राहुल द्रविडच्या मोठेपणाचा छोटा किस्सा…

प्रत्येक गल्लीत एक असं पोरगं असतं, जे बॅटिंगला आलं की नुसतं टुकूटुकू खेळत बसतं, गडी आऊट होत नाय, पण रन्सही करत नाही. मग त्याला टोपणनाव मिळतं द्रविड. सिक्स मारला की धोनी, लई रन्स केले की कोहली आणि नुसता डिफेन्स करत राहिला की द्रविड ही गल्ली क्रिकेटमधली ठरलेली टोपणनावं. आता हा विषय मस्करीपुरताच मर्यादित राहतो कारण कितीही ट्राय मारला तरी द्रविड इतकं मोठं आणि भारी कुणालाच होता येत नसतंय.

द्रविडच्या मोठेपणाचे किस्से अनेकदा सांगितले जातात, मग ते इंडिया प्लेअर झाल्यावरही आपल्या क्लबच्या गरजेला धाऊन जाणं असेल किंवा वडिलांच्या जॅमच्या कंपनीची बाटली किटबॅगमध्ये ठेवणं असेल…

किट बॅगेत जॅमची बॉटल घेऊन फिरणारा राहुल स्टार बनल्यावरही वडिलांच्या कंपनीला विसरला नाही

द्रविड मैदानातल्या परफॉर्मन्ससोबतच मैदानाबाहेरच्या वागण्यामुळंही मोठा झाला. द्रविडच्या बॅटिंगला अगदी काटेकोर शिस्त होती, उगाच हवेत बॉल मारुन आउट झालाय, गरज नसताना विकेट फेकलीये या गोष्टी द्रविडसोबत कधीच घडायच्या नाहीत. सध्याचे बॅट्समन सिक्स मारुन शंभर करायच्या नादात ९३-९४ वर आऊट होतात किंवा ५० रन्स करुन पॅव्हेलियनचा रस्ता धरतात.

मग राहुल द्रविडला कुठल्याही परिस्थितीत शांत राहून बॅटिंग करणं कसं जमायचं ?

तर याचं उत्तर सापडतं एका किश्श्यात. सध्या आयपीएल आणि इतर प्रीमिअर लिग्सची जशी चर्चा होते, तशाच भारतात देशांतर्गत लिग्सही बऱ्याच फेमस आहेत. अशीच एक लीग म्हणजे चेन्नई लीग. जिथं मोठमोठे भारतीय प्लेअर्स हजेरी लावायचे आणि खतरनाक मॅचेसही व्हायच्या.

राहुल द्रविड सुद्धा या लीगमध्ये खेळायचा आणि लय रन्स करायचा. एखाद दुसरी सेंच्युरी मारुन त्याचं समाधान व्हायचं नाही, त्याच्या नावापुढं ४-५ सेंच्युरीज तर सहज लागायचा. पण एवढे रन्स करुनही राहुल द्रविड प्रत्येक मॅचला त्याच स्टाईलनं खेळायचा, ५-६ तास सहज बॅटिंग करायचा आणि गरज नसताना हवेतून शॉट मार किंवा विकेट फेक असले प्रकार चुकून सुद्धा करायचा नाही.

खरंतर चेन्नई लीगमध्ये बरेच प्लेअर्स प्रॅक्टिस मिळावी, थोडं क्रिकेट एंजॉय करता यावं म्हणून यायचे. त्यामुळं इथं तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा राहुल द्रविड म्हणजे आश्चर्याचा विषय होता.

एका बाजूला द्रविड होता आणि दुसऱ्या बाजूला हेमांग बदानी. बदानी ५०-१०० मारायचा आणि मग बॉलर्सला मारायच्या प्रयत्नात विकेट फेकायचा. पण आपण जे करतोय ते राहुल द्रविड का करत नाही, तो बॉल कायम जमिनीवरच का ठेवतो ? असा प्रश्न त्याला पडला. त्यानं द्रविडला विचारलं,

“तू ४-५ सेंच्युरीज मारल्या आहेस, तरी येऊन ५-५ तास बॅटिंग करतो. तुला बोर होत नाही का ? नवे शॉट्स ट्राय करावे वाटत नाहीत का ?”

द्रविडचं उत्तर सिम्पल होतं, 

“मी बँगलोरवरुन रात्रभर सहा-साडेसहा तासांचा प्रवास करुन चेन्नईला येतो, एवढा प्रवास करुन इथं यायचं, तेवढाच प्रवास करुन परत जायचं हे सगळं मी ३ तास बॅटिंग करण्यासाठी करत नाही. जर मी एवढा प्रवास करुन बॅटिंगला येतोय, तर मी हे पक्कं ठरवलेलंय की ग्राऊंडमध्ये जाऊन ५ तास बॅटिंग करणारच. इतकं सोपं आहे.”

इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही आपण लय वेळा बघितलं की राहुल द्रविड झटकन आउट व्हायचा नाही आणि बॅटिंग करत राहायचा. त्याच्यामागचं कारणही त्यानं हेमांग बदानीला सांगितलं होतं.

तो म्हणाला होता, “नेट्समध्ये बॅटिंग करुन झाल्यावर प्रत्येक बॅट्समनचं म्हणणं असतं की आणखी थोडा वेळ खेळावं, बॅट्समन कोचला म्हणतो की आणखी थोडे बॉल खेळूद्या, बॉलर्सला सांगतो की आणखी काही बॉल टाकतोस का ? थोडक्यात नेट्समध्ये कुठलाही बॅट्समन बॅटिंग करायला उत्सुक असतो. पण या गोष्टीसाठी सगळ्यात परफेक्ट सेटअप तुम्ही मॅचमध्ये बॅटिंग करता तेव्हा असतो, तिथे बॉलर्स तुम्ही आऊट होईपर्यंत बॉल टाकणार असतातच, तर ती संधी का सोडायची ? १०० करायला १५०-१७० कितीही बॉल लागले तरी बॉलर्स बॉलिंग करतायत तोवर खेळणं का थांबवायचं ?”

हीच शिस्त आणि मानसिकता होती, म्हणून राहुल द्रविड लवकर आऊट व्हायचा नाही, आणि म्हणूनच तो भारतीय क्रिकेटची ‘द वॉल’ बनला.

(सनरायझर्स हैदराबादनं शेअर केलेल्या एका व्हिडिओत हेमांग बदानीनं हा किस्सा सांगितला आहे )

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.