन.

द्रविड बॅटिंगला उभा राहिला की, एक जाहिरात फिक्स आठवायची, ‘ये दिवार तुटती क्यू नहीं.’ टॉप ऑर्डरच्या विकेट धपाधप पडल्या असतील, सामना वाचवायला टिकून उभं राहायचं असेल… प्रत्येक गरजेचं एकच उत्तर होतं ते म्हणजे राहुल द्रविड. 

टुकटुकू खेळायचा म्हणत कितीही शिव्या घातल्या, तरी माधुरी दीक्षित आणि द्रविडचा डिफेन्स दोन्हीही सारखंच सुंदर. बघत राहावं असं.

कोच म्हणून पण द्रविड भारी ठरला. अंडर-१९ च्या टीमनं त्याच्या कोचिंगमध्ये वर्ल्डकप जिंकला, पोरांचे पाय जमिनीवर ठेवले आणि भारतीय क्रिकेटची नवी पिढीही घडवली. एवढे रेकॉर्डचे डोंगर उभे करुनही सचिनला शिव्या देणारी लोकं आहेत, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा बाजार उठवूनही कोहली शिव्या खातो, चाहते इतके रग्गड की धोनी आणि गांगुलीलाही सोडत नाहीत.

पण द्रविडला शिव्या घालणारा सच्चा क्रिकेट फॅन शोधूनही सापडत नाही.

प्रसिद्ध क्रीडा लेखक रोहित ब्रिजनाथ मिंट या संकेतस्थळावर द्रविडबद्दल लिहितात, ‘कधी अवघड परिस्थिती असली, तरी याची बॅटिंग सुरु असायची. बॉल सोडून द्यायचा, ब्लॉक करायचा, पुन्हा सोडून द्यायचा, पुन्हा ब्लॉक करायचा. कधी कधी हे बोअर वाटायचं पण शेवटी त्यानं लीड मिळवून दिलेलं असायचं, संघ संकटातून बाहेर आलेला असायचा, भारताला जिंकायची संधी मिळालेली असायची. आणि तुम्ही द्रविडकडे पाहिलंत, तर घामानं भिजलेले कपडे आणि तरीही एकाग्र असलेलं मन. कुठल्याही आणि कितीही प्रेशर सिच्युएशन्समध्ये झगडणं आणि प्रयत्न करत राहणं हाच द्रविडचा मंत्र.’

आज त्याला कोचच्या भूमिकेत पाहताना भारी वाटतं आणि ताईनं आपल्या पोराचं नाव राहुल का ठेवलं याचं आश्चर्यही वाटत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.