दीप्ती शर्मानं केलेला रनआऊट नियमात बसतो, तो एका मुलानं बापासाठी दिलेल्या लढ्यामुळं

भारत विरुद्ध इंग्लंड या महिला संघांमधली वनडे सिरीज नुकतीच पार पडली. या सिरीजमधली तिसरी वनडे भारताची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामी हिच्या करिअरमधली लास्ट मॅच म्हणून कायम लक्षात राहील, पण त्याहीपेक्षा ही मॅच लक्षात राहण्याचं मोठं कारण म्हणजे, भारताची बॉलर दीप्ती शर्मानं इंग्लंडच्या चार्ली डीनला केलेलं रनआऊट.

भारतानं दिलेल्या १७० रन्सच्या किरकोळ आव्हानासमोर इंग्लंड आरामात जिंकेल असा अनेकांचा अंदाज होता. पण भारतानं झटपट विकेट्स काढत मॅचमध्ये रंगत आणली. मात्र इंग्लंडच्या फ्रेया डेव्हिस आणि चार्ली डीननं जबरदस्त किल्ला लढवला. मॅच इतकी कडक झाली की इंग्लंडला जिंकायला ३९ बॉलमध्ये फक्त १७ रन्स हवे होते.

दीप्ती शर्मा बॉलिंग करत होती, चार्ली डीन नॉन स्ट्राईकला होती. दीप्तीनं बॉल टाकायच्या आधीच चार्लीनं क्रीझ सोडली आणि ती रन काढायला पुढे सरसावली. दीप्ती बॉल टाकण्याऐवजी उलटी फिरली आणि तिनं नॉन स्ट्राईकिंग एन्डला चार्लीला रनआऊट केलं. थर्ड अंपायरनं आऊट असल्याचा निर्णय दिला.

आता यावरुन इंग्लिश खेळाडू आणि इंग्लिश फॅन्स चांगलेच खवळले. त्यांचं म्हणणं होतं की, हे नियमाला धरुन असलं, तरी स्पिरीट ऑफ क्रिकेटमध्ये बसत नाही. हा प्रकार योग्य नाही.

आता भारतीय बॉलरनं अशा पद्धतीनं रनआऊट करणं आणि इंग्लंडच्या फॅन्सनं कल्ला करणं हे काय पहिल्यांदाच घडत नाहीये. २०१९ च्या आयपीएलमध्ये भारताच्याच आर अश्विननं बॉल टाकण्याआधीच क्रीझ सोडलेल्या जोस बटलरला रनआऊट केलं आणि सगळ्या क्रिकेट जगतात वाद झाला.

परदेशी खेळाडूंनी अश्विनची ही कृती क्रिकेटच्या नियमांविरोधात आणि स्पोर्टींग स्पिरीटला धक्का देणारी आहे, असं रडगाणं गायला सुरुवात केली. तर बोटावर मोजण्याइतक्या भारतीय खेळाडूंनी अश्विनला पाठिंबा दिला. मात्र ज्याप्रकारे परदेशी मीडिया अश्विनवर तुटून पडलं, ते बघून फ्युजाच उडाल्या.

पण अशा प्रकारच्या रनआऊट नंतर परदेशी मीडियानं भारतीय खेळाडूला लक्ष्य करणं याची ती पहिलीच वेळ नव्हती, याआधीही असं झालं होतं, तेही १९४७ मध्ये.

ते खेळाडू होते, भारताच्या ग्रेटेस्ट ऑलराऊंडर्स पैकी एक म्हणून ओळखले जाणारे विनू मंकड.

१९४७, भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सुरू असलेल्या सराव सामन्यांदरम्यान एक किस्सा झाला, ऑस्ट्रेलियन बॅट्समन बिल ब्राऊन यांनी नॉन स्ट्राईकवर असताना बॉल टाकण्याआधीच क्रीझ सोडली आणि बॉलिंग करणाऱ्या मंकड यांनी त्यांना वॉर्निंग दिली. मात्र सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये ब्राऊन पुन्हा क्रीझ सोडून पुढे गेले आणि यावेळी मात्र मंकड यांनी बेल्स उडवल्या.

सगळ्या ऑस्ट्रेलियन मीडियानं विषय उचलून धरला आणि अशा प्रकारच्या रनआऊटला नाव पडलं.. मंकडींग.

हे प्रकरण इतकं गाजलं आणि चर्चेत राहिलं की, अजूनही विनू मंकड यांचं नाव ऐकल्यावर कित्येकांना मंकडींगचं आठवतं.

या प्रकरणामुळं काय झालं, तर मंकड यांच्या करिअरमधले अनेक माईलस्टोन्स झाकोळले गेले.

 

भारताला पहिलीवहिली टेस्ट मॅच जिंकून देण्याचे हिरो विनू मंकड होते. १९५२ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेली, टेस्ट भारत आठ विकेट्सनी हरला. पण भारताच्या पराभवातही १८४ रन्स आणि ५ विकेट्स घेणारे विनू मंकड चमकले आणि ती टेस्ट ‘मंकड टेस्ट’ अशीच ओळखली जाऊ लागली… पण दुर्दैव म्हणजे ही माहिती फार लोकांना माहीतच नाही.

 

नॉन स्ट्राईकवर असलेल्या बॅट्समनला बॉल टाकण्याआधीच रनआऊट करणं हे सुरुवातीला आयसीसीच्या ‘अनफेअर प्ले’ या लॉमध्ये येत होतं. त्यामुळं मंकड यांनी केलेल्या रनआऊटवर स्पोर्टींग स्पिरिटमध्ये नसल्याची टीका करणं सोपं होतं. मंकडच नाही, तर त्यांच्यानंतर भारताचे लेजंडरी ऑलराऊंडर कपिल देव आणि स्पिनर आर. अश्विन यांनाही या रनआऊटनंतर प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं.

या सगळ्यात त्या ‘अनफेअर प्ले’ मधल्या रनआऊटला मंकडींग हे नाव चिटकलं ते कायमचंच. अगदी अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही अशाप्रकारे रनआऊट झाल्यानंतर मंकडींग असंच म्हणलं गेलं आणि तेवढ्यापुरते विनू मंकड ट्रेंडिंगमध्ये आले.

भारताच्या सगळ्यात भारी ऑलराऊंडर्सपैकी एक असलेल्या मंकड यांना एकाप्रकारे अन्यायच सहन करावा लागत होता. क्रिकेट विश्व त्यांचं नाव आदरानं कमी आणि कुत्सितपणे जास्त घेत होतं.

मात्र आता ही सगळी परिस्थिती बदललीये, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरीलिबोन क्रिकेट क्लबनं (एमसीसी) असा रनआऊट हा पूर्णपणे बरोबर आणि क्रिकेटच्या नियमांमध्ये असल्याचं जाहीर केलं.

आणि यासाठीची लढाई लढली होती.. राहुल मंकड यांनी.

राहुल हे विनू मंकड यांचे पुत्र. राहुलही क्रिकेटरच, आपल्या वडिलांप्रमाणं तेही राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट आर्म बॉलर होते. राहुल मंकड यांची मुंबईच्या रणजी संघात वर्णी लागली. जवळपास अकरा वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळूनही राहुल यांना भारतीय संघाचे दरवाजे खुले करता आले नाहीत. त्यांच्या नावापुढं अचाट विक्रमही जमा झाले नाहीत.

Rahul Mankad
राहुल मंकड

पण राहुल मंकड यांनी मैदानाबाहेर आपल्या वडिलांच्या कामगिरीला आणि महानतेला न्याय मिळवून दिला… जे आतापर्यंत बीसीसीआयलाही जमलं नव्हतं.

नॉन स्ट्राईकर एन्ड सोडलेल्या बॅट्समनला रनआऊट करणं हे चुकीचं नाही, हे राहुल मंकड यांनी लाऊन धरलं. त्यांनी हा मुद्दा एमसीसीकडे नेला. सातत्यानं पाठपुरावा करत, एमसीसीला थेट नियमच बदलायला लावला. एमसीसीनं जाहीर केलेल्या नियमांमध्ये अशाप्रकारचा रनआऊट पूर्णपणे योग्य असल्याचं आणि तो अनफेअर प्लेमध्ये नसल्याचं जाहीर केलं.

मंकड यांनी १९४७ मध्ये केलेला रनआऊट, त्यानंतर झालेले वाद, कपिल पाजी आणि अश्विन अण्णानं केलेल्या रनआऊट नंतरचे वाद, स्पोर्टींग स्पिरीटला धक्का पोहोचवल्याच्या अनेक टीका आणि अखेर मिळालेला न्याय… वडील विनू मंकड यांच्यापासून सुरू झालेली स्टोरी, मुलगा राहुल मंकड यांच्यामुळं थांबली आणि एकाचा खेळ आणि एकाचे प्रयत्न अजरामर झाले आणि या प्रयत्नांमुळेच दीप्ती शर्मानं केलेला रनआऊट पूर्णपणे योग्य असल्याचं भारतीय चाहत्यांना ठामपणे सांगता आलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.